Friday, April 26, 2024
Homeनगरअकोले : धामणगाव पाट येथे करोना बाधित सापडला

अकोले : धामणगाव पाट येथे करोना बाधित सापडला

अकोले (प्रतिनिधी)- अकोले तालुक्यात आठवडाभरापासून करोना बाधित रुग्ण सापडत असून आजही घाटकोपर येथून गावी परतलेल्या एका 49 वर्षिय व्यक्तीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील करोना बाधितांची संख्या आता नऊ झाली आहे. विशेष म्हणजे हे सर्व नऊच्या नऊ रुग्ण मुबंईच्या वेगवेगळ्या भागातून तालुक्यात आपापल्या गावी आलेले आहेत.

या 49 वर्षीय व्यक्तीचे मूळ गाव तालुक्यातील जांभळे हे आहे. तो घाटकोपर -मुबंई येथे राहत असून एका खासगी कंपनीत नोकरी करतो. 28 मे रोजी तो त्याची पत्नी,भाची व त्याचा चुलत भाऊ असे चार जण खासगी वाहनाने अकोले तालुक्यात आले.मात्र जांभळे येथे न जाता तो आपल्या पत्नी आणि भाचीसह धामणगाव पाट येथे आला.तेथे त्याची बहीण राहत आहे.तेथेच या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले होते.त्याचा चुलतभाऊ मात्र जांभळे या आपल्या गावी गेला.

- Advertisement -

शुक्रवारी त्याला त्रास जाणवू लागल्याने धामणगाव पाट येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात तपासणी केली,त्याला आरोग्य यंत्रणेने नगर येथे पाठविले.त्याचा तपासणी अहवाल आज प्रशासनाला प्राप्त झाला.त्यात तो पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे धामणगाव पाट गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या रुग्णाला घेऊन येणार्‍या त्या खासगी वाहन चालकाचाही नंबरही करोना समितीने मिळविला असून ठाणे येथील तो असल्याचे समजले.दरम्यान ठाणे येथील प्रशासनाशी संपर्क साधून त्या संबंधित चालकाची माहिती दिली जाणार आहे, असे धामणगाव पाटचे माजी सरपंच अशोक शेळके यांनी सांगितले.

धामणगाव पाट गावात मुंबई व अन्य ठिकाणाहून आलेले दहा जण जि. प. प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहेत तर अन्य 15 जण त्यांच्या घरी क्वारंटाईन आहेत, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी रोहिदास वैद्य यांनी दिली. अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे 25 मे रोजी पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर ढोकरी, समशेरपूर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला.तर पिंपळगाव खांड येथे बुधवारी व गुरुवारी सलग दोन दिवसांत चार रुग्ण आढळले. शुक्रवारी केळुंगण येथे एक रुग्ण सापडला. तर काल शनिवारी धामणगाव पाट येथे पाहुणा म्हणून आलेल्या जांभळे येथील एका व्यक्तीस करोना झाल्याचे निष्पन्न झाले.त्यामुळे तालुक्यातील करोना बाधितांची संख्या नऊ झाली आहे.

अर्थात हे सर्वजण मुबंई परिसरातून आलेले आहेत.एखादा अपवाद वगळता सर्वांना त्यांचे गावी क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांचा संसर्ग अद्याप झालेला नाही.तसेच तालुक्यातील एकही स्थानिक व्यक्तीला करोनाची लागण झालेली नाही. तहसीलदार मुकेश कांबळे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.इंद्रजित गंभीरे,पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे व त्यांचे सहकारी तातडीने करोना बाधित सापडलेल्या त्या त्या गावात जाऊन सुरक्षेच्यादृष्टीने तातडीने अंमलबजावणी व पुढील सूचना देत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या