Saturday, April 27, 2024
Homeनगरमायबाप सरकारला प्रशांतची आर्त हाक कधी ऐकू येईल?

मायबाप सरकारला प्रशांतची आर्त हाक कधी ऐकू येईल?

विरोधकांनी बटुळे कुटुंबाच्या सांत्वनासाठी पायधूळ झाडली, मात्र सत्ताधारी फिरकेनात

खरवंडी कासार – एकीकडे ‘बळीराजा करू नको आत्महत्या’ अशी कविता सादर करताना दुसरीकडे पित्यानेच आत्महत्या करून आपला जीवन प्रवास संपुष्टात आणला. विरोधी पक्षातील नेते आले, सांत्वन केले, मदतही जाहीर केली. मात्र मायबाप सरकारला मात्र अद्याप मल्हारी बटुळे यांच्या कुटुंबीयांची साधी विचारपूस करण्यासही अद्याप वेळ मिळालेला नाही. यामुळे शेतकर्‍यांमध्ये संताप आहे.

- Advertisement -

पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील मृत शेतकरी मल्हारी बटुळे यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार मोनिका राजळे आले. एक लक्ष रुपयांची मदत जाहीर करून मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. त्या पाठोपाठ माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांना भारजवाडी येथे पाठवून व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बटुळे कुटुंबीयांशी संवाद साधून आस्थेने विचारपूस करत दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली.

भालगाव गटाच्या जि. प. सदस्या प्रभावती ढाकणे, शिवसेनेचे शशिकांत गाडे, अनिल कराळे, उद्धव चितळे, जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनीही भेट देऊन 50 हजार रुपयांची मदत करुन कुटुंबीयांना आधार दिला; परंतु एक आठवडा उलटून गेला तरीसुद्धा महाविकास आघाडी सरकारमधील एकही मंत्री, आमदार-खासदार किंवा सरकारचा प्रतिनिधी मल्हारी बटुळे यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी फिरकले नसल्याने भगवानगड परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे अहमदनगर जिल्ह्याला तीन मंत्री लाभलेले असताना एकाही मंत्र्यांना बटुळे कुटुंबीयांना भेटण्यासाठी अद्याप वेळ मिळालेला नाही. यामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचाही समावेश आहे.

महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी शेतकर्‍यांंचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती. परंतु दोन लाखांपर्यत कर्ज माफ करुन शेतकर्‍यांंच्या तोंडाला पाने पुसली, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी केला. मध्यम व दीर्घ पीककर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांना बॅका अजूनही तगादा लावत आहेत. अवकाळी पाऊस, दुष्काळ, नापिकी या नैराश्येतूनच शेतकरी आत्महत्या करतो. यासाठी शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करून सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

अनेक सेवाभावी संस्थांनी मल्हारी बटुळे यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची तयारीही दर्शविली. परंतु महाविकास आघाडी सरकार मल्हारी बटुळे यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी तर सोडा मदत करण्याचीही तयारी दर्शवत नसल्याने सर्वसामान्य शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. प्रशांतने लिहिलेल्या ‘बळीराजा नको करू आत्महत्या’ या कवितेची आर्त हाक वडिलांना ऐकू गेली नाही. त्याचे पितृछत्र हरपले.

आता या कुटुंबीयांच्या व प्रतिभावंत मुलांच्या शिक्षणासाठी व आधारासाठी सरकार मायबाप कधी मदतीला धावून येईल, हा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशांतची आर्त हाक मुंबईत बसलेल्या मंत्र्यांना अद्याप ऐकू गेली नाही. आता मल्हारी बटुळे याच्या तीन चिमुकल्या गोंडस मुलांची आर्त हाक सरकारमधील मंत्र्यांना ऐकू येण्यासाठी त्यांना राजधानी दिल्ली व बारामतीच्या आदेशाची प्रतीक्षा आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या