Saturday, April 27, 2024
Homeनगरजिल्हाध्यक्ष नियुक्त करताना भाजपचा प्रस्थापितांना ठेंगा

जिल्हाध्यक्ष नियुक्त करताना भाजपचा प्रस्थापितांना ठेंगा

गटबाजी संपुष्टात आणण्याचे प्रयत्न; मुंडे यांची अचानक लागली वर्णी

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हाध्यक्ष नियुक्त करताना भाजपने प्रस्थापित नेत्यांना ठेंगा दाखविल्याने पक्षातच आश्चर्य व्यक्त होत आहे. नगर दक्षिण जिल्ह्यात ऐनवेळी चक्रे फिरल्याने अशोक चोरमले यांच्या तोंडचा घास हिरावला होता. भाजपने आता जिल्ह्यात तीन जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उत्तर जिल्हाध्यक्ष हे नवीन पद निर्माण करून पक्षाचे जुने नेते राजेंद्र गोंदकर यांना तेथे संधी देण्यात आली. या पदासाठी उत्तरेतून जि. प. सदस्य जालिंदर वाकचौरे, जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते यांच्यासह माजी आ. बाळासाहेब मुरकुटे इच्छूक होते. मुरकुटे स्पर्धेत आल्याने निष्ठावंत आणि नवीन असा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

- Advertisement -

शुक्रवारी (दि. 10) इच्छा व्यक्त करणारे मुरकुटे यांनी यांनी दोन दिवसानंतर नेत्यांना खासगीत भेटून आपले नाव मागे घेतले होते, अशी चर्चा आहे. अर्थात याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पक्षाने मुरकुटे यांच्या इच्छेकडे दुर्लक्ष करत निष्ठावंत असलेले गोंदकर यांना संधी दिली.
नगर दक्षिणमध्ये माजी आ. शिवाजी कर्डिले यांचे नाव निवड बैठकीच्या दिवशी जोरदारपणे पुढे आले. मात्र बैठकीत कर्डिले यांनी इच्छाच व्यक्त न केल्याने मावळते अध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांचा मार्ग सोपा झाल्याचे मानले जात होते. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शनिवारी रात्री अकराच्या सुमारास औेरंगाबादहून जाताना बेरड यांच्या घरी भोजनासाठी आले.

माजी मंत्री राम शिंदे, माजी आ. कर्डिले, माजी खा. दिलीप गांधी यापैकी कोणालाही याची कल्पना नव्हती. त्यामुळे बेरड यांना नियुक्तीचे संकेत मिळाल्याची चर्चा होती. मात्र संघटनेच्या पातळीवर वेगळेच घडत होते. संघटनेने भाजयुमोचे माजी जिल्हाध्यक्ष असलेले अशोक चोरमले (पाथर्डी) यांचे नाव जवळपास अंतिम केल्याचे बोलले जात होते. मात्र अचानक जिल्ह्यातील एका नेत्याने त्यात हस्तक्षेप करत भाजयुमोचे माजी जिल्हाध्यक्ष असलेले अरुण मुंडे यांचे नाव पुढे केले. यासाठी पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचीही मदत घेण्यात आल्याचे समजते. इच्छुकांची नावे मागवून घेऊन त्यातील तीन नावे प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात आली. मात्र इच्छुकांच्या यादीत मुंडे नव्हते. त्यांनी निवडीच्या बैठकीवेळी इच्छा व्यक्त केलेली नव्हती. असे असतानाही चोरमले यांचे नाव मागे टाकण्यासाठी हे नाव पुढे आणण्यात आल्याची चर्चा आहे.

नगर शहर जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक महेंद्र गंधे यांची निवड करून पक्षाने शहरातील गटबाजी थोपविण्याचा प्रयत्न केला आहे. नगर शहरात मावळते शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी आणि माजी शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांच्यात वाद आहेत. शहरात या दोन नेत्यांचे गट कार्यरत आहेत. या वादामुळे महापालिकेतही पक्षाचे मोठे नुकसान झाले. एवढेच नव्हे, लोकसभा निवडणुकीतही ही गटबाजी प्रकर्षाने समोर आली होती. कार्यकर्तेही गटबाजीला वैतागले होते. दोन्ही गटाकडे नसलेले नगरसेवक गंधे यांची निवड करून गांधी यांना झटका दिल्याचे मानले जात आहे. गांधी यांनी या पदासाठी यावेळी इच्छा व्यक्त केली नसली तरी आपले चिरंजीव सुवेंद्र आणि खंदे समर्थक मनेष साठे यांना पुढे केले होते. दुसरे इच्छुक असलेले सचिन पारखी यांच्यावर गांधी विरोधी गटाचे, असा शिक्का आहे. त्यामुळेच गंधे यांच्या नियुक्तीला महत्त्व आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या