Wednesday, April 24, 2024
HomeनगरBlog : बचेंगे तो और भी मरेंगे

Blog : बचेंगे तो और भी मरेंगे

सकाळी सकाळी वृत्तवाहिण्यांवर कोरोनाच्या बातम्या पाहिल्या . नंतर फेसबुक चाळले. एका इंग्रजी वर्तमान पत्रातील बातमीने काळजाचे पाणी पाणी केले. कोरोनामुळे गावी पायी चालेल्या तरुणाचा तो घरच्यांशी झालेला शेवटचा फोन कॉल होता. ” लेने आ सकते हो तो आ जाओ” म्हणुन पलिकडुन येणारा फोन मधील आवाज शांत झाला तो कायमचाच. दिल्लीच्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणुन काम करणारा ३८ वर्षीय रणवीर मध्यप्रदेशातील मेरुना गावचा. इंग्रजी माध्यमातुन शिकलेला. वडिल वारले व कुटुंबाची जवाबदारी आंगावर पडल्यामुळे दिल्ली गाठली.

हॉटेल मध्ये काम करुन कुटुंब पोसत होता. पैसे वाचवुन छोटे सिमेंट विटांचे घर ही गावी बांधत होता. थोडे कर्ज झाले होते. कोरोनामुळे अचानक हॉटेल बंद झाले. खाण्याची राहण्याची सर्वच पंचाईत झाली. गावकडे जाणारी सर्व साधने बंद झाल्यामुळे पायी जाण्या शिवाय पर्याय नव्हता. कसाबसा आग्र्या पर्यंत पोहोचला.
दिल्ली ते आग्रा २१५ कि.मी. प्रवास केला होता. आणखी ८२ किमी प्रवास शिल्लक होता. छातीत दुखू लागल्याचे त्याने घरच्यांना सांगतले होते पण घर गाठण्याच्या आगोदरच तो रस्त्याच्या कडेला गतप्राण पडला होता.

- Advertisement -

शहरातुन गावाकडे निघालेल्या प्रत्येकाची एक वेगळीच कहाणी आहे. शेकडो लोक या स्थलांतरात देशभर मेले आहेत. आता सरकारने उभारलेल्या विलगीकरण छावण्यात किती मरतील सांगता येत नाही. अन्न न मिळाल्यामुळे भुकबळी किती होतील, कोरोनाच्या भितीने आत्महत्या करुन किती मरतील, पोलिसी अत्याचारात किती मरतील व प्रत्यक्ष कोरोनाने किती मरतील याचा अंदाज बांधणे कठीण आहे.

देशातील व जगभरातील कोरोनाग्रस्तांची व मृतांची प्रसिद्ध होणारी आकडेवारी भयावह आहे. प्रगत, अतिश्रीमंत देशांनी या रोगा पुढे गुडघे टेकले आहेत, भारताचे काय होणार याचा विचार करताना अंगावर काटा येतो. एकच आशेचा किरण दिसतो तो हा की भारतातील जनता नेहमीच प्रदुषित अन्न, पाणी, हवेशी लढत आली आहे, त्यामुळे काही प्रमाणात आपली प्रतिकार शक्ती वाढली असेल व एप्रील मे महिणन्यातील वाढलेल्या तपमानापुढे कोरोनाचे विषाणू निष्प्रभ झाले तरच आपला बळींची आकडा आटोक्यात राहू शकतो. सरकारकडे आपल्याला वाचवण्यासाठी असलेली यंत्रणा व साधन सामुग्री अतिशय तुटपुंजी आहे.

जगभर मृत्यूचे थैमान सुरू आहे. सुदैवाने आपण वाचलो तर दुकाने सुरु होतील, कारखाने उत्पादन सुरु करतील, कार्यालये सुरू होतील, सर्व व्यवहार दळणवळण सुरळीत होइल. पण शेतकऱ्याचे मरण काही थांबणार नाही.

