Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

रस्ते, पूल बांधकामात आता कृत्रिम वाळूचा वापर

Share

नाशिक । भारत पगारे

बेकायदा वाळू उत्खनन आणि उपशाने नदी नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहात बाधा पोहोचत आहे. उशिरा का होईना आता शासनाला याप्रश्नी जाग आली असून यापुढे शासकीय बांधकाम अर्थात रस्ते, पूल व इमारती बांधतांना त्यात 20 टक्के कृत्रिम वाळूचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. ही कृत्रिम वाळू खाणीतील दगड अणि पाडकामे केलेल्या काँक्रिट व विटांपासून बनविली जावी, असे आदेश शासनाकडून देण्यात आले आहे.

सध्या सर्वत्र बांधकामातील काँक्रिटसाठी लागणार्‍या वाळूच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. या वाळूची मागणी ही उपलब्ध नैसर्गिक वाळूच्या व्यस्त प्रमाणात वाढत चालली आहे. परिणामी वाळूचे बेकायदा उत्खनन वाढून नदी- नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहात बाधा पोहोचण्याचे प्रकार वाढले आहे. अशा स्थितीत नैसर्गिक वाळूचा बांधकामातील वापर कमी करून त्या ऐवजी कृत्रिम वाळूचा वापर वाढविणे काळाची गरज आहे असे शासनाच्या आता कुठे लक्षात आले आहे. त्यानुसार आता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हाती घेण्यात येणार्‍या बांधकामामध्ये एकूण 20 टक्के कृत्रिम वाळूचा वापर अनिवार्य राहणार आहे. तर कृत्रिम वाळू वापरण्यासाठी संबंधित मुख्य अभियंत्यांंची पूर्व परवानगी घेणहीे आवश्यक राहणार नाही.

दरम्यान, आजही कृत्रिम वाळूचा वापर म्हणावा तितक्या प्रमाणात वाढलेला नाही. नैसर्गिक वाळू न मिळाल्याने रस्ते व इमारतींची कामे रेंगाळलेली असल्याचेही आढळून आले आहे. त्यामुळे या पुढे रस्ते, पूल आणि इमारती बांधकाम करतांना या कृत्रिम वाळूचा वापर अनिवार्य असणार आहे.

अशी लागणार कृत्रिम वाळू

ही कृत्रिम वाळू आयएस 383 : 2016 मधील खंड 3.1.2 मध्ये कृत्रिम वाळूच्या व्याख्येनुसार अ‍ॅटोमिक व्हर्टिकल शाफ्ट इंम्पॅक्टर या मशीनमधून चांगल्या प्रतीचा दगड भरडून उत्पादीत केलेली अथवा पाडकाम केलेल्या काँक्रिट, वीट व मॉर्टर किंवा अन्य सामुग्रीतून निर्मित केली असावी.

शासकीय प्रयोग शाळेतूनच चाचण्या

बांधकाम सुरू करण्यापूर्वी कृत्रिम वाळूच्या स्त्रोतास कार्यकारी अभियंत्यांनी लिखीत स्वरूपात मान्यता द्यावी किंवा आदेशाची प्रत अधिक्षक अभियंत्यांकडे पाठवावी. या वाळूचा वापर करण्यापूर्वी अन्य आवश्यक चाचण्यांसह काँक्रिटचे मिक्स डिझाईन शासकीय प्रयोग शाळेतूनच करून घेण्यात यावे.

दरसूची अद्ययावत होणार

कृत्रिम वाळूचा वापर ज्या बाबींसाठी प्रस्तावित करण्यात येईल, अशा बाबींसाठीच्या कमी दरांबाबत अंदाजपत्रकानुसार दोन्ही साहित्यांचे बेसिक दर व साहित्याच्या वाहतूकीचे अंतर विचारात घेऊन अधिक्षक अभियंत्याना दरसूची अद्ययावत करावी लागणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!