संचालक मंडळाकडून नियमबाह्य उचल !

jalgaon-digital
3 Min Read

टिळकनगर कामगार पतपेढीच्या संचालकांसह अधिकारी व कर्मचार्‍यांची होणार चौकशी; चौकशीसाठी प्राधिकृत अधिकार्‍याची नेमणूक

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील टिळकनगर उद्योग समूह कामगार पतपेढीत संचालक मंडळाने केलेल्या नियमबाह्य उचल प्रकरणाची चौकशी करून संस्थेचे झालेले नुकसान निश्‍चित करण्यासाठी सहायक निबंधक विजयसिंह लकवाल यांनी अ‍ॅड. ए. एम. मुळे यांची प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. दोन महिन्यांत चौकशी पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश लकवाल यांनी दिले आहेत.

टिळकनगर कामगार पतपेढीच्या संचालक मंडळाने केलेल्या गैरव्यवहाराबाबत संस्थेचे संचालक शांतवन सोनवणे यांनी सहायक निबंधक यांच्याकडे तक्रार दाखल करुन चेअरमन व व्हा. चेअरमन यांच्याकडे राजीनामा दिला आहे. राजीनामा मंजूर होत नसल्याने व इतर अ‍ॅडव्हान्स बाबतही पदाधिकारी गंभीर नसल्याचे लक्षात आल्याने सोनवणे यांनी दि. 23 मार्च 2020 रोजी प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता.

त्या अनुषंगाने सहायक निबंधक यांनी सदर तक्रारीची दखल घेत संस्थेशी पत्रव्यवहार केला. दि. 20 जानेवारी 2020 रोजी पतपेढीचे सचिव व चेअरमन यांना श्री. सोनवणे यांच्या तक्रारीनुसार सहायक निबंधक यांनी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार संस्थेने खुलासा सादर केला. त्यामध्ये संस्थेचे चेअरमन यांच्याकडे दि. 31 डिसेंबर 2018 रोजी 7 लाख 56 हजार 900 रुपये अ‍ॅडव्हान्सची रक्कम होती.

या रकमेचा दि. 1 जानेवारी 2019 ते 15 जानेवारी 2019 या कालावधीत संस्थेत भरणा केला आहे. या रकमेचा बँकेत भरणा वेगवेगळ्या दिवशी केलेला असून त्यानुसार दि. 29 मार्च 2019 अखेर पर्यंत 5 लाख 28 हजार रुपयांचा भरणा केला आहे. याचाच अर्थ अद्याप पावेतो 2 लाख 28 हजार 900 रुपयांचा भरणा केलेला नाही.

तक्रारदार संचालक शांतवन सोनवणे यांनी संस्थेस दिलेल्या तक्रार अर्जात श्री. सोनवणे यांच्याकडेही काही प्रमाणात अ‍ॅडव्हान्स रक्कम आहे व ती भरणे बाकी आहे तसेच इतर समिती सदस्यांनी देखील उचल घेतली असून भरणा केलेला नसल्याचे निदर्शनास आले.
संस्थेने जे कागदपत्रे सादर केले त्यामध्ये सकृतदर्शनी सहाय्य निबंधक यांना गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे कामगार पतपेढीचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांनी 2017 ते 2020 या कालावधीत मोठ्या प्रमाणात रक्कमा उचल करुन त्या पुन्हा भरणा केलेल्या नाहीत. त्यामुळे संस्थेचे झालेले आर्थिक नुकसान निश्‍चित करण्यासाठी सहाय्यक निबंधक वि. यु. लकवाल यांनी अ‍ॅड. ए. एम. मुळे यांची प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.

चौकशीला सामोरे जाण्यास तयार
गेल्या तीन वर्षापासून आमची संस्था ‘अ’ वर्गात आहे. दिवसेंदिवस संस्थेची सभासद संख्या घटत चालली आहे. संस्थेचा कारभार हा चोख व सहकाराच्या नियमाला धरून सुरु आहे. चौकशी मध्ये ‘दूध का दूध और पानी का पानी’ होईल,. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास संचालक मंडळ तयार आहे.
– बाळासाहेब विघे, चेअरमन, टिळकनगर परिसर, उद्योग समूह पगारदार सेवकांची सहकारी पतसंस्था

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *