Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

बॅक वॉटरच्या पाणी उपशाला न्यायालयाच्या आदेशामुळे लगाम

Share
बॅक वॉटरच्या पाणी उपशाला न्यायालयाच्या आदेशामुळे लगाम, Latest News Back Water Court Order Farmers Scared Ahmednagar

जलसंपदाकडून गुन्हे दाखल करण्यास सुरूवात

अहमदनगर (प्रतिनिधी)- जायकवाडी बॅक वॉटरमधून विजेच्या मोटारीने पाण्याचा अनाधिकृत उपसा करणार्‍यांवर जलसंपदा विभागाने गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. नेवासा पोलीस ठाण्यात यासंदर्भात शनिवारी रात्री गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जलसंपदा विभागाचे अधिकारी कामाला लागले आहेत.

जायकवाडीच्या बँक वॉटरमधील बेकायदा पाणी उपसा थांबवावा यासाठी 2018 मध्ये दाखल झालेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. यात न्यायालयाने गंभीर दखल घेत याप्रकरणी झालेल्या जुजबी कारवाईवर असमाधान व्यक्त करत अनाधिकृत पाणी उपश्याबाबत पाटबंधारे खात्यातील अधिकार्‍यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यामुळे अधिकार्‍यांचे धाबे दणाणले असून त्यांनी अनाधिकृत पाणी उपसा करणार्‍या मोटारी जप्त कऱण्याचा व संबंधीत शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे.

जायकवाडीच्या फुगवट्याखाली नेवासा, शेवगाव, पैठण व गंगापुर या चार तालुक्यातील शेतकर्‍यांकडून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत असल्याच्या तक्रारी असल्याने यापुर्वीच्या सरकारने पाण्याचे नियमन करुन अनाधिकृत उपश्याला निर्बंध घालण्याचा प्रयत्न केला होता. 2016 मध्ये व 2018 मध्ये दोनवेळा याबाबत सरकारने आदेश काढले. मात्र, पाटबंधारे अधिकार्‍यांकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याने संबंधीत शेतकर्‍यांवर कारवाई करावी, अशी याचिका संजय भास्कर काळे यांनी 2018 मध्ये उच्च न्यायालयात दाखल केली होती.

त्यावर संबंधीत अधिकार्‍यांनी पैठण तालुक्यातील 20 शेतकर्‍यांवर कारवाई केल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केले होते. मात्र, न्यायालयाने या कारवाईवर असमाधान व्यक्त केले. शेकडो हजारो इलेक्ट्रीक मोटारी अनाधिकृत उपसा करत असून हे पाटबंधारे अधिकार्‍यांच्या सहभागाशिवाय कसे शक्य आहे, अशी शंकाही न्यायालयाने उपस्थित करत प्रसंगी न्यायालयाला सुध्दा स्थळ भेट देऊन तपासणी करावी लागेल, असा इशारा दिला होता.

त्यामुळे पाटबंधारे, महसुल व पोलिस खात्यातील अधिकारी खडबडून जागे झाले असून त्यांनी भरारी पथके तयार करुन नेवासा, शेवगाव, पैठण व गंगापूर या चारही तालुक्यात धडक कारवाईला सुरुवात केली आहे. परवानगी नसलेल्या वीजेच्या मोटारी व पाईपलाईन असलेल्या शेतकर्‍यांवर तसेच ज्यांनी परवानगीचे नुतनीकरण केले नाही, अशा शेतकर्‍यांवर कारवाई सुरु करुन गुन्हे दाखल केले जात आहे.

त्यांचा वीज पुरवठा खंडित करुन मोटीर जप्त करण्याची मोहिम सुरु केली आहे. नेवासा पोलीस ठाण्यात या प्रकरणी शनिवारी रात्री उशीरा दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरिक्षक रणजित देरे यांनी दिली.

अधिकार्‍यांचा नुतनीकरणास नकार; बॅकवॉटर परिसरातील शेतकरी धास्तावले

बॅक वॉटरच्या पाणी उपशाला न्यायालयाच्या आदेशामुळे लगाम, Latest News Back Water Court Order Farmers Scared Ahmednagar

देवगडफाटा (वार्ताहर)- कनेवासा तालुक्यात जायकवाडी फुगवट्यातून परिसरातून विनापरवाना पाणी उपसा करणार्‍या मोटारी जप्तीची कारवाई दुसर्‍या दिवशीही सुरूच होती तालुक्यातील गोधेगाव येथे दि 8 रोजी एक मोटार जप्त करण्यात आली. अनेकांनी विना परवाना पाणी उपसा करणारे मोटार पंप उचलून आणल्याने कारवाई करनार्‍या पथकाला लवकरच माघारी फिरावे लागले.

दि 7 रोजी पथकाने 6 मोटार पंप 17 स्टार्टरची जप्ती केली होती. जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या जलाशय फुगवटा नेवासा शाखेकडून महसूल, वीज वितरण कंपनी व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने कारवाई केल्याने परिसरात शेतकर्‍यांची एकच खळबळ उडाली. ही कारवाई 30 सप्टेंबर पर्यत सुरच राहणार असल्याचे शाखाधिकारी विजय काकडे यांनी सांगितले.

जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे अंतर्गत नेवासा तालुक्याला 1200 हेक्टर जमिनीसाठी पाणी परवाने देण्यात आलेले आहेत हा कोठा आता संपला आहे. त्यात हे परवाने दोन टप्प्यात देण्यात आले होते.

राज्य सरकारने नेवासा तालुक्याचा 1200 हेक्टर पाणी परवाना वाढवला पाहिजे त्यामुळे अजून पाणी परवाने देता येतील. अशी मागणी शेतकर्‍यां कडून केली जात आहे. नेवासा तालुक्यात एकुण 3500 परवानाधारक असून त्यापैकी 1500 परवान्यांची मुदत संपली आहे. त्यांचे नुतनीकरण होत नसल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

मोटारीच जप्त होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी पसरलि आहे उभे पीके धोक्यात आली आहे व नूतनीकरणासाठी अनेकांना धावपळ करावी लागत आहे.

या प्रसंगी एम. एल. बोराडे, कामगार तलाटी मलदोडे, ए. एस. गरुड, एस. आर. पांडव, व्ही. के. सातपुते, डी. यू. गाडेकर, एस. जी. पवार, ए. सी. तुजारे, वीज वितरणचे वाघ, पोलीस अधिकारी गणेश गलधर, गणेश इथापे, अशोक नागरगोजे तसेच महसूल विभागाने अधिकारी उपस्थित होते.

 

 

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!