Friday, April 26, 2024
Homeनगरनगर : संपत बारस्कर विरोधी पक्षाच्या खुर्चीवर

नगर : संपत बारस्कर विरोधी पक्षाच्या खुर्चीवर

चुकीला माफी नाही- राष्ट्रवादीची भूमिका 

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेत चांगल्या कामाला पाठबळ दिले जाईल, मात्र चुकीचे काम होत असेल तर त्याला विरोध केला जाईल. जनहित हीच राष्ट्रवादीची प्राथमिकता असेल अशी भूमिका विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी ‘नगर टाइम्स’कडे मांडली. दरम्यान महापालिकेत बारस्कर हे आज आमदार संग्राम जगताप यांच्या साक्षीने विरोधी पक्षाच्या खुर्चीवर बसले.

- Advertisement -

गत आठवड्यात महापौर बाबासाहेब वाकळे यांनी बारस्कर यांना विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती झाल्याचे पत्र दिले होते. आज सोमवारी त्यांनी पदाचा पद्भार हाती घेतला. आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, नगरसेवक अविनाश घुले, कुमारसिंह वाकळे, रवींद्र बारस्कर, मीनाताई चव्हाण, अर्जुन बोरुडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रा. माणिक विधाते यावेळी उपस्थित होते. पद्ग्रहणापूर्वी बारस्कर समर्थकांनी ढोल-ताशाच्या गजरात गुलालाची उधळण केली. त्यानंतर बारस्कर हे विरोधी पक्षनेते पदाच्या दालनात प्रवेश करत खुर्चीवर बसले.

विरोधी पक्षनेते पदी नियुक्त झालेले बारस्कर हे आमदार संग्राम जगताप यांचे विश्वासू असून भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांचे नातलगही आहेत. यानिमित्ताने महापालिकेत ‘सोधा’ची मोट बांधल्याचे चित्र असल्याची चर्चाही सुरू झाली. त्या पार्श्वभूमिवर विरोधी पक्षाची भूमिका कशी असेल यासंदर्भात बारस्कर यांची ‘नगर टाइम्स’ने प्रतिक्रिया घेतली.

महापालिकेत चांगल्या विकासात्मक गोष्टीला राष्ट्रवादीचे पाठबळ राहिलं. चुकीचे काम होत असेल तेथे विरोधकाची भूमिका बजावली जाईल. विरोध करताना कोणताही हेतू नसेल, जनहित हेच समोर असेल असे बारस्कर यांनी स्पष्ट केले. नातेगोते हे महापालिकेच्या राजकारणाबाहेर असेल. महापालिकेत सत्ताधार्‍यांनी कोणतेही चुकीचे काम केले तर त्याला माफी करणार नाही तर कडाडून विरोध केला जाईल अशा शब्दात बारस्कर यांनी आपली भूमिका मांडली.

बारस्कर यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा पद्भार घेतल्यानंतर अनेकांनी त्यांचा सन्मान केला. सावेडीतील बारस्कर समर्थकांनी यावेळी शक्तीप्रदर्शनही केले.

आमदार म्हणाले, शासनानिधीतून डीपी रोड
महापालिकेने शहरातील डीपी रोडचा आराखडा तयार करून शासनाकडे पाडविला आहे. त्याला निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने डीपी रोड महत्त्वाचे असून त्याला प्राधान्याने शासनाकडून निधी आणू असे आ. जगताप यांनी सांगितले. महापालिकेला पूर्णवेळी आयुक्त मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच नवीन आयुक्त येईल असेही त्यांनी सांगितले. महापालिकेत राष्ट्रवादी चांगल्या कामाला पाठबळ देईल, चुकीच्या कामाला विरोध करेल असे आ.जगताप यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या