Thursday, April 25, 2024
Homeनगरटशन भाजप-सेना

टशन भाजप-सेना

मनपा पोटनिवडणूक । राष्ट्रवादी नामानिराळी

अहमदनगर (प्रतिनिधी) – सावेडीतील सहा नंबर वॉर्डाच्या पोटनिवडणुकीत भाजप-शिवसेना उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. महाविकास आघाडीच्या नावाखाली राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने निवडणुकीच्या मैदानातून काढता पाय घेतला. शिवसेनेने अनिता दळवी या चहा व्यावसायिकांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या उमेदवार वर्षा सानप की पल्लवी जाधव असा घोळ सुरू आहे. पक्षाच्या वतीने एबी फॉर्ममध्ये दोघींचीही नावे टाकण्यात आली आहेत.

- Advertisement -

शिवसेनेच्या नगरसेविका सारिका भुतकर यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने ही पोटनिवणूक होत आहे. अनुसूचित जमाती महिला आरक्षण असलेल्या या जागेसाठी भाजप-शिवसेनेतच लढत होणार हे स्पष्ट होते. राष्ट्रवादी उमेदवार न देता सोयीची भूमिका घेणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने उमेदवार न देता या चर्चेवर आज शिक्कामोर्तब केले.

शिवसेनेने अनिता लक्ष्मण दळवी यांना उमेदवारी दिली आहे. दळवी यांचे बालिकाश्रम रोडवर प्रेमाचा चहा नावाचे दुकान आहे. त्यांच्याविरोधात भाजपने वर्षा रोहन सानप किंवा पल्लवी दत्तात्रेय जाधव यांच्यापैकी एकीला उमदेवारी देण्याचे निश्‍चित केले आहे. यातील सानप यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. मतदारयादीतील नावावरून सानप यांच्या उमेदवारीचा घोळ सुरू आहे. त्यामुळे सानप यांचा अर्ज बाद झाल्यास पल्लवी दत्तात्रेय जाधव या भाजपच्या उमेदवार असणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे भाजपने दिलेल्या एबी फॉर्ममध्ये या दोघींच्याही नावाचा उल्लेख आहे.

अनिता दळवी या महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्याची माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली. दळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी महाविकास आघाडीचे घटकपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक अथवा स्थानिक नेते उपस्थित नव्हते. यासंदर्भात राष्ट्रवादीचे शहरप्रमुख माणिक विधाते यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी मौन बाळगले.

वाकळे, आगरकर-सातपुते, शिंदे चर्चेतून गंधे दूर…
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे, माजी शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर आणि शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अनिल शिंदे यांच्यात गुप्तगू झाले. राज्यातील युती तुटल्यानंतर होणार्‍या या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने युतीच्या या स्थानिक नेत्यांत काय बरे गुप्तगू रंगले असेल याची चर्चा सुरू झाली. या चर्चेतून भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष भैय्या गंधे मात्र काहिसे दूर असल्याचे दिसले. आगरकर-वाकळे जोडीने त्यांना महत्त्वाच्या चर्चेत सहभागी करून न घेता दूर ठेवल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

राष्ट्रवादीची दुहेरी चाल..
राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर महापालिकेत भाजपचा महापौर विराजमान झाला आहे.राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर नगरमध्ये पहिलीच निवडणूक होत आहे. महापालिकेच्या राजकारणात भाजपसोबत असलेली राष्ट्रवादी पोटनिवडणुकीत मात्र महाविकास आघाडीच्या नावाखाली अलिप्त राहिली. एकीकडे भाजपशी साथसंगत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नावाखाली अलिप्तता अशी दुहेरी चाल राष्ट्रवादी खेळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या