भेंड्यात छेडछाड करणार्‍या ट्रिपलसीट रोडरोमिओंना पोलिसांनी दिला चोप

jalgaon-digital
1 Min Read

कारवाईचे स्वागत

भेंडा (वार्ताहर) – भेंडा येथील शाळा-महाविद्यालय परिसरात मुलींची छेडछाड करणार्‍या, ट्रिपल सीट भरधाव मोटारसायकल चालविणार्‍या रोडरोमिओंना नेवासा पोलिसांकडून चांगलाच चोप देण्यात आला.

भेंडा येथील शाळा-महाविद्यालय परिसरात परीक्षेच्या वेळी मुलींना त्रास देणे, भरधाव ट्रिपल सीट मोटारसायकली पळविणे, मुलींना कट मारणे, विद्यालय व महाविद्यालय प्रवेशद्वारावरील सुरक्षा कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणे, मारण्याची धमकी देणे असे प्रकार टारगट व रोडरोमिओ मुलांकडून वरचेवर घडत आहेत.

शनिवार14 मार्च रोजी दुपारी महाविद्यालय प्रशासनाकडून पोलिसांना बाहेरील टारगट रोडरोमिओ कॉलेज परिसरात हिंडत असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेचच पोलीस निरक्षक रणजित डेरे, पोलीस कर्मचारी एस. टी. गायकवाड, श्री. यादव, श्री. गळधर, अमोल बुचकूल हे तात्काळ कॉलेज परिसरात दाखल झाले.

त्यानंतर काही रोडरोमिओनी धूम ठोकली तर काहींना पोलिसांच्या महाप्रसादाला सामोरे जावे लागले. रोडरोमिओ वरील कारवाईबद्दल नेवासा पोलिसांचे भेंडा परिसरातून अभिनंदन होत आहे.

शाळा व महाविद्यालय परिसरात गुंडगिरी करणारे, दहशत निर्माण करणारे, मुलींची छेडछाड करणारे रोडरोमिओ आढळून आल्यास नेवासा पोलीस स्टेशनशी संपर्क करा. त्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात येईल.
– रणजीत डेरे, पोलीस निरीक्षक, नेवासा

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *