Thursday, April 25, 2024
Homeनगरयंदाही बचत गटांच्या प्रदर्शनाला नगरकरांचा प्रतिसाद

यंदाही बचत गटांच्या प्रदर्शनाला नगरकरांचा प्रतिसाद

तुफान गर्दी : उलाढाल 90 लाखांपर्यंत, मायमाउलीच्या चेहर्‍यावर आनंद

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आयोजित साईज्योती महिला बचत गटांच्या प्रदर्शनात तिसर्‍या दिवशी दिवसभर तुफान गर्दी होती. शनिवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने सायंकाळी मोठी गर्दी झाली. तिसर्‍याअखेर प्रदर्शनातील वस्तूंच्या विक्रीचा आकडा 90 लाखांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. दरम्यान, बटव्यात पैसे खुळखुळ्याने मायमाउलीच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता.

- Advertisement -

दरवर्षी प्रमाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संपूर्ण टीमने मोठे कष्ट घेत जिल्हास्तरावरील प्रदर्शन यशस्वी केले आहे. तीन दिवसात 90 लाखांहून उलाढाल हे त्याचे फळ आहे. ताज्या पालेभाज्या, गावरान कड धान्य, विविध प्रकारातील पापड, सेंद्रिय गूळ, लाकडी घाण्यावरील तेल यासह विविध तयार वस्तू, साहित्य, वेगवेळी भागातील गरम मसाले याच्या खरेदीतून बचत गटांच्या महिलांनी आर्थिक प्रगती साधली. यासह प्रदर्शनातील खाऊ गल्लीत गेल्यावर किती खाऊ अन् कुठे पाहू अशीच अवस्था झाल्याशिवाय राहत नव्हती.

प्रदर्शनात 300 बचत गटांंचे स्टॉल्स आहेत. या ठिकाणी अकोले तालुक्यातील निरंकारी महिला बचत गटाने तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. या ठिकाणी हातसडीचा तांदूळ, इंद्रायणी, बासमती हातसडी, काळभातच्या सुमारे 10 पोते तांदळाची विक्री झालेली आहे. या ठिकाणी 60 रुपये ते 110 रुपयांपर्यंत किलोपर्यंत तांदूळ विक्रीसाठी आहे. जळगावच्या बचत गटाच्या गव्हाच्या लाह्या देखील सर्वांच्या पसंतीला उतरल्या. पारनेर तालुक्यातील ढोकी येथील मुक्ता बचत गटाला वर्षभरासाठी हाताला रोजगार मिळाला आहे.या गटातील सदस्या दररोज 200 लोकरीच्या गाद्या तयार करतात. यासह पारनेर, शेवगाव, पुणे, पाथर्डी या तालुक्यातून पांढरी घोंगडी, लोकराची उशी तयार करून राज्यभर विक्री करत आहेत.

कोपरगावच्या सुरेगावमधील अंबिका बचत गटाचे विविध मसाले नगरकरांना भावत आहेत. अकोले तालुक्यातील बचत गटाच्या महिलांनी आयुर्वेदिक रक्त रोहिडा विक्रीसाठी आणाला असून बहुगुणी वनस्पतीची काडी जखम झालेल्या, मार लागलेल्या ठिकाणी उगाळून लावल्यास आराम मिळत असल्याचे सांगितले.

या रक्त रोहिड्याला मोठी मागणी दिसून आली. नगर तालुक्यातील शिंगवेनाईक येथील कस्तुरी बचत गटाने लाकडी घाण्यावरील तेल, ओल्या खोबर्‍याचे ते पॉकिंगसह या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. वर्षभर या गटाला आता ऑर्डर मिळत असल्याचे गटातील महिलांकडून सांगण्यात आले. श्रीरामपूरच्या बेलापूर येथील विश्वकर्मा बचत गटाने लोखंडी साहित्य विक्रीसाठी आणले होते. या साहित्याला मोठी मागणी होती.

बचत गटांकडेही ‘फोन पे’
बचत गटातील महिला आता आधुनिक झाल्या आहेत. अनेक गटांनी या ठिकाणी रोखीने व्यव्हाराऐवजी फोन पे चा वापर करत असल्याचे दिसून आले. यामुळे सुट्ट्यापैशाासह रोख रक्कम बाळगण्याच्या चिंता या महिलांना राहिलेली नाही. या ठिकाणी पोस्ट खात्याने दोन दिवसात केवळ आधारकार्ड नंबर 50 हून पोस्ट खाती या ठिकाणी सुरू केली.

आमटीच्या जीवावर चार लाखांचे कर्ज फेडले
प्रदर्शनातील खाऊगल्ली शेवगाव तालुक्यातील संत सावता बचत गटाच्या सविता काळे यांनी शिंगोरी आमटी आणि भाकरीचा स्टॉल लावलेला आहे. काळे यांची आमटी एवढी खमंग आहे की नगरकर त्याचा आस्वाद घेतल्या शिवाय राहत नाहीत. वर्षभर काळे या शेवगाव तालुक्यात धार्मिक सप्ताह, जागरण गोंधळात ही आमटी तयार करून देतात. या आमटी तयार करण्याच्या कौशल्यावर काळे यांनी चार लाख रुपयांची चार चाकी वाहनाचे कर्ज फेडल्याचे अभिमानाने सांगितले. मठ, मूग आणि हरभर्‍यापासून ही आमटी त्या तयार करतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या