Saturday, May 11, 2024
Homeनगरथकीत वसुलीसाठी महापालिका घेणार तृतीयपंथीयांचे सहकार्य

थकीत वसुलीसाठी महापालिका घेणार तृतीयपंथीयांचे सहकार्य

मार्चअखेरपर्यंत वसुली वाढविण्याची मोहीम : कर्मचार्‍यांवरही कारवाईची टांगती तलवार

अहमदनगर (प्रतिनिधी) –  विविध प्रयत्न करूनही थकीत कराची वसुली होत नसल्याने अखेल आता थकबाकीदारांच्या दारात बॅण्ड, ढोल, ताशा वाजविण्याचा तसेच प्रसंगी तृतीयपंथीयांची मदत घेण्याच्या निर्णयापर्यंत महापालिका आली आहे. तसेच जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वसुलीत अडथळा ठरत असलेले पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या भूमिकेवर चर्चाच न झाल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

- Advertisement -

शहरामधील सन 2019-20 मधील मालमत्ता करापोटी 231 कोटी रुपयांची थकबाकी असून त्यापैकी 27 फेब्रुवारी अखेर 46 कोटी 60 लाख इतकी वसुली झालेली आहे. अनेक थकीत मिळकतधारकांना महापालिकेने नोटिसा देऊन जप्तीचा इशारा दिला आहे.

तसेच प्रमुख चौकांमध्ये थकबाकीदारांची नावे फ्लेक्सवर झळकविली आहेत. काहींना नळ कनेक्शन बंद करण्याच्या नोटिसा दिल्या, तर काहींचे नळ कनेक्शन तोडले आहे. वॉरंट काढण्यात येऊन अटकावणी करण्यात येत आहे. असे असतानाही अनेक थकीत मिळकत धारकांकडून मालमत्ता कराची थकबाकी भरण्याबाबत अल्पसा प्रतिसाद मिळालेला आहे.

यापुढे मालमत्ता कराची वसुली शंभर टक्के होण्याच्या दृष्टिकोनातून थकीत मिळकतधारकांच्या मिळकतीसमोर ढोल, ताशे, बँड वाजवणे व तृतीयपंथीयांच्या सहभागातून मालमत्ता कराची वसुली करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. उपायुक्त सुनील पवार यांनी संबंधित वसुली कर्मचारी आणि प्रभाग अधिकार्‍यांना या संदर्भात सूचना दिल्या आहेत. शहर हद्दीतील मिळकतधारकांनी ही कटू कारवाई थांबविण्यासाठी प्रभाग समिती कार्यालयात त्वरित थकबाकी जमा करून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहनही पवार यांनी केले आहे.

दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी उशिरा महापालिका वसुली विभागाची बैठक झाली. या बैठकीत प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी आतापर्यंतच्या वसुलीचा आढावा घेतला. मार्चअखेरपर्यंत 80 कोटी वसूल करण्याचे उद्दिष्ट असले, तरी सध्याची वसुली पाहता, ते गाठता येणे अशक्य आहे.

त्यामुळे द्विवेदी यांनी प्रत्येक कर्मचार्‍याला विचारूनच त्यांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे उद्दीष्ट कर्मचार्‍यांनीच दिलेले असल्याने त्यांना ते आता बंधनकारक राहणार आहे. उद्दीष्टाएवढी वसुली न झाल्यास एक पगारवाढ थांबविण्याची कारवा़ई करण्यात येणार असल्याचे द्विवेदी यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्लॅस्टिकमुक्तीसाठी मोहीम
एकीकडे वसुलीची मोहीम सुरू असतानाच दुसरीकडे प्लॅस्टिकमुक्तीसाठीही जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. नगर शहरात एक वेळ वापर केला जाणार्‍या प्लरूस्टिकपासून मुक्त केले जाणार असून यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. चार भरारी पथके यासाठी नियुक्त केले असून, ते प्लॅस्टिक वापरणार्‍यांवर कारवाई करणार आहेत. याबाबत द्विवेदी यांनी नुकतीच बैठक घेतली. प्रथम शहराबाहेरील व अंतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, दवाखाने, शासकीय कार्यालयांमध्ये मोहीम राबविली जाणार आहे. आतापर्यंत व्यावसायिकांवर कारवाई केली असून, आता नागरिकांनाही दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. तीन टप्प्यांत प्लॅस्टिकमुक्तीची ही मोहीम राबविली जाणार असून पहिला टप्पा 1 ते 15 मार्च, दुसरा टप्पा 16 ते 31 मार्च आणि तिसरा टप्पा 1 ते 15 एप्रिल या कालावधीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या