Wednesday, April 24, 2024
Homeनगरमहापालिकेच्या ‘करोना वॉरिअर्स’ला पन्नास लाखांचे विमा कवच

महापालिकेच्या ‘करोना वॉरिअर्स’ला पन्नास लाखांचे विमा कवच

अहमदनगर (प्रतिनिधी)- करोना उपाययोजनांसाठी कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना पन्नास लाखांचे विमा कवच देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिका कर्मचारी युनियनने याची मागणी करून यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, महापालिका कर्मचार्‍यांच्या आरोग्याची तपासणी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी बुधवारी (दि. 29) करून घेतली.

करोनाविरूद्ध लढा देण्यासाठी या कामात कार्यरत असलेल्या महालिकेच्या कर्मचार्‍यांना पंतप्रधान गरिब कल्याण योजनेंतर्गत विमा कवच देण्याची मागणी युनियनने केली होती. या अंतर्गत एक कोटींचे पॅकेज देण्याची मागणी युनियनने केली होती. यासाठी अन्नत्याग करण्याचा इशाराही दिला होता. महापालिका आयुक्त मायकलवार आणि इतर अधिकार्‍यांच्या उपस्थितीत सुरूवातीला झालेल्या बैठकीत प्रशासनाने 50 लाखांपर्यंतचा विमा कवच देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र युनियन एक कोटीवर ठाम राहिल्याने चर्चा फिसकटली होती.

- Advertisement -

यास आठवडला उलटला, पण अन्नत्याग आंदोलन सुरू केल्याचे युनियनने जाहीर केले नव्हते. त्यानंतर युनियनने महापौरांकडे यासाठी मागणी केली. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी बुधवारी या संदर्भात प्रशासन आणि युनियनच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. यात आयुक्त मायकलवार, उपायुक्त प्रदीप पठारे, युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सरचिटणीस आनंद वायकर सहभागी झाले होते. त्यामध्ये करोनासंदर्भात कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना 50 लाखांचे विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी नगर शहरात करोनाचा प्रसार होऊ नये, आपला जीव धोक्यात घालूनन म्हणून अहोरात्र कष्ट घेतले आहेत. त्यांच्या आरोग्याची तपासणी होणे गरजेचे असल्याने महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी कर्मचार्‍यांची तपासणी करून घेतली. महानगरपालिकेचे दैनंदिन कामकाज 33 टक्के कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत सुरू आहे. सर्व कर्मचारी नियम व अटींचे पालन करून आपले कामकाज नियमित करीत आहेत. मनपा अधिकारी व कर्मचारी यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी बुधवारी (दि. 29) त्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सर्व कर्मचार्‍यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या