Saturday, April 27, 2024
Homeनगरअकोलेत रोटेशन पद्धतीने दुकाने सुरु- मुख्याधिकारी

अकोलेत रोटेशन पद्धतीने दुकाने सुरु- मुख्याधिकारी

तहसिलदार मुकेश कांबळे यांच्या आदेशान्वये काही अटी, निर्बंध घालून शिथिलता

अकोले (प्रतिनिधी)- करोनाच्या पार्श्वभूमीवर अकोले शहरात लॉकडाऊन च्या कालावधीत व्यापारी, व्यावसायिक तसेच ग्राहकांची गैरसोय दूर व्हावी या हेतूने तहसिलदार मुकेश कांबळे यांच्या आदेशान्वये काही अटी, निर्बंध घालून शिथिलता देण्यात आली, अशी माहिती अकोले नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ.सचिनकुमार पटेल यांनी दिली. करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शहरातील दुकाने दररोज चालू ठेवल्याने गर्दी होऊन सामाजिक अंतर राखणे जोखमीचे होते, परिणामी करोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तहसीलदार अकोले याचे आदेशानुसार अकोले शहरातील दुकाने पुढीलप्रमाणे वारनिहाय सकाळी 8.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत चालू राहतील.

- Advertisement -

सोमवार व गुरुवार ऑटोमोबाईल्स (फक्त सर्व्हिसिंग करीता) कम्प्युटर / इलेक्ट्रॉनिक्स दुकाने, बॅटरी, रेडिमेड फर्निचर, मोबाईल शॉपी, खेळणी दुकाने, फुले व पुष्पहार दुकाने, रेडियम आर्ट. मंगळवार व शुक्रवार कापड दुकाने, भांडी, टेलरिंग दुकाने, रस्सी/पत्रावळी, ज्वेलरी/सोने दुकान, वॉच स्टोअर्स, सुटकेस/बॅग्स, फ्लेक्स बोर्ड.
बुधवार व शुक्रवार जनरल स्टोअर्स, कटलरी, सायकल दुकाने, स्टील ट्रेडर्स, स्क्रॅप्ट मर्चंट, हार्डवेअर, बिल्डिंग मटेरियल, पेंट, कार वाशिंग सेंटर, मातीची भांडी दुकाने, टोपल्या, बांबू दुकाने.

दररोज (रविवार वगळून) जीवनावश्यक सेवा अंतर्गत किराणा माल दुकाने, भाजीपाला, फळे, दूध, शेतीविषयक अवजारे, बी-बियाणे, औषधे, झेरॉक्स, फोटोग्राफर.
वर नमूद नसलेली मात्र अत्यावश्यक सेवा नसलेली दुकाने / आस्थापना बुधवार व शनिवारी उघडे राहतील.

वरील सर्व दुकाने ही पुढील अटी व शर्तींचे पालन होत असल्याचं चालू राहतील. विक्रेते यांनी ग्राहकाने मास्क लावलेला असेल तरच दुकानात प्रवेश द्यावा.दुकानात 4 ते 5 व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत. दुकानाचे प्रवेशद्वारावर ग्राहकांचे थर्मल स्कॅनिंगची सुविधा करण्यात यावी, 5 वर्षाखालील व 60 वर्षावरील व्यक्तींना प्रवेश देण्याचे टाळावे. (हॉस्पिटल सेवा वगळून), दुकानात प्रवेशाच्या वेळी सर्व ग्राहकांना हँडवॉश किंवा सॅनिटायझर ची सुविधा पुरविण्यात यावी, सर्व आस्थापना यांना त्यांचे दुकानात येणार्‍या ग्राहकांची सर्व माहिती (नाव , पत्ता, मोबाईल नं., वेळ ) नमूद करण्यासाठी एक रजिस्टर ठेवणे बंधनकारक आहे, दुकानात व दुकानाबाहेर सामाजिक अंतर ठेवावे लागेल, आस्थापना चालक, मालक व कर्मचारी यांनी आरोग्य सेतू अ‍ॅप वापरणे बंधनकारक राहील.

ज्या आस्थापनेमध्ये एकापेक्षा जास्त व्यवसाय चालवले जातात त्या आस्थापनाही आठवड्यातून दोन दिवसापेक्षा जास्त दिवस चालू ठेवता येणार नाही. वरील अटी व शर्तींचे पालन न करणारी दुकाने तात्काळ बंद करणेत येऊन संबंधितांवर दंडात्मक कारवाई करणेत येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. तसेच काही ठिकाणचे लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले जात आहे, मात्र आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक बंद राहणार असून प्रवासी टॅक्सी, बस वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. शैक्षणिक संस्था, खाजगी कोचिंग क्लासेस, सिनेमा थिएटर, मॉल, व्यायामशाळा, सलून, बार, हॉटेल, खाणावळ, पान टपरी, स्विमींग पुल/केंद्र, मनोरंजन केंद्र, मंगल कार्यालये धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत

तसेच सांस्कृतिक, मनोरंजनाचे व धार्मिक कार्यक्रमास प्रतिबंध असून सार्वजनिक ठिकाणी धार्मिक स्थळी सामुदायिक कार्यक्रम, पुजा पाठ, अर्चना, नमाज यांना मनाई आहे. अंत्यविधी देखील जास्तीत जास्त 20 व्यक्तिंचे उपस्थिती मध्ये सामाजिक अंतर राखूनच पार पाडावा असे आवाहन अकोले नगरपंचायत, अकोलेचे मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल, नगराध्यक्षा संगीताताई शेटे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या