Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

सुगंधी तंबाखुला गुटख्याची जोड

Share
भिंगारमध्ये ‘सुगंधी तंबाखू’वर छापा, Latest News Bhingar Aromatic Tobacco Raid Ahmednagar

अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांचे एकमेकांकडे बोट

अहमदनगर- जिल्ह्यात सुगंधी तंबाखुबरोबर बंदी असलेल्या गुटख्याची देखील छुप्यापद्धतीने सर्रास विक्री सुरू आहे. सुगंधी तंबाखू आणि माव्याबरोबरीने लाखो रुपयांची गुटख्याची उलाढाल होत असून नगर शहरासह उपनगर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पानटपर्‍यांवर सहजासहजी गुटखा उपलब्ध आहे. गुटखा, सुगंधी तंबाखू विक्रीबाबत अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासन गप्प का? असा प्रश्न असून हे अवैध धंदे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस आणि अन्न औषध प्रशासनात समन्वय गरजेचा आहे.

सुगंधी तंबाखुबरोबरच गुटख्याची वाहतूक देखील छुप्यापद्धतीने सुरू आहे. छुप्यापद्धतीने सुरू असलेल्या गुटख्याचे दर हे देखील चढे आहेत. सुगंधी तंबाखुचे देखील तसेच आहे. त्यामुळे या धंद्याला मरण नाही. त्यातच सरकारने यावर बंदी घातल्याने या धंद्याला अधिकच तेजी आली. या धंद्याला आता राजाश्रय देखील मिळू लागला आहे.

राजकीय पक्षातील हस्तक या धंद्यात उतरले आहेत. हेच हस्तक परराज्यातून सुगंधी तंबाखुची आणि गुटख्याच्या मालाची फिल्डिंग लावत असून ते वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून ‘खाकी’शी जवळीक साधून आहेत. खाकीला जाळ्यात ओढल्याने सुगंधी तंबाखू, गुटखा ज्या ठिकाणी उतरायचा आहे, त्या भागातील बीट मार्शलपासून अंमलदारांपर्यंत सर्वांचा ते समावेश करून घेताना दिसत आहेत. यामुळे सर्वांचे मार्ग सुकर होताना दिसत आहे.

नगर शहरात आणि त्यालगतच्या उपनगरांत सुगंधी तंबाखू आणि गुटख्याचा हा गोरख धंदा एवढा तेजीत आहे की, त्यात कोण-कोण गुंतले आहे, याची चर्चा जोरात सुरू आहे. या धंद्यात काहीजण कसे भागीदार बनले आहेत, याचीही चर्चा आहे. त्यामुळे अशा धंद्यांवर पोलिसांकडून कारवाई होताना दिसत नाही. कारवाईची वेळ आल्यावर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सहकार्य करत नाहीत, असे सांगितले जाते. ते त्यांचे अधिकारी आहेत, असे सांगून वेळ मारून नेली जाते.

अन्न व औषध प्रशासनातील अधिकार्‍यांचे देखील असेच म्हणणे येते. पोलीस बंदोबस्तावर असतात. कारवाईच्यावेळी ते मिळत नाहीत. परिणामी माहिती लिक होते. ही माहिती लिक करणारे देखील खाकीमधीलच असतात, असे हे अधिकारी खाजगीत खुलेपणाने बोलतात. त्यामुळे या धंद्याला एकप्रकारे खाकीचेच बळ मिळते आहे, असे चित्र आहे.

या व्यसनाची अशी लत आहे, की तिला वेळ काळ नसतो. सरकारने या गुटखा आणि सुगंधी तंबाखुवर जेव्हापासून बंदी घातली आहे, तेव्हापासून त्याच्या विक्रीत तेजी आली आहे. हा अवैध व्यवसाय रोखण्यासह व्यसनापासून दूर राहण्यासाठी मानसिक पातळीवर शासनाला मोठे प्रयत्न होणे गरजेचे आहे.
-प्रा. डॉ. प्रतिमकुमार बेदरकर, अभ्यासक, मानसिक आजार.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!