Sunday, April 28, 2024
Homeनगरबंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसाला टँकरने उडविले

बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसाला टँकरने उडविले

शेंडी बायपासवर पहाटे तीनला घडलेली घटना

अहमदनगर (प्रतिनिधी) – औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास येथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचार्‍याला गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास भरधाव टँकरने (क्र. एमएच-12 आरएन- 6998) उडविले. या अपघातात पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी व सध्या शहर वाहतूक शाखेमध्ये नेमणूकीस असलेले नदीम शेख यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. त्यांना नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, टँकर चालक पसार झाला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सध्या करोनामुळे सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. बायपास भागामध्ये नाकाबंदीसाठी वाहतूक शाखेचे पोलीस नियुक्त असतात. शहर वाहतूक शाखेला बंदोबस्तासाठी मुख्यालयातील आठ कर्मचारी दिले आहे. शेंडी बायपास येथे वाहने सोडण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. त्या ठिकाणी दररोज पोलीस मुख्यालयातील एक कर्मचारी व वाहतूक शाखेचा एक अशा दोन पोलीस कर्मचार्‍यांची नियुक्ती असते. बुधवारच्या रात्री मुख्यालयातील शेख व वाहतूक शाखेचे गरड यांची शेंडी बायपास येथे नेमणूक केली होती.

पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एक टँकर भरधाव आला. टँकरने बॅरिकेडिंग उडवून दिले. त्यात शेख यांना वाहनाची धडक बसून ते गंभीर जखमी झाले. काही अंतरावर जाऊन टँकरही उलटला. इतर पोलीस कर्मचार्‍यांनी शेख यांना नगरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांना घटनेची माहिती मिळताच शेख यांची त्यांनी रुग्णालयात विचारपूस केली. तसेच शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरुण मुलाणी, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनीही शेख यांची रुग्णालयात जाऊऩ विचारपूस केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या