Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रचिपळूणच्या वाशिष्ठी खाडीत ‘बॅकवॉटर फेस्टिव्हल’

चिपळूणच्या वाशिष्ठी खाडीत ‘बॅकवॉटर फेस्टिव्हल’

चिपळूण:

येथील वाशिष्ठी नदीच्या तीरावर, शहराचा पहारेकरी असलेल्या किल्ले गोविंदगडाच्या पायथ्याशी, गोवळकोट धक्का परिसरात ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ने 28 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत ‘चिपळूण बॅकवॉटर फेस्टिव्हल आणि क्रोकोडाइल सफारी 2019’चे आयोजन करण्यात आले आहे. फेस्टिव्हलचे उद्घाटन 28 रोजी सकाळी 10.30 वाजता आमदार शेखर निकम यांच्या हस्ते, पर्पल टूर्सचे संजय नाईक, ग्लोबल चिपळूण टुरिझमचे चेअरमन श्रीराम रेडिज यांच्या प्रमुख उपस्थितीत गोवळकोट धक्का येथे होईल.

- Advertisement -

‘क्रोकोडाइल सफारी’चा वैविध्यपूर्ण अनुभव देणारा हा संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे. या माध्यमातून चिपळूण आणि परिसरातील पर्यटनसमृद्धीचा सुगंध सर्वदूर पसरण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. फेस्टिव्हल काळात पर्यटकांसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बोटिंग सुविधा उपलब्ध असेल. पर्यटकांना 1 तासांची फेरी दिली जाणार आहे. क्रोकोडाइल सफारीमध्ये खाडीकिनारी निवांत वाळूत पहुडलेल्या मगरींचे दर्शन, विविध जलचर आणि पक्ष्यांचे दर्शन घडेल. पर्यटकांसाठी बोटिंगसोबत एक/दोन दिवसांच्या विशेष सहली, राहाण्यासाठी टेंट, जीपसफारी, किल्ले गोविंदगड दर्शन, पक्षी निरीक्षण, नेचरट्रेल, वस्तूसंग्रहालय-कलादालन भेट कॅम्पफायरची उपलब्धी मिळणार आहे.

वाशिष्ठीतील आयलँड आणि गोवळकोट धक्यावर पर्यटकांसाठी कोकणी जेवण, स्नॅक्स, आईसक्रिम आदि स्टॉल असणार आहेत. धामणवने येथील एस. आर. जंगल रिसोर्ट येथेही पर्यटकांना आनंद घेता येईल. सन 2014 पासून वर्षातून दोन वेळा नववर्ष स्वागत आणि उन्हाळी पर्यटन हंगामात हा महोत्सव आयोजित केला जात असून, किमान सात ते आठ हजार पर्यटकांची सतत उपस्थिती लाभते आहे. चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील हिरवेगार निसर्गवैभव, इथल्या रमणीय खाड्या, सागरकिनारे, गड-किल्ले, प्राचीन मंदिरे यांसह चिपळूण परिसरातील वाशिष्ठी खाडी, तिच्यातील छोटी-मोठी बेटे, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, कोकणी खाद्यपदार्थ आणि येथील समृद्ध लोकजीवनाचा अनुभव पर्यटकांना मिळावा, अशी व्यवस्था या निमित्ताने करण्यात येत असते. ‘क्रोकोडाइल सफारी’साठी अद्ययावत बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. या काळात खाडीतील वातावरण पर्यटकांनी गजबजणार आहे.

‘कोकणच्या निसर्गावर नितांत प्रेम करणाऱ्या, आपल्या नियोजित नववर्ष आनंदोत्सवासाठी कोकणात येण्याचे नियोजन करीत असलेल्या राज्यभरातील पर्यटनप्रेमींनी चिपळूणातील या वैशिष्ट्यपूर्ण फेस्टिव्हलला उपस्थित राहून आपला नववर्षाचा आनंद द्विगुणीत करावा,’ असे आवाहन ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या