लाखो रुपये खर्च करुन पिकवलेली द्राक्ष एक रुपया किलो सुद्धा विकत नाही म्हणुन द्राक्षाच्या बागा तोडणारा शेतकरी दिसतो. संत्रा, केळी, भाजिपाला सर्वच पिके मोडुन टाकण्याची वेळ आली आहे. अशा प्रकारचे नुकसान सोशल मिडियावर आपण पहातच असाल म्हणुन इथे जास्त लिहीत नाही. अशा परिस्थितीत ही बॅंकांच्या कर्ज वसुलीच्या नोटीसा शेतकऱ्याना घरपोहोच दिल्या जात आहेत. विज कनेक्शन तोडले जात आहेत. शेतकरी आत्महत्या करतील नाहीतर काय करतील? आमचं मरण काही थांबत नाही.

काल यवतमाळ जिल्ह्यातील गुजरी या गावात वीज पडली व एकाच शेतकरी कुटुंबातील सहा जीव पंचतत्वात विलीन झाले. वाघ बिबट्या सारखे वन्य प्राणी अधुन मधुन शेतकऱ्याचा फडशा पाडत असतात व या वन्यप्राण्यानी केलेल्या पिकाच्या नुकसानीमुळे ही शेतकरी जिव देतात. शेताच्या भांडणात न्याय मिळत नाही म्हणुन शेतकरी फाशी घेतात सरकारने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळत नाही म्हणुन विषाची बाटली जवळ करतात. बापाला आपल्या लग्नाचा खर्च नको म्हणुन कोवळ्या मुली विहिरीत उडी घेतात, मुलाला शाळेत जायला एसटीचा पास काढुन देण्याची सुद्धा एपत नाही म्हणुन स्वत:ची चिता स्वत:च रचुन अग्नीच्या स्वाधीन होतो किंवा आता आपले लग्नच होणार नाही याची खात्री पटल्यावर तरुण शेतकरी रेल्वे रुळावर आपला देह ठेवतात.

आमचं मरण थांबत नाही. कोरोना एक दिवस जाइल पण शेतकऱ्याचं मरण काही थांबत नाही. असंख्य कारणे व असंख्य आत्महत्या. साहेबराव करपेंची सहकुटुंब आत्महत्या व आंध्र प्रदेशातील एका गावातील ११ शेतकऱ्यांनी एकाच वेळेला, एकाच झाडाला फाशी घेउन केलेली सामुदायीक आत्महत्या … काय काय सांगावे.
कोणी म्हणेल की देशावर इतके मोठे संकट असताना तुम्ही काय शेतकरऱ्याच तुणतुने वाजवताय. काय करणार ? देशातील नागरीक जी आज मृत्यूची दहशत अनुभवताहेत, ही दहशत शेतकरी गेली चार दशके अनुभवतो आहे.

लाखो शेतकरी आत्महत्या करुन मेले, कोणाला त्याचे काहीच नाही. शेतकऱ्याचे मरण हेच सरकारचे धोरण हे स्व. शरद जोशींनी १९८०च्या दशकात सांगितले. अनेक पक्षांची सरकारे दिल्लीत सत्तेत आली गेली पण शेती विषयक धोरण बदलण्याची गरज कोणत्याच पक्षाला वाटली नाही. आताच पहा ना. देशाच्या वित्तमंत्री निर्मला सिताराम यांनी कोरोना संकटात बऱ्याच क्षेत्रांना मदत जाहीर केली. त्यात प्रत्येक शेतकऱ्याला दोन हजार देण्याची घोषणा मोठ्या थाटात केली. पण हे दोन हजार हे पहिलेच जाहीर केलेल्या ६०००च्या पॅकेज पैकी आहेत, हे नाही सांगितले. शेतीत होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी काहीच नाही. सर्वच पिक वाया गेल्यामुळे कर्जफेड करणे अशक्य आहे हे दिसते तरी कर्जात काही सवलतीचा विचार नाही. मोठ्या मोठ्या उद्योगांना मोठी मोठी पॅकेज जाहीर होतील शेतीला फक्त कर्ज वसुलीला तिन महिने मुदत वाढ. कोरोना गेला तरी आमचं मरणं चालूच राहील.

