Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर : पोटनिवडणुकीतील पराभवामुळे शिवसेना ‘स्थायी’तही ‘वजा’

Share
नगर : स्थायीतही शिवसेना झाली मायनस, Latest News Amc Sthai Shivsena Minus Ahmednagar

सदस्य संख्या एकने घटली : भाजपची संख्या वाढणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रभाग सहा (अ) मधील पराभव शिवसेनेला चांगलाच महागात पडणार आहे. या पराभवामुळे त्यांच्या नगरसेवकांची संख्या कमी झाल्याने स्थायी समितीतील त्यांचे प्रतिनिधीत्त्वही एका सदस्याने कमी होणार असून, याचा फायदा भाजपला मिळणार आहे. यापुढे पक्षीय बलाबल आणि मूल्यानुसार शिवसेनेचे सहा ऐवजी पाच आणि भाजपचे तीन ऐवजी चार सदस्य स्थायी समितीमध्ये जाणार आहेत. या मुल्याचा स्वीकृत सदस्य नियुक्तीवर परिणाम होणार नसल्याने तेवढा दिलासा शिवसेनेला मिळणार आहे.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर शिवसेनेची महापालिकेतील सदस्य संख्या 24 आणि भाजपची 14 होती. सर्वाधिक नगरसेवक निवडून येऊनही महापालिकेतील कोणतेच सत्तापद न मिळाल्याची सल शिवसेनेमध्ये सुरूवातीपासूनच आहे. राष्ट्रवादी आणि भाजपने शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र येत महापालिकेत भाजपची सत्ता आणली. शिवसेना (24), राष्ट्रवादी (एका सहयोगीसह 19) आणि भाजप (14) असे पक्षीय बलाबल होते. त्यात भाजप तिसर्‍या क्रमांकावर असतानाही महापौर, उपमहापौर, महिला व बालकल्याण समिती सभापती ही महत्त्वाची पदे त्यांना मिळाली.

ते केवळ राष्ट्रवादीला शिवसेना सत्तेवर नको होती, म्हणून शक्य झाले. सर्वाधिक मोठा पक्ष असूनही सत्तेपासून दूर राहिल्याचे दुःख शिवसेनेला दीनप्रतिदिन टोचत होते. पुढील अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीला बाजुला सारून पुन्हा भाजपसोबत युती करण्याच्या हालचालीही सुरू होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यस्तरावरच शिवसेना-भाजपमध्ये मोठी दरी पडली. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत राज्यात सत्ता मिळवून तिघांची एकत्रित महाविकास आघाडी स्थापन केली. नगर शहरात मात्र ही आघाडी मोडित निघण्याचीच शक्यता अधिक आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेतृत्त्व यांच्यातील अंतर अद्याप कमी होण्यास तयार नसल्याने आघाडीचे भवितव्यही अधांतरीच आहे.

प्रभाग सहा (अ)च्या पोटनिवडणुकीत हे अंतर प्रकर्षाने जाणवले. त्याचा परिणाम निकालावर होऊन शिवसेनेला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. केवळ प्रभागातील पराभव, एवढ्यापुरतेच याकडे पाहता येणार नाही. त्याचे परिणाम आता महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या स्थायी समितीतही दिसणार आहे. शिवसेनेचे 24 सदस्य असताना त्यांचे मूल्य 5.64 आणि भाजपचे 14 सदस्य असताना 3.29 होते. यामुळे शिवसेनेचे स्थायी समितीमध्ये प्रथम स्तरावर पाच आणि द्वितीय स्तरावर एक असे सहा सदस्य नियुक्त होत होते.

भाजपचे प्रथम स्तरावर तीन आणि द्वितीय स्तरावर शुन्य सदस्य नियुक्त होत होते. याचाच अर्थ शिवसेनेचे समितीत सहा आणि भाजपचे तीन सदस्य होते. मात्र आता प्रभाग सहामधील पराभवामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांची सख्या एकने कमी होऊन ती 23 झाल्याने त्यांचे मूल्य 5.41 एवढे आणि भाजपचा एक नगरसेवक वाढल्याने त्यांचे मूल्य 3.52 एवढे झाले आहे. याचा परिणाम स्थायी समितीत शिवसेनेचा द्वितीय स्तरावर नियुक्त होणारा एक सदस्य कमी झाला, असून तो भाजपला मिळणार आहे. भाजपचे आता प्रथम स्तरावर तीन आणि द्वितीय स्तरावर एक असे चार सदस्य नियुक्त होतील.

समितीतील बलाबल…
प्रभाग सहा अ मधील निकालामुळे सोळा सदस्यसंख्या असलेल्या स्थायी समितीतील पक्षीय बलाबलात बदल झाला आहे. यापुढे ते शिवसेना आणि राष्ट्रवादी (प्रत्येकी पाच), भाजप (चार), काँग्रेस आणि बसप (प्रत्येकी एक)..

शिवसेनेचा प्रभाव खालावला
आगामी महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू आहे. अशा काळात एक एका नगरसेवकांची गरज असते. मात्र पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने एकने नगरसेवक कमी झाला. त्यात नगरसेवकांमध्येही दुफळी निर्माण झाल्याने शिवसेनेचा महापालिकेतील प्रभाव खालावला आहे. आता स्थायी समितीमधील सदस्यसंख्या एकने कमी झाल्याने शिवसेनेची ही उतरती कळा असल्याचे याच पक्षातील एकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

 

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!