Friday, April 26, 2024
Homeनगरबारागाव नांदूरला दुचाकीचोर जेरबंद

बारागाव नांदूरला दुचाकीचोर जेरबंद

राहुरी शहर परिसरातून 13 दुचाकी चोरल्याची कबुली । पैसे घेऊन पुन्हा मालकालाच गाडी देणारी टोळी

राहुरी (प्रतिनिधी)- चोरलेल्या दुचाकीच्या मालकांकडे पैशासाठी मागणी करणार्‍या आरोपी आकाश आहेर (रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी) यास बारागाव नांदूर शिवारातून पकडण्यात आले. राहुरी पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात तो अडकला.

- Advertisement -

दरम्यान, त्याच्या मुसक्या आवळून त्यास पोलीस स्टेशनला आणून त्याची सखोल चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार गणेश शेटे, तसेच सनी बाचकर यांनी मिळून राहुरी शहर परिसरातून 13 दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. त्यापैकी एकूण 9 दुचाकी आत्तापर्यंत त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी चार दुचाकी त्यांनी मुळा धरणात खोलवर पाण्यात टाकल्याची कबुली दिलेली आहे.

राहुरी शहर परिसरात दुचाकी चोर्‍या होऊ लागल्याने त्यास प्रतिबंध बसावा व गुन्हेगारांना पकडून शासन व्हावे या उद्देशाने पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी राहुरी शहर परिसरातील त्यांच्या गुप्त बातमीदार यांना सतर्क करून अशाप्रकारे दुचाकी चोरी करून मालकांकडे दुचाकी परत देण्यासाठी पैशाची मागणी करणारे गुन्हेगार यांच्यावर पाळत ठेवून माहिती कळविण्यास सांगितले होते. त्याचप्रमाणे चोरी झालेल्या दुचाकीचे मालक यांना सूचना देऊन मार्गदर्शन करून अशा प्रकारचे गुन्हेगार पोलिसांना पकडून देण्यास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने दुचाकी चोर्‍या करून पुन्हा मालकांशी संपर्क साधून चोरीची दुचाकी परत देण्याकरीता पैशाची मागणी करणारी टोळी कार्यरत असल्याबाबतची माहिती गुप्त बातमीदाराने दिली. त्यानुसार सापळा लावून कार्यवाही करण्याकरीता राहुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत राक्षे, पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके पोहेका संजय पठारे, पोलीस नाईक, अमित राठोड, पोलीस नाईक शिवाजी खरात, पोलीस नाईक निलेश मेटकर, पोलीस कॉन्स्टेबल सचिन ताजणे, पोलीस कॉन्स्टेबल आजिनाथ पाखरे व पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण अहिरे यांचे पथक तयार करून सापळा लावण्यात आला. त्यात आरोपी अलगद अडकला. पुढील तपास सपोनि बागुल हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या