Tuesday, April 23, 2024
Homeब्लॉगआम्ही सावित्रीची लेकरं!

आम्ही सावित्रीची लेकरं!

८९ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी जर तिचा जन्म झाला नसता तर कदाचित मी लिहू-वाचू शकले नसते. इतिहासात ती क्रांती करून गेली म्हणून आज चार बंदिस्त भिंतींपलीकडचं जग मी आज बघू शकते आहे, अनुभवू शकते आहे. माझ्या शिक्षणाची त्यातून आलेल्या नीरक्षीर बुद्धी वापरून विचार करू शकण्याच्या क्षमतेची ती जननी आहे. ती सावित्रीबाई माझ्यासारख्या प्रत्येक स्त्रीच्या स्वातंत्र्याची आई आहे!!

तुमच्या माझ्यासाठी तिने अंगावर चिखल झेलला, नको नको ते टोमणे, शिवीगाळ सहन करून पोरींबाळींना शिक्षणाची गोडी लावली, अशा सावित्रीबाईचे ऋण आपण फेडू शकणार नाही.

- Advertisement -

विद्या हे धन आहे रे। श्रेष्ठ साऱ्या धनाहून 

तिचा साठा जयापाशी। ज्ञानी तो मानती जन’ 

अशी विद्येची महती तिने त्याकाळी पटवून दिली म्हणून पुरुषसत्ताक संस्कृती असणाऱ्या या भारत देशात बहुतांश स्त्रिया आज स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वावलंबी आयुष्य जगत आहेत.

आज सावित्रीबाई फुलेंनी जयंती आहे म्हणून केवळ औपचारिकता म्हणून त्यांच्या तसबीरिला हार, फुले वाहण्यात अर्थ नाही तर सावित्रीबाईंनी त्याकाळी दिलेला लढा स्मरून स्त्रियांनी आपल्या अधिकारांसाठी आवाज उठविण्याची शपथ घेणे गरजेचे आहे. आजही भवतालच्या प्रत्येक स्तरातील अनेक स्त्रिया बंद दाराआड अनन्वित अत्याचार सहन करीत असतात. शारीरिक अत्याचारांचे वळ दिसून येतात मात्र कधीही भरून न येणाऱ्या मानसिक जखमा वागवत आजही अनेक स्त्रिया आयुष्य जगत असतात.

बाहेर पडलेली प्रत्येक स्त्री दैनंदिन आयुष्यात अनेकदा वासनांध नजरा झेलत जीव मुठीत घेऊन वावरत असते. आभासी जगात रोज अनोळखी व्यक्ती नको नको ते शेरे, सल्ले, उपदेश, ऑफर देत असतात. अशा प्रकारच्या अनेक सांगता येणाऱ्या तर कधी न सांगता येणाऱ्या अत्याचारांना आजची स्त्री सहन करत असते. त्याविरुद्ध चुप्पी तोडण्याची, चुकीच्या गोष्टी वेळीच रोखण्याची हिंमत बाळगण्याचे बाळकडू सावित्रीबाईकडून घ्यायला हवे. सवित्रीबाईंप्रमाणे ज्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या अस्तित्वाबद्दल सजग होईल. त्यावेळी त्यांच्या लढ्याला योग्य न्याय मिळेल. आता केवळ शब्दांनी नाही तर कृतीद्वारे स्त्री मुक्तीचा एल्गार करायला हवा!

ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते, शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि पारतंत्र्यात ठेवले जात होते. त्या काळात सावित्रीबाईचा जन्म झाला. पुढे मात्र सावित्रीबाईना ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टीकोन असल्याने स्वतःचे व्यक्तिमत्व घडविण्याची संधी प्राप्त झाली. पण सावित्रीबाई फुले या केवळ ज्योतिराव फुले यांच्या ध्येयमार्गातील सहचारिणी नव्हत्या; काही बाबतीत त्यांचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्र विचारसरणीचे होते.

नंतरच्या काळात त्यांच्याविषयी अनेकांनी केलेल्या संशोधनातून ते सिद्ध झालेले आहे. त्यावेळच्या.. किंबहुना आजच्याही मानसिकतेनुसार त्यांचे हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व झाकोळले गेले असावे. पण ज्योतिरावांचे क्रांतिकारी व्यक्तिमत्त्व पचवणे आणि त्या पुढे जाऊन विकसित करण्यासाठी सावित्रीबाई तेवढ्याच खमक्या आणि प्रगल्भ होत्या म्हणून ज्योतिबा ‘महात्मा’ होऊ शकले!!

अशा या क्रांतीच्या ज्योतीला नव्हे तर धगधगत्या मशालीला स्मरुन त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा वसा घेऊ आणि खऱ्या अर्थाने स्वतःला ‘सावित्रीची लेकरं’ म्हणूया!

– प्राजक्ता नागपुरे

- Advertisment -

ताज्या बातम्या