Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर : आडतेबाजारात पोलिसांची दंडेलशाही

Share
नगर : आडतेबाजारात पोलिसांची दंडेलशाही, Latest News Adate Bajar Police Problems Close Shop Ahmednagar

किराणा दुकानही बळजबरीने बंदचे फर्मान

अहमदनगर (प्रतिनिधी) – बंदमधून किराणा दुकानांना जिल्हा प्रशासनाने सुट दिली असली तरी पोलीस प्रशासन मात्र बळजबरीने दुकाने बंद करत असल्याची तक्रार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा यांनी कलेक्टरांकडे केली आहे. प्रशासनाला व्यापारी सहकार्य करण्यास तयार आहे, मात्र असा आडमुठेपणा कामाचा नसल्याचे सांगत पोलिसाबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 31 तारखेपर्यंत आवश्यक सेवा वगळून बंद जाहीर केला आहे. बंदमधून किराणा दुकाने वगळली आहेत. आज शनिवारी आडतेबाजारातील किराणा दुकान, धान्य विक्रीचे भुसार दुकानेही पोलिसांनी बळजबरीने बंद करण्यास भाग पाडले. यासंदर्भात चोपडा यांनी कलेक्टर राहुल द्विवेदी आणि एसपी सागर पाटील, सीटी डिवायएसपी संदीप मिटके यांच्याशी संपर्क करत त्यांना माहिती दिली.

किराणा दुकान सुरू करण्यास प्रशासनाची परवानगी आहे. भुसार धान्य विक्रीची सूचना पणन महासंचालक कार्यालयाने व्यापार्‍यांना दिली आहे. पोलीस मात्र या दोन्ही अस्थापना बंद करण्याचे सांगत आहे. न केल्यास गुन्हा दाखल करण्याचे बोलत आहेत. व्यापार्‍यांनी दुकाने बंद करावीत की सुरू ठेवावी असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनानेच आता मार्गदर्शन करावे अशी मागणी राजेंद्र चोपडा यांनी केली आहे.

व्यापारी प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार आहे. जीवनाश्यक वस्तूचा तुटवडा नको अन् काळाबाजार नको म्हणून व्यापारी काळजी घेत आहेत. दुकान गर्दी होणार नाही याचीही दक्षता घेतली जात आहे. पण पोलीस मात्र चुकीच्या पध्दतीने वागत आहे. ते वागणे बंद झाले पाहिजे.
– राजेंद्र चोपडा, अध्यक्ष, आडतेबाजार व्यापारी संघटना

गरिबांना देणार मदतीचा हात
कोरोना बंदमुळे अनेकांच्या हातचे काम हिरावले गेले आहे. त्यांच्या घरात खाण्याचे वांदे झाले असतील. असे गरीब कुटुंब प्रशासनाने दाखून द्यावे. प्रशासनाला सोबत घेऊनच त्या गरीब कुटुंबाला व्यापारी संघटना मदत करण्याची भूमिका घेईल. कोरोनाचे जागतिक संकट असून सामाजिक दायित्व म्हणून व्यापारी संघटना मदतीचा हात पुढे करणार असल्याची माहिती व्यापारी संघटनेचे सचिव संतोष बोरा यांनी दिली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!