Friday, April 26, 2024
Homeनगरअकोलेचे बीडीओ सक्तीच्या रजेवर

अकोलेचे बीडीओ सक्तीच्या रजेवर

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी) – अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यांच्यावर जिल्हा परिषद सदस्या सुषमा दराडे यांनी गंभीर आरोप केले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. पाटील यांनी ही कारवाई केली.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची काल बैठक होती. या बैठकीपूर्वी पाटील यांनी गटविकास अधिकारी रेंगडे यांना बोलावून घेतले होते. त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप व त्या संदर्भातील कागदपत्र सोबत आणण्याचेही त्यांना सांगण्यात आले होते. सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर त्यात काही त्रुटी आढळल्याने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्थायी समितीची सभा सुरू झाल्यानंतर जि. प. अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी दराडे यांनी अकोले पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांवरील आरोपांबाबत विचारणा केली. तसेच या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आठ दिवसांपूर्वीच आपण दिल्या असून, त्याचे काय झाले याची विचारणा केली. त्यावेळी गटविकास अधिकारी रेंगडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याची माहिती पाटील यांनी सभेत दिली.

बुर्‍हाणनगर व इतर गावांसाठी असलेल्या पिण्याच्या पाणीयोजनेतून माजी आमदारांनी शेतीसाठी कनेक्शन घेतले असून, त्यावर काय कारवाई केली, असा प्रश्‍न जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे यांनी उपस्थित केला. कराळे यांचा रोख माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या दिशेने असल्याचे मानले जाते. तसेच या योजनेच्या थकबाकीबाबतही विचारणा करण्यात आली.

ठेकेदार फाईल कशी आणतात ?
जिल्हा परिषदेची कामे करणार्‍या काही ठेकेदारांनी कामाच्या फाईलसह जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांची भेट घेतली होती. यावर सभेत अध्यक्षांनी संबंधित अधिकार्‍यांना धारेवर धरत ठेकेदार माझ्या दालनात फाईल घेऊन कशा येतात, अशी विचारणा केली. तसेच संबंधित अधिकार्‍याला खडसावले.

- Advertisment -

ताज्या बातम्या