Saturday, April 27, 2024
Homeनगरअमृत योजनेतील वाहिन्या पोलीस बंदोबस्तात टाकणार – व्दिवेदी

अमृत योजनेतील वाहिन्या पोलीस बंदोबस्तात टाकणार – व्दिवेदी

अहमदनगर (प्रतिनिधी) – अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणी योजनांच्या कामाची पाहणी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल व्दिवेदी यांनी केली. शेतकर्‍यांनी अडविलेल्या जलवाहिन्या टाकण्याचे काम पोलीस बंदोबस्तात करण्याचे व उर्वरीत कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित ठेकेदार संस्थेस दिल्या.

नगर शहराला पाणी पुरवठा करणारी सध्याची योजना 60 वर्षांपूर्वीची आहे. शहराचा विस्तार झाला असून, लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुढील 50 वर्षांचा विचार करून अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. नगर शहरामध्ये फेज-2 पाणी योजना आता अंतिम टप्प्यात आली आहे. केंद्र शासनाच्या सुमारे 100 कोटी रुपयांच्या अमृत योजनेेअंतर्गत काम सुरू आहे. योजनेच्या कामांना गती देण्यासाठी व्दिवेदी यांनी मुळा धरण, विळद पंपिंग स्टेशनसह विविध ठिकाणी पाहणी करून संबंधितांना सूचना केल्या.

- Advertisement -

योजना लवकर पूर्ण झाल्यानंतर नगर शहराला पूर्ण दाबाने पाणी मिळणार आहे. मुळा धरणात पाण्यामध्ये आरसीसी ब्रीज करण्याचे काम रखडले आहे. या कामा संदर्भात माहिती घेऊन मे. शिवसेन इंजिनिअर्स (पुणे) यांना हे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. योजनेचे काम सुमारे 35 किलोमिटरचे आहे. मुळा धरण ते विळद आणि विळद ते वसंत टेकडी जलवाहिनी टाकण्याचे सुमारे 18 किमीचे काम पूर्ण झाले आहे. काही शेतकर्‍यांनी काम अडविले आहे.

शेतकर्‍यांना पीकपाणी नुकसान भरपाई देऊनही शेतकरी पाईप टाकू देत नाहीत. यासाठी महसूल विभागाशी चर्चा करून पोलीस बंदोबस्तात लवकरात लवकर काम पूर्ण करून घेण्याचे सांगण्यात आले. त्याच बरोबर विळद येथे 45 दशलक्ष क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेतली. वसंत टेकडी येथे 50 लाख लिटर जमिनीवरील जलकुंभ तयार आहे. मुळाधरण येथील ब्रेकप्रेशर टॉक 2.2 दशलक्ष लिटर या कामाची पाहणी त्यांनी केली.

गेले दोन दिवस आयुक्त राहुल द्विवेदी यांनी फेज-2 पाणी योजना, अमृत पाणी योजना, अमृत भुयार गटार योजनेच्या कामांचा आढावा घेतला. काल अचानक मुळाधरण, विळद घाट या ठिकाणी पाहणी केली. त्यावेळी उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एम. एन. सराफ, महापालिकेचे यंत्र अभियंता परिमल निकम, पाणी पुरवठा विभागाचे महादेव काकडे, अभियंता गणेश गाडळकर, उपअभियंता ए. ए. मुळे, जय बिलाल, आर. एस. थोरात, एस. एस. बडे, ठेकेदार संस्थेचे पानसे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या