Saturday, April 27, 2024
Homeनगरभाजपच्यावतीने मंगळवारी धरणे आंदोलन

भाजपच्यावतीने मंगळवारी धरणे आंदोलन

महाविकास आघाडी सरकरने शेतकर्‍यांची फसवणूक केली : राजेंद्र गोंदकर

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – नवीन सरकार हे स्थगीती सरकार असून तिन्ही पक्षांची गंमत तीन माकडांसारखी झालेली आहे. जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकर्‍यांची फसवणूक केली असून आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहे.

- Advertisement -

याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने 25 फेब्रुवारी रोजी प्रत्येक तहसील कार्यालयासमोरधरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी शिर्डी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

उत्तर नगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्यावतीने महाराष्ट्र सरकारने घेतलेले तुघलकी निर्णय, शेतकर्‍यांची होणारी फसवणूक तसेच राज्यभरात महिलांवर होणारे अत्याचार यांंच्या निषेधार्थ दि. 25 फेब्रुवारी रोजी स. 11 ते दु. 3 या वेळेत जिल्हातील प्रत्येक तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन नियोजनासाठी काल शनिवार दि. 22 रोजी बैठकीचे आयोजन केले होते.

या बैठकीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर, माजी आ. स्नेहलता कोल्हे, रवींद्र बोरावके, संगमनेर तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, जि. प. गटनेते जालींदर वाकचौरे, अकोले तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, शिर्डीचे उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, राहाता तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजूरकर, कोपरगाव तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुनील वाणी, नेवासा तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, गजानन शेर्वेकर, रवींद्र कोते, रवींद्र गोंदकर, अशोक पवार, किरण बोर्‍हाडे, सचिन शिंदे, बालमभाई इनामदार, स्वानंद रासणे तसेच मंडलाध्यक्ष, मंडल सरचिटणीस, जिल्हा पदाधिकारीसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने बैठकीसाठी उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी सत्तेवर असलेल्या आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवत म्हणाले की, केंद्रात पारित केलेल्या सीएए कायद्याला समर्थन करणार्‍यांंचे आम्ही स्वागत करतो. भाजपचा विश्वासघात करून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकर्‍यांचा विश्वास खास केला आहे.

सरकार स्थापन करीत असताना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आणि आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रमुख नेत्यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना 25 हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी 50 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. पण महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू, अशा घोषणा करणार्‍या आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळले नाही. आघाडी सरकारची कर्जमाफी योजना ही शेतकर्‍यांची सरसकट फसवणूक करणारी आहे.

अ‍ॅसिड हल्ला, अल्पवयीन मुलींवर अत्याचार, बलात्कार, महिलांना जाळून टाकणे अशा घटना वाढू लागल्यामुळे महिला व तरुणी मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या भाजपा तीव्र निषेध करीत असून येत्या 25 फेब्रुवारीला तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे तसेच रवींद्र बोरावके यांनी आपले मनोगत व्यक्त करत सरकारचा तीव्र निषेध केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या