सर्व शहरांमध्ये सर्व नागरिकांना घरात बसवण्यासाठी सरकार जिवाचे रान करते आहे. घरात बसा बाहेर पडु नका, मास्क वापरा, सानिटायझर वापरा, साबणाने वारंवार हात धुवा सोशल डिस्टंसिंग पाळा वगैरे वगैरे. मात्र शेतकऱ्यानी शेतात जा. काम करा. शहरात अन्न धान्य पाठवा… का? शेतकरी काय माणसे नाहीत. हरभर्याचे पिक मशिन मध्ये मळायचे असेल तर सहा सात लोक लगतात कामाला. एकच पाटी सर्वजण हातोहात मशीन पर्यंत पोहोचवतात, शेजारी शेजारी उभे राहुन का‍म करावे लागते. कसे पाळायचे सोशल डिस्टंसिंग? ना मास्क ना सॅनिटायझर. कोरोनाची लागण झाली तर मरणारच. पण शेतकऱ्यानी काम केले पाहिजे. जनतेला खाऊ घालायचे आहे. मदतीच्या वेळेला मात्र शेतकऱ्याचा नंबर शेवटी. उरलं सुरलं तर शेतकऱ्याच्या वाट्याला.

कोरोना गेला तरी शेतकऱ्याचे मरण थांबण्याची शक्यता नाही. सरकारने शेतकऱ्याची लूट करण्यासाठी अनेक वेळा शेतीवर आघात केले. निर्यातबंदी, महागड्या आयाती, साठ्यावरील बंधने, प्रक्रिये वर बंधने आशी अनेकविध हत्यारे वापरली. पण पानिपतच्या रणंगणात पडलेल्या दत्ताजीराव शिंदें सारखे प्रत्येक वेळेस शेतकरी “बचेंगे तर और भी लढेंगे” म्हणत कष्ट करत राहिले. पण याचा परिणाम त्याला फाशी पर्यंत घेउन गेला. खरी परिस्थिती वेगळी आहे. कोरोनातुन शेतकरी वाचला तरी ” बचेंगे तो और भी मरेंगे ” अशीच आहे. शेतकरी रोज मरतो आहे.

शेतकरी संघटना कधी रडगाणे गात राहिली नाही. शेतकऱ्याच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत राहिली. या परिस्थितीतुन बाहेर पडन्याचा काय मार्ग आहे ते सरकारला सांगत राहिली. अंदोलने करुन, मोर्चे काढुन सरकारला लेखी स्वरुपात नव्या व्यवस्थेचे पर्याय सुचविले आहेत पण सत्ताधाऱ्याना फक्त पुन्हा सत्तेत येण्याशी मतलब असतो. देशाच्या हिताशी त्यांना काही देणे घेणे नाही मग तो कोणताही पक्ष असो. पक्षांना नेत्यांना नसेल देणे घेणे पण शेतकरी म्हणुन आपल्याला तर देणे घेणे आहे ना.
शेतकऱ्यानो, आता मरायचे नाही. आता लढायचे. सक्तीची वसुली करणातऱ्याना, कोरोनासाठी केली तशी गावबंदी करा.

लोक प्रतिनिधींना जाब विचारायची हिम्मत बांधा. हे लुटीचे धोरण बदलण्यासाठी जर यांनी लोकसभेत, विधानसभेत आवाज उठवला नाही तर शेतकरी आपल्याला परत निवडुन देणार नाहीत अशी दहशत त्यांच्या मनात निर्माण झाली तर शेतकरी विरोधी धोरण बदलेल व शेतकऱ्याचे मरण थांबेल. शेतकरी संघटना तुमच्या पाठीशी आहे.

-अनिल घनवट

- Advertisment -

ताज्या बातम्या