Friday, April 26, 2024
Homeनगरआता फक्त दिवसा फवारणी ; तर भाकरेंचे नगरसेवक पद रद्द

आता फक्त दिवसा फवारणी ; तर भाकरेंचे नगरसेवक पद रद्द

श्रीकांत मायकलवार । …तर भाकरेंचे नगरसेवक पद रद्द

अहमदनगर (प्रतिनिधी) –  महापालिकेच्या स्वच्छता विभागातील दोन कर्मचार्‍यांना नगरसेविकेच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ दोन दिवसांपासून बंद पडलेले अत्यावश्यक सेवेचे काम शनिवारी दुपारपासून सुरू झाले. महापालिका कर्मचारी युनियनने काम बंद आंदोलन मागे घेत असताना संबंधित नगरसेविकेचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

- Advertisement -

महापालिकेचे स्वच्छता विभागाचे कर्मचारी सुरेश वाघ व अविनाश हंस यांना बुधवारी मध्यरात्री नागापूर परिसरात मारहाण झाली होती. जंतुनाशक फवारणीसाठी ते तेथे गेले होते. त्यावेळी शिवसेनेच्या नगरसेविका रिटा भाकरे यांचे नातेवाईक असलेले नीलेश भाकरे यांच्यासह सात-आठ जणांनी त्यांना गज, काठ्यांनी मारहाण केली होती. यातील वाघ यांना गंभीर इजा झाली होती. दोघांनाही खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्या उपचाराचा खर्च महापालिका करणार आहे. तसे आश्वासन आयुक्त मायकलवार यांनी मनपा कर्मचारी युनियनला दिले आहे.

मारहाणीतील प्रमुख आरोपी व त्याचे साथीदार फरार असून, त्यांना तातडीने अटक करावी, भाकरे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, फवारणीचे दिवसाच करण्यात यावी, ती करताना पोलीस संरक्षण द्यावे आदी मागण्या युनियनने केल्या होत्या. हे होईपर्यंत अत्यावश्यक सेवा बंद केल्या होत्या. त्यामुळे दोन दिवसांपासून शहरात साफसफाई न झाल्याने अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले होते. तसेच घरोघरी कचरा संकलन करणारी वाहनेही बंद होती.

शनिवारी दुपारी आयुक्त व युनियनचे अध्यक्ष लोखंडे आणि इतर पदाधिकारी यांची चर्चा झाली. यावेळी उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे उपस्थित होते. भाकरे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव सोमवारी पाठविण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. तसेच फवारणीचे काम दिवसा आणि पोलीस बंदोबस्तात करण्यात येईल असेही आश्वासन देण्यात आले. तसेच महापालिका अधिकारी, युनियनच्या पदाधिकार्‍यांनी संयुक्तपणे पोलीस अधिकार्‍यांची भेट घेत आरोपींना अटक करण्याची मागणी केली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी आरोपीला लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर काम बंद आंदोलन मागे घेण्यात आल्याचे लोखंडे यांनी जाहीर केले. दुपारपासून कचरा संकलन करणारी वाहने शहरात फिरू लागली.

- Advertisment -

ताज्या बातम्या