Thursday, April 25, 2024
Homeनगरजिल्हाध्यक्षपदासाठी माजी खासदार, आमदार सरसावले

जिल्हाध्यक्षपदासाठी माजी खासदार, आमदार सरसावले

आज निवडी दिलीप गांधी, शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे चर्चेत; नगर शहरात जोरदार चुरस

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या तीन जिल्हाध्यक्षपदांसाठी माजी खासदार, माजी आमदारांनी बाह्या सरसावल्या आहेत. त्यामुळे आज होणार्‍या निवडीची प्रक्रिया नाट्यमय वळणावर पोहचली आहे. ऐनवेळी या पदासाठी कोण बाजी मारतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

- Advertisement -

भाजपमध्ये यापूर्वी नगर शहर जिल्हाध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशी दोन जिल्हाध्यक्षपदे होती. मात्र नव्या रचनेनुसार आता उत्तर जिल्हाध्यक्ष असे तिसरे पद निर्माण केले आहे. या तिनही पदांसाठी शुक्रवारी दि. 10 रोजी दुपारी साडेबारा वाजता कोहिनूर मंगल कार्यालयात निवडी होत आहेत. विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यासाठी निरीक्षक म्हणून आहेत. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमधील वातावरण अधिकच बिघडले आहे.

पराभूत झालेल्या बहुतांश आमदारांनी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर खापर फोडले आहे. पक्षश्रेष्ठीपर्यंत याच्या तक्रारी गेल्या आहेत. जिल्हाध्यक्ष नियुक्त करतानाही आ. विखे पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न होत आहे. माजी मंत्री राम शिंदे यांनी दक्षिण जिल्हाध्यक्षपदासाठी अचानक माजी आ. शिवाजी कर्डिले यांचे नाव पुढे आणले. या पदासाठी मावळते जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांचे नाव अग्रक्रमी होते. मात्र कर्डिले यांचे नाव आल्याने ते देखील अस्वस्थ आहेत. कर्डिले यांच्या नावास आ. विखे पाटील यांच्याकडून विरोध होऊ शकतो, असे बोलले जाते. तसेही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी आ. विखे पाटील यांचेच जवळचे संबंध असल्याने कर्डिले यांच्यासाठी अध्यक्षपदाचा रस्ता तेवढा सोपा नाही.

एकमेकांच्या जिरवाजिरवीत तिसरेच नाव पुढे येऊ नये, असाही प्रयत्न बेरड यांच्याकडून होत आहे.  शहर जिल्हाध्यक्षपदासाठी मावळते जिल्हाध्यक्ष माजी खा. दिलीप गांधी, नगरसेवक महेंद्र गंधे आणि माजी नगरसेवक सचिन पारखी यांची नावे चर्चेत आहेत. यातील पारखी आणि गंधे यांच्यात एकमत असून, त्यांच्यापैकी कोणीही झाले तरी चालेल, असे त्यांच्यात ठरल्याची चर्चा आहे. गांधी मात्र पद सोडण्यास तयार नाहीत. त्यांना अजूनही या पदावर संधी हवी आहे. ते सध्या शहर जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांच्याकडे सर्व सक्रीय सदस्यांचे फॉर्म आहेत.

जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीसाठी आवश्यक असलेले हे फॉर्म पारखी व गंधे यांना मिळण्यास विलंब होत असल्याचीही चर्चा आहे. मात्र ही तांत्रिक बाब असल्याने फारसे महत्त्व देण्यासारखे नसल्याचे सांगण्यात येते. शहरातील वाढते वाद लक्षात घेता या पदासाठी या तिघांव्यतिरिक्त तिसरेच नाव ऐनवेळी पुढे येण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. गांधी विरोधकांना फक्त गांधी नको आहेत. त्यामुळे पारखी, गंधे किंवा अन्य कोणीही चालेल, असाही सूर निघत आहे.

उत्तर जिल्हा अध्यक्षपदासाठी जि. प. सदस्य जालिंदर वाकचौर, राजेंद्र गोंदकर, नितीन कापसे आणि प्रकाश चित्ते यांची नावे चर्चेत होती. आज या भागातूनही माजी आ. बाळासाहेब मुरकुटे यांचे नाव पुढे केले जाऊ लागले आहे. मुरकुटे यांनीही आपल्या पराभवाचे खापर आ. विखे पाटील यांच्यावर फोडलेले आहे. त्यामुळे या निवडीतही आ. विखे यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. संगमनेरचे राजेंद्र देशमुख या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे. अकोले तालुक्यात अनेक वर्ष पक्षवाढीसाठी संघर्ष करणारे वाकचौरे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र श्रीरामपूरसारख्या मोठ्या शहरात पक्षाला संजिवनी देण्यासाठी प्रकाश चित्ते यांच्याही नावाचा आग्रह धरला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या