Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

‘स्थायी’ समितीसाठी एकाचवेळी धाकधूक आणि धडपड

Share
महापालिका अडीच हजार घरांवर लक्ष ठेवणार, Latest News Amc City Home Attention Ahmednagar

आज सभा; चिठ्ठ्यांद्वारे नावे काढून आठ सदस्य निवृत्त होणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – स्थायी समितीचे आठ सदस्य आज चिठ्ठ्या टाकून निवृत्त होत असल्याने एकाचवेळी चिठ्ठी कोणाची निघेल, यावरून सदस्यांमध्ये धाकधूक तर दुसरीकडे रिक्त जागेवर वर्णी लावण्यासाठी धडपड सुरू आहे. आठ सदस्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या काढण्यासाठी आज 31 जानेवारीला सकाळी अकरा वाजता यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.

सार्वत्रिक निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या स्थायी समितीतील 16 पैकी आठ सदस्यांची मुदत एक वर्षाची असते. पहिल्या वर्षी आठ सदस्यांची नावे चिठ्ठीद्वारे काढून त्यांना निवृत्त केले जाते. दुसर्‍या वर्षापासून दोन वर्षे झालेले सदस्य आपोआप निवृत्त होतात. त्यामुळेच पहिल्यावर्षी समितीत येण्यासाठी फारसे इच्छुक नसतात. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता यासाठी स्थायी समितीची सभा सभापती मुदस्सर शेख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सोळा सदस्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्या जातील. त्यातून आठ चिठ्ठ्या उचलण्यात येतील. ज्यांची नावे निघणार ते निवृत्त होणार आहेत.

चिठ्ठीद्वारे कोणाची नावे निघणार याबाबत उत्सुकता असली, तरी सदस्यांमध्ये मात्र धाकधूक आहे. मलाईदार समिती म्हणून स्थायी समितीचा उल्लेख होत असतो. या समितीत संधी मिळावी, यासाठी नगरसेवकांचा आटापिटा सुरू असतो. निविदा मंजुरीचा विषय नेहमीच विविध कारणांनी चर्चेचा ठरत असतो. त्यामागील कारणेही सर्वश्रूत आहेत. त्यामुळे आणखी एक वर्ष मिळावी, अशी सर्वांचीच इच्छा असली, तरी चिठ्ठीत नाव निघाल्यानंतर मात्र पर्याय नाही. निवृत्त झालेल्या सदस्याला पुन्हा नियुक्ती मिळण्याची शक्यता अपवादात्मकच असते.

चिठ्ठीमध्ये ज्या सदस्यांची नावे येतील, त्या रिक्त जागांवर त्याच पक्षाच्या नगरसेवकांची पुन्हा नियुक्ती होत असते. पक्षीय बलाबलाच्या कोट्यातून ही निवड केली जाते. समितीचे सभापतीचेही नाव चिठ्ठीद्वारे येऊ शकते. असे असले तरी त्यांची सभापतिपदाची मुदत 31 जानेवारीनंतर संपुष्टात येत आहे. महापालिकेत सत्तेसाठी बसपच्या चार सदस्यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यात स्थायी समितीचे सभापतिपद दोन वर्षे मिळावे, अशी अट होती.

पहिल्यावर्षी मुदस्सर शेख यांना संधी मिळाली. आता समितीचे माजी सभापती सचिन जाधव यांच्या पत्नी अश्‍विनी जाधव यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने दिलेला शब्द पाळल्यास जाधव यांना सहजपणे संधी मिळू शकते. यात कोणती अडचण येऊ नये म्हणून सचिन जाधव गेल्या काही दिवसांपासून सतत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आमदार संग्राम जगताप यांच्याशी सलगी वाढवत आहेत. अनेकदा ते त्यांच्यासमवेतच असतात.

राष्ट्रवादीही इच्छुक
स्थायी समितीत संधी मिळावी, अशी आता राष्ट्रवादीचीही इच्छा आहे. राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्याने तिसर्‍या क्रमांचा पक्ष असूनही महापौर, उपमहापौर, महिला व बालकल्याण समिती सभापती या महत्त्वाच्या पदांवर भाजपला संधी मिळाली. राष्ट्रवादीने आता सत्तेत सहभागी व्हावे, असा एक सूर आहे. त्यामुळेच महत्त्वाची अशी स्थायी समितीकडे राष्ट्रवादीच्या नजरा असल्याचे समजते. तसे झाल्यास जाधव यांची संधी हुकू शकते. अर्थात या संदर्भात आमदार संग्राम जगताप काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!