Friday, April 26, 2024
Homeनगरजनावरांच्या तपासणीसाठी सरकारी सोनोग्राफी मशीन

जनावरांच्या तपासणीसाठी सरकारी सोनोग्राफी मशीन

सभापती गडाख : कोरोनाग्रस्त कुक्कुट पालकांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात पाच ते सहा ठिकाणी जनावरांचे मोठे बाजार भरतात. त्या ठिकाणी खरेदी विक्री होणारी जनावरे गाभण आहेत की नाही, याची खातरजमा करण्यासाठी जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभागाकडून सरकारी सोनोग्राफी मशीन बसवून त्या ठिकाणी नाममात्र दरात सेवा देण्यात येणार असल्याची माहिती अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी दिली.

- Advertisement -

नगर जिल्हा परिषदेच्या वतीने साथीचे आजार अथवा विषाणूमुळे मरण पावलेल्या जनावरांच्या मालक असणार्‍या शेतकर्‍यांसाठी अर्थसाहय योजना सुरू केली आहे. या योजनेचा शुभारंभ आणि पीडित शेतकर्‍यांना सभापती गडाख यांच्या हस्ते मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, शरद नवले, पुष्पा रोहम आणि आठरे या उपस्थित होत्या.

सभापती गडाख म्हणाले, ही योजना सुरू करण्यासाठी सर्वांचे योगदान आहे. गेल्यावर्षी नेवासा तालुक्यातील तेलकुडगावच्या शेतकर्‍यांच्या घरी घडलेल्या घटनेनंतर ही योजना सुरू करण्याचा विचार आला. शेतकरी आपल्या जनावरांना पोटच्या गोळ्या प्रमाणे संभाळतात. सुरूवातीला ही योजना राबविण्यासाठी निधी आणि हेड नव्हते. मात्र, प्रयत्न केल्यानंतर यश आले आहे. शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. यंदाच्या बजेटमध्ये पशू संवर्धनसाठी भरीव तरतूद करण्यात येणार आहे. तसेच कोरोनामुळे जिल्ह्यातील कुक्कटपालकांचे कंबरडे मोडले असून त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

किसन क्रेडीट कार्ड योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना जनावरे खरेदीसाठी 1 लाख 60 हजार रुपयांचे अर्थसाह्य मिळून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्यात पाच ते सहा ठिकाणी जनावरांचे मोठे बाजार भरतात. त्या ठिकाणी खरेदी-विक्री होणारे जनावरे हे गाभण असल्याचे सांगून ते गाभण न निघाल्यास शेतकर्‍यांना आर्थिक तोट्याला समोरे जावे लागते. ते टाळण्यासाठी त्या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाकडून सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सदस्य परजणे यांनी आपत्तीकालात झालेल्या नुकसानीसाठी सरकार भरपाई देते.

मात्र, शेतकर्‍यांचे जनावरे दगावल्यास त्यांना कोणतीही मदत मिळत नाही. जिल्हा परिषदेची मदत तोकडी असली तरी त्यातून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. माणसांच्या आरोग्या प्रमाणे जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. सदस्य नवले यांनी ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना मदत करण्याचे काम जिल्हा परिषद करत आहे. आता अर्थ आणि पशूसंवर्धन समिती एकाच सभापतींकडे असल्याने अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रस्ताविक डॉ. सुनील तुंबारे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या