Monday, April 29, 2024
Homeनगरअंगणवाडीत नळ जोडणी, शौचालयासाठी 27 लाख

अंगणवाडीत नळ जोडणी, शौचालयासाठी 27 लाख

सभापती शेटे : मार्च अखेर निधी खर्च करण्याचे आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील अंगणवाड्यांना नळ कनेक्शन घेण्यासाठी प्रत्येकी 10 हजार रुपये तर शौचालये बांधण्यासाठी प्रत्येकी 12 हजार रुपये प्राप्त झाले आहेत. यातून जिल्ह्यातील 80 अंगणवाड्यांना नवीन नळ कनेक्शन तर 160 अंगणवाड्यांत शौचालय बांधण्यात येणार आहेत. राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी हा निधी दिला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस सर्व कामे पूर्ण करून संपूर्ण निधी खर्च करण्याचे निर्देश महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मीरा शेटे यांनी सभेत दिले.

- Advertisement -

महिला व बाल कल्याण समितीची मासिक सभा सभापती शेटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीला मंजूर ठरावावर केलेल्या कार्यवाहीचा तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजना व महिला व बाल कल्याण विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये अंगणवाडी बांधकाम, अंगणवाडी दुरूस्ती, शौचालय बांधकामे, तसेच समुपदेशन केंद्राचे काम, अंगणवाडी सेविका पुरस्कार आदींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

435 लेडीज सायकल लाभार्थ्यांच्या यादीस मान्यता देण्यात येऊन याबाबतची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यावर तात्काळ जमा करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हा परिषद सेस निधीचा आढावा घेण्यात येऊन सन 2020-21 याआर्थिक वर्षात राबवायाच्या योजनांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत 3 वर्षे ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना गरम ताजा आहार तसेच 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालकांना तसेच गरोदर स्तनदा मातांना टीएचआर (घरपोहोच आहार) पुरविण्यासाठी जिल्हा स्तरावरून ई -निविदा प्रसिध्द करून संस्थांची निवड करण्यात आली.

यामध्ये घरपोहाच आहारासाठी 6 संस्थांची निवड झालेली असून, गरम ताजा आहार पुरवठा करणेसाठी 39 बचत गटांची निवड करण्यात आलेली आहे. पात्र झालेल्या या संस्थांना त्वरित पुरवठा आदेश देण्याच्या सूचना समिती सभेमध्ये देण्यात आल्या. पोषण आहारात मुलांना सकाळी 9 वाजता नाष्टा तसेच 11 वाजता जेवण मिळाले पाहिजे, अशा सूचना सभेत देण्यात आल्या. सभेला समिती सदस्य रोहिणी निघुते, सुनीता भांगरे, राणी लंके, पुष्पा रोहोम, यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम आणि जिल्ह्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या