Friday, April 26, 2024
Homeनगरफडणवीस यांच्यासमोर पराभूत उमेदवारांनी केले विखे पिता-पुत्रांवर आरोप

फडणवीस यांच्यासमोर पराभूत उमेदवारांनी केले विखे पिता-पुत्रांवर आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात भाजपच्या पराभूत उमेदवारांच्या मागणीनुसार शुक्रवारी मुंबईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी पहिल्यांदा जिल्ह्यातील पराभूतांनी आ. राधाकृष्ण विखे पाटील आणि खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर समोरासमोर आरोप करत पराभवाचे खापर विखे पिता-पुत्रांच्या माथी फोडले. दरम्यान, विखे यांनी देखील झालेल्या आरोपांचे समर्पक उत्तर दिले. त्यानंतर फडणवीस यांनी नगरमधील भाजपच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी प्रदेश पातळीवरून समिती गठित करण्याचे जाहीर केले. ही समिती जिल्ह्यातील भाजपच्या पराभवाची कारणे शोधणार आहेत.

मुंबईत शुक्रवारी सकाळी 12 वाजता प्रदेश कार्यालयात जिल्ह्यातील पराभुतांची बैठक झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री फडणवीस, संघटनमंत्री विजय पुराणिक, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, आ. मोनिकाताई राजळे, आ. बबनराव पाचपुते, माजी मंत्री राम शिंदे, माजी आ. शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड आदी उपस्थित होते. बैठकीत पहिल्यांदा पराभूत उमेदवारांनी त्यांच्या पराभवाचे खापर विखे यांच्यावर फोडले. विजयी उमदेवारांनी त्यांच्या विजय हा पक्षामुळे झाल्याचे स्पष्ट केले. यावेळी विखे पिता-पुत्रांनी त्यांची बाजू स्पष्ट केली.

- Advertisement -

बैठकीनंतर माध्यमांशी बोलातांना माजी मंत्री शिंदे यांनी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या झालेल्या वाताहातीस विखे पिता-पुत्रच जबाबदार असल्याचा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी खा. डॉ. सुजय विखे आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी राधाकृष्ण विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रवेश करताना विखे पिता-पुत्राने नगर जिल्ह्यात 12-0 असा विजय मिळवू, असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने नगर जिल्ह्यात पाच जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे यावेळी विखे आणि वैभव पिचड आल्यानंतर ही संख्या सात व्हायला हवी होती. मात्र प्रत्यक्षात ही संख्या तीनवर आल्याचे शिंदे म्हणाले. त्यामुळे विखे फॅक्टर काहीही उपयोगी पडला नसल्याचे शिंदे म्हणाले.

दुसरीकडे राहुरी विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले भाजप नेते कर्डिले यांनी देखील आपली नाराजी बोलून दाखवली आहे. विखेंमुळे आणि त्यांच्या चुकांमुळे आमचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील भाजपचे जे आमदार पराभूत झाले, आहेत ते विखेंमुळेच. माजी मुख्यमंत्री फडणवीस विखे यांच्यावर कारवाई करतील अशी अपेक्षा असल्याचे कर्डिले म्हणाले.
…………..
नाराजी मीडियासमोर नव्हे, वरिष्ठांकडे मांडावी : विखे
बैठकीनंतर प्रतिक्रिया देतांना आ. विखे पाटील यांनी नाराजी वरिष्ठांकडे मांडायला हवी होती, मीडियासमोर नाही, असा टोला तक्रार करणार्‍या भाजप नेत्यांना लगावला. मला वाटत नाही की नाराजी माझ्याबद्दल आहे. पण ज्यांची नाराजी आहे, त्यांनी ती वरिष्ठांकडे मांडायला हवी होती. प्रसार माध्यमांसमोर सांगायची गरज नव्हती. पक्षाला फायदा झाला की नाही, त्याबद्दल वरिष्ठ सांगतील, असे मत त्यांनी यावेळी मांडले.
……………..

- Advertisment -

ताज्या बातम्या