..तर साड्या फेडून महापालिकेसमोर आंदोलन करू

..तर साड्या फेडून महापालिकेसमोर आंदोलन करू

कर वसुलीसाठी नाव वापरल्याने तृतीयपंथीयांकडून निषेध; मनपाचीही माघार

अहमदनगर (प्रतिनिधी) – थकीत कराची वसुली करण्यासाठी तृतीयपंथीयांचा समावेश असलेल्या तृतीय कल्याणकारी संस्थेकडे काम देण्याचा महापालिकेचा मनसुबा अवघ्या दोन दिवसांत उधळला गेला. अशा कोणत्याच प्रकाराची वसुली करण्यास या संस्थेच्या काजल गुरू यांनी स्पष्ट नकार देत परस्पर निर्णय जाहीर केल्यामुळे महापालिका अधिकार्‍यांना खडसावले. पुन्हा असे घडल्यास महापालिकेसमोर साडी सोडून आंदोलन करू, असा इशाराही दिला. त्यामुळे महापालिकेनेही घाईघाईत पत्रक काढत तृतीयपंथीयांकडून वसुली करण्यात येणार नसल्याचे जाहीर केले.

महापालिकेची करापोटी जवळपास 234 कोटींची थकीत रक्कम आहे. ती वसूल करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे महापालिकेने ठरविले आहे. थकबाकीदार मालमत्ताधारकांच्या घरासमोर बँड वाजविणे, त्यांची नावे फ्लेक्सवर झळकविणे या बरोबरच तृतीयपंथीयांकडून वसुली करण्यात येणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले होते. त्याचे वृत्त प्रकाशित होताच, तृतीयपंथीय कल्याणकारी संस्थेच्या सदस्यांनी संताप व्यक्त केला. संस्थेच्या पदाधिकार्‍यांशी कोणताही चर्चा न करताच हा निर्णय घेण्यात आलाच कसा, असा त्यांनी प्रश्न उपस्थित करत आम्ही इतरांकडून मागून जगू पण अशी कामे करणार नसल्याचे सांगत सोमवारी महापालिकेवर मोर्चा आणला.

उपायुक्त (कर) सुनील पवार यांच्याशी त्यांनी चर्चा केली. काजल गुरू यांनी तृृतीयपंथीय संघटना महापालिकेच्या मालमत्ता कराची कुठलीही वसुली करणार नसून आम्ही मनपाच्या वसुली मोहिमेत सहभागी होणार नसल्याचे त्यांनी निक्षून सांगितले. तसेच आमच्याशी कोणताही चर्चा न करता आम्ही वसुली करणार, असे जाहीर केलेच कसे, असा सवाल केला. यापुढे असे घडल्यास महापालिकेसमोर साड्या फेडून आंदोलन करू, असा इशाराही दिला. या सर्व प्रकारामुळे उपायुक्त पवार यांच्यासह महापालिका अधिकार्‍यांची एकच धांदल उडाली. त्यांनी कसेबसे समजून सांगत यातून सुटका करून घेतली. तसेच घाईघाईत महापालिकेने पत्रक काढून महापालिकेच्या कराची वसुली करण्यास तृृतीयपंथीय कल्याणकारी संस्थेने नकार दिला असल्याचे कळविले.

तृृतीयपंथीय संघटनेबाबत घेतलेल्या निर्णयाचा निषेध तृृतीयपंथीय संघटनेने यावेळी केला आहे अहमदनगर महापालिकेने पालिकेच्या मालमत्ता कराची थकबाकी वसुली ही तृृतीयपंथीयांच्या सहभागातून ढोल ताशाच्या गजरात वसूल करणार असल्याचे पत्रक काढले होते, मात्र महापालिकेने आमची कुठलीही परवानगी न घेता हा निर्णय घेतल्याने तृृतीयपंथीय संघटनेने हा पवित्रा घेतला. महापालिकेच्या कुठल्याही वसुली मोहिमेत आम्ही सहभागी होणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तृृतीयपंथीय संघटना गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीची मागणी करत आहे, मात्र आमच्या मागणीला महापालिकेकडून वारंवार केराची टोपली दाखविण्यात येत आहे. आता महानगर पालिकेची वसुली होत नसल्याने आमच्या नावाचा वापर महापालिका करत असून या निर्णयाला आम्ही कदापी समर्थन देणार नाही. महापालिकेने वसुली मोहिमेसाठी घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे मान्य करत उपायुक्तांनी दिलगिरी व्यक्त केली असल्याची माहिती तृृतीयपंथीय संघटनेच्या अध्यक्षा काजल गुरू यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com