Wednesday, April 24, 2024
Homeनगरएप्रिलचे वेतन न मिळाल्याने ग्रामसेवक आर्थिक अडचणीत

एप्रिलचे वेतन न मिळाल्याने ग्रामसेवक आर्थिक अडचणीत

संपूर्ण वेतन त्वरित अदा करण्याची ग्रामसेवक युनियनची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील 1 हजार 200 ग्रामसेवक ग्रामीण भागात अहोरात्र परिश्रम घेत आहेत. जीव धोक्यात घालून काम करणारे ग्रामसेवक एप्रिल महिन्याचे वेतन अद्याप न मिळाल्याने आर्थिक अडचणीत आले आहेत. सरकारने मार्च 2020 चे वेतनही पूर्ण अदा केलेले नाही, त्यात आता एप्रिल महिन्यांचे पूर्ण वेतन रखडले आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांचे संपूर्ण वेतन खात्यात वर्ग करावे, अशी मागणी राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे व जिल्हा सरचिटणीस अशोक नरसाळे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

- Advertisement -

लॉकडाऊन कालावधीमध्ये ग्रामसेवक आपापल्या मुख्यालयात थांबून जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन, पोलिस यंत्रणा, ग्रामस्थ यांच्या समन्वयातून ग्रामीण भागांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून अनेक प्रकारच्या उपाययोजना करीत आहेत. त्याचा परिपाक म्हणून ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होत आहे. तो भविष्यात वाढू नये, म्हणून खबरदारी घेतली जात आहे.

जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात पुन्हा मुंबई व अन्य शहरांमधून मोठ्या प्रमाणात स्थलांतरित नोकरदार, व्यावसायिक, मजूर, युवक, विद्यार्थी येत आहेत. त्यांचे मेडिकल तसेच संस्थात्मक विलगीकरण या बाबींची पूर्तता ग्रामसेवक अहोरात्र करत आहेत. अशा परिस्थितीत ग्रामसेवकांना कुटुंबासाठीही वेळ न देता येत नाही. त्यात वेतन नसल्याने पैशाची अडचण निर्माण झालेली आहे.

अन्य कर्मचार्‍यांचे पगार
यामुळे ग्रामसेवकांमध्ये प्रचंड नैराश्य प्राप्त झालेला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांनी तात्काळ लक्ष घालून पगाराचा प्रश्न निकाली काढावा. जिल्ह्यातील आस्थापनेवरील सर्व कर्मचार्‍यांचे पगार झाले आहेत. मात्र, गाव पातळीवरील ग्रामीण भागात कार्यरत कर्मचार्‍यांचे पगार का झाले नाही, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आस्थापनेवरील कर्मचार्‍यांच्या पगारासाठी पैसे आहेत आणि ग्रामसेवकांसाठी पैसे नाहीत हा भेदभाव व्हायला नको, अशी अपेक्षा ग्रामसेवक युनियनने व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या