Saturday, April 27, 2024
Homeनगरनागरिकत्वाला अभ्यास न करता विरोध, ही शोकांतिका

नागरिकत्वाला अभ्यास न करता विरोध, ही शोकांतिका

अ‍ॅड. उज्ज्वल निकम : शिक्षक मंडळाचा प्रतिभाविष्कार शिक्षक साहित्य संमेलनाला प्रतिसाद

अहमदनगर (प्रतिनिधी)- कायदा हा वाईट नसून त्याचा उद्देश, हेतू समजून घेतल्यास त्याची महती लक्षात येते असे सांगून नागरीकत्व सुधारणा कायद्याचा अभ्यास न करता विरोध करणे ही शोकांतिका आहे, असे प्रतिपादन राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी केले.

- Advertisement -

जिल्हा गुरूकुल शिक्षक मंडळ, प्राथमिक शिक्षक समिती, गुरूकुल सांस्कृतिक समिती, गुरुकुल महिला आघाडी, ऊर्दू शिक्षक, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक समितीच्यावतीने आयोजित गुरूकुल प्रतिभाविष्कारातील शिक्षक साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आ.लहू कानडे होते. भाजपचे आ.बबनराव पाचपुते, अभिनेते मोहिनीराज गटणे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत सोनार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आम्ही कायद्याची भाषा बोलतो आणि साहित्यिक ही काळजाची! कायदा हा वाईट नसतो. तो नेहमीच चांगला असतो. त्याचा उद्देश, हेतू जेव्हा समजून येतो तेव्हा त्याची महती लक्षात येते असे सांगून नागरिकत्व सुधारणा कायदा किती जणांना माहिती आहे? असा प्रश्न सभागृहाला करून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी त्याकडे लक्ष वेधले. सभागृहातील एकानेच हात वर केला. त्यावर ते म्हणाले, ही शोकांतिका आहे. त्याचा अभ्यास केला पाहिजे. या कायद्याचा धर्माशी संबंध आहे का हे देखील अभ्यासले पाहिजे.

चुकांची पुनरावृत्ती करणे हे मुर्खपणाचे लक्षण आहे, असेही ते म्हणून त्यांनी समाजात, देशात जेव्हा ज्वलंत प्रश्नावर चर्चा होत असते तेव्हा शिक्षकांनी त्यावर अभ्यास करून पूर्णपणे बोलले पाहिजे. सामाजिक शांतता, सलोख्याला जेव्हा धोका निर्माण होतो, त्यावेळी शिक्षकांची जबाबदारी समाजाप्रती वाढते, असेही ते म्हणाले.

उज्ज्वल निकम, आ. कानडे, सोळंके, गटणे या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष रा. या. औटी यांनी प्रास्ताविक केले. कला ही माणसाला नितीमान करते. यावरून नैतिकदृष्ट्याही आयुष्य जगले पाहिजे. प्रत्येकाने कला जोपासली पाहिजे, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना देण्यासाठी नवीन सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी मी पाठपुरावा करणार असल्याचे अध्यक्षस्थानावरून भाषण करताना ज्येष्ठ साहित्यिक लहू कानडे यांनी सांगितले.

प्राथमिक शिक्षक गुरूकुल मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन शिंदे यांनी स्वागत केले. शिक्षक मंडळाचे प्रतिभाविष्कार शिक्षक साहित्य संमेलनाला प्रतिसाद नितीन काकडे, वृषाली कडलग, रा. या. औटी, नितीन काकडे, संजय धामणे, संतोष भोपे, गजानन जाधव, राजेंद्र ठागणे, इमान सय्यद, मधुकर मैड आदींनी परिश्रम घेतले. संजय धामणे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या