Wednesday, April 24, 2024
Homeनगरदुचाकी चोरीची बनवेगिरी पोलीस तपासात उघड

दुचाकी चोरीची बनवेगिरी पोलीस तपासात उघड

कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेची कामगिरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतून दुचाकी चोरी जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुचाकी चोरणे व चोरलेल्या दुचाकीचे बनावट कागदपत्रे तयार करून विक्री करणारी टोळी शहरात सक्रिय होती. शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांच्या पथकाने या टोळीच्या बुधवारी मुसक्या आवळल्या आहे. यामुळे शहरातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

अक्षय विठ्ठल जंगम (वय-20 रा. भोसले आखाडा, नगर), समीर खोजा शेख (रा. झरेकर गल्ली, नगर), गोरख भारत सुरवाडे (वय- 21 रा. शिवाजीनगर), आकाश अरुण दळवी (वय-21 रा. केडगाव) असे या दुचाकी चोरीच्या टोळीतील आरोपींची नावे आहेत. दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास करण्याच्या सूचना उपअधीक्षक संदीप मिटके व निरीक्षक विकास वाघ यांनी केल्या होत्या. उपनिरीक्षक शिरसाठ यांनी याचा छडा लावला. चौघांना अटक केली असली तरी यामध्ये आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहे.

दुचाकी चोरीच्या टोळीचा मुख्य सूत्रधार आरोपी अक्षय जंगम आहे. त्याने इतरांच्या मदतीने शहरातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचे नियोजन केले होते. दुचाकी चोरून व चोरलेल्या दुचाकीची विल्हेवाट लावण्याची पद्धतशीर व्यवस्था या भामट्यांनी केली होती.

चोरीच्या दुचाकीचे पूर्ण कागदपत्र बनावट करून ते खरे असल्याचे भासवून दुचाकीची विक्री केली जात असे. चोरीच्या अशा अनेक दुचाकी त्यांनी यापूर्वी बनावट कागदपत्रे तयार करून विक्री केल्या आहेत. टोळीतील आकाश अरुण दळवी (रा. केडगाव) हा पूर्वी एका खासगी फायनान्स कंपनीत कामाला होता.

दुचाकीची बनावट कागदपत्रे तयार करण्यामध्ये आरोपी अक्षय जंगम याने आकाश दळवीची मदत घेतली आहे. तो सुशिक्षित असल्याने व एका फायनान्स कंपनीत काम करत असल्याने त्याचा या बनवेगिरीचा पूर्ण अभ्यास झालेला होता. चोरीची दुचाकी आणल्यानंतर या दुचाकीचे बनावट आरसी बुक केले जायचे.

आरसी बुकच्या मुळ कलर कॉपीवर चोरीच्या दुचाकीचा इंजन व चेसी नंबर टाकला जायचा. नंबर टाकताना एका अंकाचा फक्त बदल केला जात असे. यामुळे सर्वसामान्य लोकांना दुचाकी खरेदी करताना हे बनावट आरसी बुक लक्षात येत नसल्याने ते चोरीची दुचाकी खरेदी करत असल्याचे तपासात पुढे आले आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहेत.

चोरट्यांनी शहरातील अनेक दुचाकींची चोरी केली आहे. दुचाकी चोरून त्यांची बनावट कागदपत्रे तयार केली जात होती. बनावट आरसी बुक सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येत नसल्याने चोरीच्या दुचाकींची मार्केटमध्ये विक्री होत होती. आरोपी पोलीस कोठडीत असून तपास सुरू आहे. तपासातून दुचाकी चोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.
– सतीश शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक, कोतवाली

- Advertisment -

ताज्या बातम्या