Friday, April 26, 2024
Homeनगरबांधकामे बंदिस्त अवस्थेत करण्याचे निर्देश

बांधकामे बंदिस्त अवस्थेत करण्याचे निर्देश

महापालिकेचा दणका : उडणार्‍या धुळीमुळे प्रदुषण टाळण्याचा पर्याय

अहमदनगर (प्रतिनिधी) – स्वच्छता, अतिक्रमणे आणि कर वसुलीसंदर्भात एक एक दणके देणारे जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी आता बांधकाम करत असलेल्यांनाही चांगलाच हिसका दाखविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सर्व बांधकामे करताना त्या भोवती जाळी किंवा इतर प्रकारे बंदिस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही ठिकाणी त्या पद्धतीने अंमलबजावणीही सुरू झाली आहे.

- Advertisement -

महापालिका कार्यक्षेत्रात सध्या स्वच्छता मोहीम गांभीर्याने हाती घेण्यात आली आहे. स्वच्छ भारत अंतर्गत थ्री स्टार मानांकन मिळविण्याचा महापालिकेचा इरादा असून, त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे महापालिकेत सर्वात अगोदर स्वच्छतेच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून प्रभाग सहा (अ)च्या पोटनिवडणुकीसाठी देखील महापालिकेच्या अधिकार्‍याला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले नाही. दिवसातून अनेक बैठका, आढावा, सकाळी सातपासून द्विवेदी यांच्यासह उपायुक्त सुनील पवार आणि इतर अधिकारी, कर्मचारी स्वच्छतेच्या पाहणीसाठी शहरात फिरत असतात.

सकाळी अकरा पर्यंत केवळ पाहणी आणि जेथे घाण दिसेल तेथे संबंधितांवर दंडाची आकारणी असा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. शहरात ठिकठिकाणी स्वच्छता होत असल्याचेही दिसून येत आहे. नागरिकांकडून याबाबत प्रतिक्रिया घेतानाच त्यांना व स्वयंसेवी संस्थांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येत आहे.

या मोहिमेदरम्यान रस्त्याच्या कडेला अनेक दिवसांपासून उभी असणारी खराब वाहने, मोडकळीस आलेल्या वस्तू, बांधकाम साहित्य पडलेले निदर्शनास आले. शहराच्या सौंदर्याला ते बाधा ठरत असल्याने वाहने व वस्तू जप्त करण्याची मोहीम आखण्यात आली. याच बरोबर बांधकाम साहित्य देखील जप्त केले जात आहे. मात्र ज्या ठिकाणी प्रत्यक्षात बांधकाम सुरू आहे, अशा ठिकाणी केवळ साहित्य रस्त्यावर पडण्याचाच अडथळा नसून, बांधकामादरम्यान उडणार्‍या धुळीमुळे निर्माण होणारे प्रदूषण, शेजारील लोकांना होणारा त्रास, धुळीमुळे निर्माण होणारी घाण याचाही विचार करण्यात आला आहे.

त्यामुळे यापुढे बांधकाम करताना ते बंदिस्त असावे, असा दंडक घालण्यात आला आहे. हिरव्या नेटच्या जाळीने किंवा अन्य कोणत्याही प्रकारे ते बंदिस्त करूनच बांधकाम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिसरातील नागरिकांनी तक्रारी केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही महापालिकेने दिला आहे. तसेच महापालिकेच्या कर्मचार्‍यांकडून याची पाहणी सुरू आहे. त्यामुळे बांधकामे आता बंदिस्त होऊ लागली आहेत.

याची माहिती अनेक बांधकाम व्यावसायिक किंवा खासगी जागांवर वैयक्तिक बांधकाम करणार्‍यांना नव्हती. त्यातील अनेकांनी महापालिकेत येऊन याची माहिती घेत विचारणा केली. तसेच बांधकामाचे काम दिलेल्या व्यावसायिकास याची कल्पना देऊन बांधकामे बंदिस्त करण्यात येत आहेत. साहित्य जप्तीसोबतच दंडात्मक आकारणी होणार असल्याने रस्त्यावर साहित्य पडणार नाही, याचीही काळजी घेतली जात आहे. एरवी केअर टेकर आणि इतरांना मॅनेज करून रस्त्यात मनमानी अडथळा करण्याच्या प्रकाराला यामुळे चांगलाच चाप बसला आहे.

स्वच्छतेसमोर हे ‘आव्हान’ कायम
रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याचे प्रमाण दंडात्मक कारवाई सुरू झाल्यानंतर बर्‍याच प्रमाणात कमी झाले आहे. अपवादाने असे प्रकार घडतात. घंटागाड्यांची संख्या वाढल्याने घरातील कचराही वेळेत नेला जात आहे. कचरा कुंड्यातील कचरा देखील वेळेतच उचलला जात आहे. मात्र उपनगरांमध्ये ठिकठिकाणी रिकामे भूखंड आहेत. हे भूखंड खासगी मालकीचे आहेत. या रिकाम्या भूखंडामध्ये कचरा फेकण्याचा प्रकार अद्यापही कायम आहे. हे प्रमाण जास्त असल्याने याचा फटका सर्वेक्षणात बसू शकतो, अशी महापालिका अधिकार्‍यांची भीती आहे. हे थांबविण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. याला पर्याय म्हणून खासगी भूखंड धारकांवर कठोर दंड आकारणीचा विचार सुरू झाला आहे. मात्र अनेक भूखंडाचे मालक वर्षानुवर्षे नगर शहराबाहेर असल्याने, अनेकांनी गुंतवणूक म्हणून भूखंड खरेदी केले असल्याने ते भूखंडाकडे फिरकत नाहीत. शिवाय अनेकांना त्यांचा पत्ता सांगता येणेही कठीण असल्याने महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या