Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या राजकीय

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भाजपचे शक्तिप्रदर्शन; उ. महाराष्ट्रात 46 जागा: ‘शतप्रतिशत’चा नारा

Share

नाशिक । प्रतिनिधी

भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप येत्या 19 सप्टेंबरला नाशिकमध्ये होणार असून दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासाठी उपस्थित राहणार आहे. मोदी यांच्या उपस्थितीत भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शनाची रणनीती आखली आहे. गत विधानसभा निवडणुकीत नाशिकमध्ये मोदी यांची सभा झाली होती. त्याचा फायदा भाजपला झाला होता. तिच पुनरावृत्ती करण्याचे भाजपचे मनसुबे आहेत.

गतवेळी युती तुटल्यानंतर शिवसेना व भाजप हे दोन्ही मित्र पक्ष वेगवेगळे लढले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये तपोवन मैदानावर विराट सभा झाली होती. त्या सभेने वातावरण फिरले व शहरातील तीन जागांवर भाजपचे आमदार निवडून आले. मात्र, मागील पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. यंदाच्या विधानसभेला दोन्ही पक्षांची युती होण्याची चिन्हे आहेत. जागा वाटपाची चर्चा सुरू असून कोण किती व कोणती जागा लढविणार, याचा फैसला होणे बाकी आहे.

शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेनंतर आता भाजपची महाजनादेश यात्रा नाशिकमध्ये येणार आहे. यात्रेच्या माध्यमातून भाजप प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. या यात्रेचा समारोप नाशिकमध्ये होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी हे उपस्थित राहणार आहे. या सभेची जंगी तयारी पक्षाने सुरू केली आहे. तब्बल तीन लाख लोक सभेला उपस्थित राहतील, असे नियोजन आहे. उत्तर महाराष्ट्रातील पक्षाचे सर्व दिग्गज नेते हजर राहणार असून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार असून तशा सूचना भाजप पदाधिकार्‍यानां देण्यात आल्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांंनी मोदी यांच्या सभेचे शिवधनुष्य पेलले आहे.

विधानसभेच्या 46 जागांवर लक्ष
राज्यातील विधानसभेच्या 288 जागांपैकी 46 जागा या उत्तर महाराष्ट्रात आहे. त्यात नाशिक 15, अ. नगर 12, जळगाव 11, नंदूरबार 4 व धुळे 4 जागांचा समावेश आहे. यंदा या सर्व जागांवर विजय मिळवण्याची तयारी भाजपने केली आहे. युती तुटली तरी सर्व जागांवर भाजपचे कमळ फुलेल, असा दावा भाजपकडून केला जात आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उ. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व आठ जागांवर युतीने विजय मिळवला होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!