Friday, April 26, 2024
Homeनगरप्रभाग सहा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची भाजपला साथ ?

प्रभाग सहा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची भाजपला साथ ?

अखेरच्या दिवसापर्यंत उमेदवारच दिला नाही : शिवसेना-भाजपमध्ये सरळ लढत रंगणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेच्या प्रभाग 6 (अ) च्या पोटनिवडणुकीसाठी अखेर राष्ट्रवादीने अप्रत्यक्षरीत्या भाजपला मदत केल्याचे स्पष्ट झाले. या जागेसाठी आता भाजप आणि शिवसेना यांच्यात लढत होणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राष्ट्रवादीचे नेते निवडणूक कार्यालयाकडे फिरकले नाहीत. शिवसेनेकडून अऩिता दळवी यांचा तर भाजपकडून वर्षा सानप आणि पल्लवी जाधव या दोघींनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. छाननीनंतर भाजपचा अधिकृत उमेदवार कोण यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

- Advertisement -

प्रभाग सहा अ मधील शिवसेनेच्या नगरसेविका सारिका भुतकर यांचे जात प्रमाणपत्र फेटाळण्यात आल्याने त्यांचे पद रद्द झाले. त्यामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे. महापालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीत भाजप, शिवसेना स्वतंत्र लढले होते, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी करून लढले होते. यामध्ये सर्वाधिक जागा शिवसेनेला मिळाल्या असतानाही शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आले. त्यात भाजपला महापौर, उपमहापौर, एक सभापतिपद मिळाले. कालांतराने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे महापालिकेत ही युती आकाराला येईल, अशी चर्चा होती. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर या दोन्ही पक्षांची फारकत झाल्याने येथे ती शक्यता दुरावली.

राज्यात जरी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी असली, अन स्थानिक स्तरावरही ती आकाराला येण्याची भाषा नेते करत असले, तरी नगर शहरात त्याची दुरान्वयानेही शक्यता दिसत नाही. पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात गोपनीय बैठका झाल्याची चर्चा आहे. त्यात ही जागा भाजपसाठी सोपी करण्याच्या व्यूहरचना ठरल्याचेही बोलले जाते. निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना उमेदवार शोधत असताना राष्ट्रवादी मात्र यापासून दूर होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल मंगळवारी अखेरचा दिवस होता.

तोपर्यंत राष्ट्रवादीचे पदाधिकारी निवडणूक कार्यालयाकडेही फिरकले नाहीत. शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या पक्षाचे सर्व एकत्र आल्याचे चित्र निर्माण केले. जिल्हा नियोजन समितीत शिवसेनेत दुही निर्माण झाली असली, तरी उमेदवारी अर्ज दाखल करताना या पक्षाचे सर्व एकत्र होते. ती परिस्थिती भाजपमध्ये मात्र नव्हती. माजी खा. दिलीप गांधी यांना मानणार्‍यांनी पाठ दाखविल्याचे चित्र होते. मात्र शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

शिवसेनेकडून अनिता दळवी आणि भाजपकडून वर्षा सानप व पल्लवी जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे हे तीनही उमेदवार त्या प्रभागातील राहणारे नाहीत. भाजपचा उमेदवार कोण हे उद्या निश्‍चित होणार आहे. भाजपने दिलेल्या एबी फॉर्मवर पहिले नाव वर्षा सानप तर दुसरे नाव पल्लवी जाधव यांचे आहे. वर्षा सानप यांचे नाव मतदारयादीत नाही. या विरोधात त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे. त्यावर उद्या निर्णय त्यांच्या बाजूने आला तर त्या भाजपच्या उमेदवार असतील, त्यांच्या विरोधात निर्णय गेल्यास पल्लवी जाधव उमेदवार असतील, असे सांगण्यात आले.

भाजपचा अधिकृत उमेदवार कोण ?
भाजपकडून कोणाला उमेदवारी द्यायची, यावर काल दुपारी अडीचपर्यंत चर्चाच सुरू होती. सानप यांचे नाव मतदारयादीत नसल्याने पक्ष सावध होता. मात्र उमेदवारीच्या स्पर्धेत सानप अव्वल होते. भाजपने दोघांनाही एकत्र बसवून परिस्थिती समजावून सांगितली. त्यामध्ये न्यायालयाचा निकालावर कोणाला उमेदवारी मिळणार, हे निश्‍चित केल्याचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले. मात्र शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार पल्लवी जाधव असल्याचे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या