Thursday, April 25, 2024
Homeनगरखरकट्यावर जगणार्‍या मुक्या जीवांची तडफड

खरकट्यावर जगणार्‍या मुक्या जीवांची तडफड

रस्त्यावर मोकाट फिरणारे जनावरे, कुत्र्यांची उपाशीपोटी तगमग

अहमदनगर – कोरोनाच्या महामारीने सध्या थैमान घातले आहे. 21 दिवसांच्या लॉकडाऊन मुळे हातावर पोट असणार्‍या गरिबांची तसेच रस्त्यावर अडकलेल्यांची मोठी गैरसोय झाली आहे. सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन गेल्या अनेक दिवसांपासून विविध सामाजिक संघटना, राजकीय, कार्यकर्ते सॅनिटायझरपासून किराणा, धान्य, भाजीपाला आदींची मदत गरजुंना करण्यात आली. मात्र लोकांनी घराबाहेर टाकलेल्या खरकट्यावर जगणारे मुके जीव अद्यापही उपाशी असल्याने सैरभैर आहेत. त्यांचेही जीवन सुसह्य व्हावे, यासाठी जन आरोग्य फाउंडेशनने पुढाकार घेतला असून, त्यांच्यासाठी अन्न उपलब्ध करण्यात येत आहे.

- Advertisement -

कठीण परिस्थितीत अडकलेल्या माणसांना मागता येईल, त्याला कोठूनही मदत मिळेल आणि कुणीही देईल. पण मुक्या जीवांचे काय, या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेही नाही. याही परिस्थितीत संवेदनशील भावना जागृत ठेऊन मुक्या जीवांच्या पोटात घासभर अन्नाचा कण जावा यासाठी जन आरोग्य फाउंडेशन धडपडत आहे. फाउंडेशनचे सचिव योगीराज धामणे, योगेश पिंपळे, सामाजिक कार्यकर्ते शिवहरी म्हस्के, बारा बलुतेदार महासंघाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा छाया नवले यांनी नगर शहरातील भटकी जनावरे, भटके श्वान या मुक्या प्राण्यांच्या मुखी घासभर अन्न देऊ केले.

शासनाच्या परिपत्रकात मुक्या प्राण्यांचा कोठेही उल्लेख नसल्याने सुरुवातीला परवानगी मिळण्यासाठी त्यांना अनंत अडचणी आल्या. परंतु त्यांनी केलेली विनंती पाहून प्रशासनानेही माणुसकीच्या भावनेतून त्यांना थोडीशी सूट दिली.

सुरुवातीला प्रशासनातील काहींना हा विषय हसण्यासारखा वाटला. परंतु प्रत्यक्षात मुक्या जीवांना चारा टाकण्यात आला त्यावेळेस तो खाण्या इतपतही त्यांच्यात त्राण राहिले नसल्याचे लक्षात आले. उपाशी पोटी थरथरत्या शरीराने अन्न खाताना भयभीत झालेली मुकी जनावरे पाहून परीक्षा घेण्यासाठी उभ्या ठाकलेल्या खाकीच्याही डोळ्यात अश्रू तरळले.

लॉकडाऊनमुळे हॉटेल्स, कार्यालये, विविध दुकानें बंद झाली. हॉटेलचे उरलेले अन्न व रस्त्यावर पडलेल्या खरकाट्यावर जगणारे मुके प्राणी उपासमारीमुळे कणभर अन्नासाठी तडफडत आहेत. शहरातील भटक्या श्वानांकडे नेहमीच निरोपयोगी, उपद्रवी म्हणून पाहिले जात असले तरी त्यांची आताची तडफड संवेदनशील मनाला निश्चितच हेलावून टाकणारी आहे. यासाठी दानशूरांनी मदतीचा एक हात पुढे करण्याचे आवाहन जन आरोग्य संघटनेने केले आहे.

येथे मात्र दुर्लक्ष
जनता कर्फ्यूच्या दिवशी महापालिकेत प्रवेशद्वारावर सॅनिटायझर घेऊन एक कर्मचारी उभा होता. येणार्‍या-जाणार्‍याच्या हातावर ते टाकण्यात येत होते. गुरूवारी महापालिका आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मात्र ही कोणतीही काळजी घेण्यात आली नसल्याचे प्रकर्षाने समोर आले. येणारे, जाणारे महापालिकेत बिनधास्त फिरत होते. स्वच्छता विभागाला याबाबत विचारणा केली असता त्यांनीही यावर मौन पाळणे पसंत केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या