महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये सरळ लढत

jalgaon-digital
3 Min Read

वर्षा सानप यांचा अर्ज अवैध : जाधव यांच्या अर्जावरील आक्षेप फेटाळले

अहमदनगर (प्रतिनिधी) – शिवसेनेने जंग जंग पछाडूनही प्रभाग सहा (अ) मधील भाजपच्या उमेदवार पल्लवी जाधव यांचा अर्ज अवैध ठरविण्यात त्यांना अपयश आल्याने या प्रभागात आता कोणी अर्ज मागे न घेतल्यास भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे.
शिवसेनेच्या सारिका भुतकर यांचे जात प्रमाणपत्र फेटाळण्यात आल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले. त्यामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवेसेनेने भाजपचा पराभव केला होता.

विशेष म्हणजे महापौर बाबासाहेब वाकळे प्रतिनिधीत्त्व करीत असलेला हा प्रभाग आहे. या प्रभागात चारपैकी तीन नगरसेवक भाजपचे आहेत. त्यामुळे आता पोटनिवडणुकीत ही जागा शिवसेनेकडून खेचून घेण्याचा चंग भाजपने बांधला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस अलिप्त आहे. भाजपला अप्रत्यक्ष साथ देण्यासाठीच राष्ट्रवादीने ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे.

या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून अनिता दळवी तर भाजपकडून वर्षा सानप आणि पल्लवी जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी वर्षा सानप यांचे मतदारयादीत नाव नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. भाजपने दाखल केलेल्या एबी फॉर्ममध्ये एक नंबरला वर्षा सानप आणि दुसर्‍या क्रमांकाला पल्लवी जाधव यांचे नाव होते. निवडणूक निर्णय अधिकारी आशिमा मित्तल यांनी सानप यांचा अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे जाहीर केले. शिवसेनेने पल्लवी जाधव यांच्या अर्जावरही आक्षेप घेतले होते. शौचालय असल्याचे प्रमाणपत्र जोडलेले नाही, अर्ज दाखल करताना सादर केलेल्या शपथपत्रात अर्धवट माहिती आहे, असे वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून वकिलांमार्फत आपले म्हणणे मांडले.

बराचवेळ खल झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी आशिमा मित्तल यांनी शिवसेनेने घेतलेले सर्व आक्षेप फेटाळून लावत पल्लवी जाधव यांचा अर्ज वैध असल्याचे जाहीर केले.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आणखी दोन दिवसांचा कालावधी आहे. या काळात कोणी माघार न घेतल्यास या पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यातील सामना रंगण्याची चिन्हे आहेत. चारपैकी तीन भाजपचे नगरसेवक असलेला हा प्रभाग पूर्ण भाजपमय करण्यासाठी महापौर वाकळे यांच्यासह भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे आणि पदाधिकारी प्रयत्नशील असून, जागा कायम राखण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

वाद न्यायालयात जाण्याची शक्यता
पल्लवी जाधव यांच्या उमेदवारी अर्जावर घेतलेल्या आक्षेपानंतरही अर्ज वैध ठरल्याने शिवसेनेकडून यास न्यायालयात आव्हान देण्याच्या हालचाली सुरू आहेत. जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव यांनी तसे संकेत दिले. दुसरीकडे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी घेतलेला निर्णय मान्य करून शिवसेनेने मैदानात लढावे, असे आव्हान भाजपचे सचिन पारखी यांनी दिले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *