Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

अमृतवाहिनीत सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला मेधा महोत्सव

Share
अमृतवाहिनीत सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला मेधा महोत्सव, Latest News Amrutvahini Cultural Events Sangmner

भाऊ कदम व कुशल बद्रिकेच्या हास्य मैफलीने धमाल

संगमनेर (प्रतिनिधी)- कोंबडी पळाली, लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला या कार्तिकी गायकवाडने गायलेल्या गीतांबरोबर प्रसन्नजीत कोसंबी, अभिनेता पुष्कर जोग, सायली पराडकर यांच्या सादरीकरणासह विनोद वीर भाऊ कदम व कुशल बद्रिके यांनी सादर केलेले धमाकेदार गाव गाड्याने सर्वांना खळखळून हसविले. या बरोबर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी मेधा महोत्सवात रंग भरला.
अमृतवाहिनीत मेधा मैदानावर महोत्सवात विविध कार्यक्रम सादर झाले.

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सौ. कांचनताई थोरात, संचालिका सौ. शरयुताई देशमुख, विश्वस्त आर. बी. सोनवणे, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात, कला दिग्दर्शक राकेश हांडे, भाऊसाहेब गायकवाड, आर. एम. कातोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, प्राचार्य डॉ. व्यंकटेश, समन्वयक प्रा. जी. बी. काळे, डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, एस. टी. देशमुख, सौ. जे. बी. सेठ्ठी, श्रीमती शीतल गायकवाड, डॉ. राकेश रंजन, प्रा. विजय वाघे, प्रा. विलास शिंदे, प्रा. अशोक वाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

मेधा महोत्सवात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. विनोदवीर भाऊ कदम व कुशल बद्रिके यांच्या विनोदांनी सुमारे 20 हजार प्रेक्षकांना खळखळून हसविले. तर गायक प्रसन्नजीत कोसंबीने गायलेले ‘लख्य पडला प्रकाश दिवट्या मशालीचा’ या गाण्याला तरुणांनी अक्षरक्षः डोक्यावर घेतले. कार्तिकी गायकवाडचे कांदे पोहे चित्रपटातील गीत व घुमर घुमर रे या गीताने धमाल केली.

जुईली जोगळेकरने गायलेले हळद पिवळी हे सैराट या चित्रपटातील गीताने सर्वांना मंत्रमुग्ध केले. पुष्कर जोग याने हबिबी व बजने दे धडक धडक यासह सिंबा या चित्रपटातील ‘आँख मारे ऐ लडकी आँख मारे’ या गीताने सर्वांना ठेका धरायला लावला. तर सायली पराडकरच्या ऐका दाजिबा, बाई वाड्यावर या लावणीवर टाळ्या व शिट्ट्यांचा कडकडाट झाला. अमृतवाहिनीतील विद्यार्थ्यांचे हैदराबाद बलात्कार प्रकरणावरील मुलींची सुरक्षितता या गीताने सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. तांडव नृत्य, भांगडा, मिमिक्री, विविध समूह नृत्य यांनी एकच धमाल केली. लहान मुलांच्या फॅशन शो मधील मुलांची जुगल बंदी पाहतांना संगमनेर करांच्या आनंदाला पारावारा उरला नाही.

यावेळी ना. थोरात म्हणाले, मेधा महोत्सवाची लोकप्रियता खूप वाढली असून विद्यार्थ्यांना हे मोठे व्यासपीठ मिळाले आहे. महाराष्ट्रातील अनेक विचारवंतांसह दिग्गज कलाकारांची उपस्थिती हे वैशिष्ट्य राहिले असून विद्यार्थ्यांनी या त्या वेळेचा आनंद घेतांना करिअर कडे गांभीर्यपूर्वक पाहवे. सध्या स्पर्धा खूप मोठी असल्याने आपल्यात विविधतेचे गुण असणे गरजेचे आहे. अभ्यासाला पर्याय नाही, असे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास अमृत उद्योग समूहातील व तालुक्यातील विविध संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संगमनेरला यायला आवडते- भाऊ कदम
अमृतवाहिनीतील शिस्त, निसर्गरम्य परिसर व संगमनेरमधील प्रेक्षकांची रसिकता पाहून खुप भारावून गेलो आहे. ग्रामीण भागात मुंबई, पुण्याच्या दर्जाची सुविधा हे अमृतवाहिनीचे वैशिष्टे ठरत असल्याचा गौरवौद्गार त्यांनी काढले असून मला संगमनेरला यायला नेहमी आवडते असे ही ते म्हणाले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!