Thursday, April 25, 2024
Homeनगरमहापालिकेच्या रक्तपेढीची जबाबदारी डॉ. राजूरकर यांच्याकडे

महापालिकेच्या रक्तपेढीची जबाबदारी डॉ. राजूरकर यांच्याकडे

दुरवस्थेबाबत महापौरांकडून तीव्र नाराजी : खासगी संस्थेला चालविण्यास देण्याचाही पर्याय

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेच्या रक्तपेढीच्या अवस्थेबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत तातडीने रक्तपेढीची जबाबदारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्याकडून काढून ती बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांच्याकडे देण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या. तसेच सहा महिने रक्तपेढी व्यवस्थित न चालल्यास ती खासगी संस्थेमार्फत चालविण्याबाबतही विचार करण्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील रक्तपेढीच्या झालेल्या दुरवस्थेबाबत वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांवरून महापौर वाकळे यांनी बैठक घेतली. बैठकीस स्थायी समितीचे सभापती सभापती शेख मुदस्सर, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती लताताई शेळके, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगरसेवक महेंद्र गंधे, अजय चितळे, अजय ढोणे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, महावीर कांकरिया, डॉ. सतीश राजूरकर, डॉ. शेडाळे, डॉ. मुकुंद तांदळे, डॉ. शेख, आस्थापना प्रमुख मेहेर लहारे आदी उपस्थित होते.

सर्वसामान्य रुग्णांना अत्यंत अल्पदरात रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने नगरपालिका असताना रक्तपेढी सुरू करण्यात आली. या रक्तपेढीत लाखो रुपयांच्या नव्या मशिनरी धूळ खात पडल्या आहेत. याबाबत रक्त संकलन अधिकारी डॉ. शेडाळे यांना विचारणा केली असता त्यांनी कामकाजासाठी लिपिक उपलब्ध झाल्यामुळे होल ब्लड संकलनाचे काम सुरू करण्यात आल्याचे सांगितले. नागरिक रक्तदान करण्यासाठी आल्यास त्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत महापौरांनी स्टोअर विभागप्रमुख तसेच आरोग्याधिकारी यांना सूचना दिल्या. रक्त संकलन अधिकारी डॉ. शेडाळे यांना रक्तपेढी व्यवस्थित चालविण्याबाबत तंबी दिली.

डॉ. सतीश राजूरकर यांच्याकडे बाळासाहेब देशपांडे दवाखान्याची जबाबदारी असून त्या दवाखान्याचे कामकाज व्यवस्थित चालू असल्याबाबत यावेळी महापौर वाकळे यांनी आवर्जून सांगितले. रक्तपेढीची जबाबदारी सहा महिन्यांकरिता डॉ. राजूरकर यांच्याकडे प्रशासनाने देण्याबाबत कार्यवाही करावी. तसा लेखी आदेश त्यांना देण्यात यावा. रक्तपेढीच्या कामकाजासाठी सहा महिन्यांची मुदत त्यांना देण्यात यावी. त्यांच्याकडून देखील समाधानकारक काम न झाल्यास रक्तपेढी सेवाभावी संस्थेस चालविण्याकरिता देण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करण्याबाबतही सांगण्यात आले.

संस्थेमार्फत रक्तपेढी ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर चालवून नागरिकांना मनपाच्या ठरविण्यात आलेल्या दरामध्ये रक्तपुरवठा करावा लागेल, या दृष्टीने संस्था नियुक्त करण्याचे महापौर वाकळे यांनी सांगितले. रक्तपेढीचे कामकाज सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांनी जबाबदारीने करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी नगरसेवक महेंद्र गंधे यांनी रक्तपेढी भाजपचे ज्येष्ठ नेते कै. अटलबिहारी बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते रक्तपेढीचे उदघाटन झाले. रक्तपेढी गोरगरिबांसाठी सुरू केलेली असल्याने व अत्यंत जीवनाश्यक बाबीसाठी रक्ताची आवश्यकता असल्याने रक्तपेढीचे कामकाज सुरूळीत चालावे. यावेळी भाजपच्या मध्य मंडलाचे अजय चितळे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, अनिल गट्टाणी यांनी चर्चेत भाग घेतला.

दुरवस्थेचे कारण गुलदस्त्यातच
भाजपने मध्यंतरी अचानक रक्तपेढीला भेट देऊन तेथील दुरवस्था चव्हाट्यावर आणली. त्यावेळी रक्तसंकलन अधिकारी डॉ. शेडाळे यांनी आपल्या प्रस्तावाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे सांगत यास कंटाळून मी देखील नोकरी सोडणार असल्याचे सांगितले होते. मात्र आजच्या बैठकीत त्यांनी यावर ब्र शब्द काढला नाही. तसेच रक्तपेढीची एवढी दुरवस्था का झाली, हे देखील या बैठकीत समोर न आल्याने तेथील कारभार गुलदस्त्यातच राहिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या