Type to search

‘स्वीकृत’ शिफारशींचे कवित्व संपता संपेना !

Share
‘स्वीकृत’ शिफारशींचे कवित्व संपता संपेना !, Latest News Accepted Amc Corporators Problems Ahmednagar

भाजप पाठोपाठ आता राष्ट्रवादीतही आलबेल नसल्याचे स्पष्ट : घुले श्रेष्ठींकडे तक्रार करणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेतील स्वीकृत सदस्य नियुक्तीचे कवित्व अद्यापही संपायला तयार नाही. या पदासाठी आलेले सर्व अर्ज निकष पूर्ण न करणारे असल्याने ते अपात्र केले असले, तरी अद्याप पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी करण्याचा सपाटा सुरूच आहे. भाजपच्या घोळानंतर आता राष्ट्रवादीतील सुंदोपसुंदी समोर आली असून, पक्षाने नाव सांगूनही स्थानिक नेत्यांनी डावलल्याचा आरोप करत माजी नगरसेवक संजय घुले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.

महापालिकेत स्वीकृत सदस्य नियुक्त करण्यासाठी शुक्रवार दि. 10 रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. पक्षीय बलानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रत्येकी दोन आणि भाजप एक असे पाच सदस्य नियुक्त होऊ शकतात. यासाठी संबंधित पक्षाच्या गटनेत्यांनी गुरुवारी त्यांनी शिफारस केलेल्या उमेदवारांचे अर्ज आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्र महापालिकेत दाखल केले होते.

गुरुवारी रात्री उशिरापर्यंत या कागदपत्रांची छाननी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी केली. शुक्रवारी झालेल्या सभेत त्यांनी आपल्या अभिप्रायासह शिफारस पिठासीन अधिकारी तथा महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे सुपूर्द केली.

स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी आवश्यक असलेले निकष पूर्ण करण्यासाठी दाखल करण्यात आलेले कागदपत्र, पुरावे अपूर्ण असल्याचे त्यांनी आपल्या शिफारशीमध्ये नोंदवित नियुक्तीस नकारात्मक शिफारस केली होती. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडल्याने एकच गोंधळ उडाला. महापौर वाकळे यांनीही द्विवेदी यांची शिफारस मान्य करत सर्व अर्ज अपात्र ठरवत नव्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे जाहीर केले.

प्रशासकीय पातळीवर स्वीकृत सदस्य नियुक्तीचा विषय तात्पुरता संपुष्टात आला असला, तरी राजकीय पातळीवर मात्र याचे कवित्व अद्यापही सुरू आहे. भाजपकडून दाखल करण्यात आलेला अर्ज, त्यासाठी झालेल्या हालचाली, त्यावर झालेले आरोप असे प्रकार घडल्यानंतर आता राष्ट्रवादीतही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.

मागीलवेळी स्वीकृत नगरसेवक असलेले संजय घुले यावेळीही इच्छूक होते. त्यांनी यासाठी पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादीकडून दोन सदस्य नियुक्त होणार असल्याने एक सदस्य पक्षाचा आणि दुसरा सदस्य आ. अरूण जगताप व आ. संग्राम जगताप सुचवतील तो, नियुक्त करावा, अशा सूचना पवार यांनी देतानाच पक्षाकडून आपले नाव सुचविले असल्याचा दावा घुले यांनी केला.

घुले म्हणाले, पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर, मागील काळातील माझे महापालिकेतील काम पाहून त्यांनी आपल्या नावाला हिरवा कंदील दाखविला. एवढेच नव्हे, तर पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे यांना लगेच संपर्क करून माझे नाव अंतिम झाल्याचे सांगितले. तसा निरोप जगताप पितापुत्रांना देण्याचेही सांगितले. काकडे यांनी तो निरोप आ. जगताप यांच्यापर्यंत पोहोच केला. स्वतः उपमुख्यमंत्री पवार यांनीही आ. जगताप यांना या सूचना दिल्या.

असे असतानाही आपल्याला डावलण्यात आल्याचे घुले यांचे म्हणणे आहे. पक्षाचा आदेश असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे याबाबत आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही घुले यांनी सांगितले. माळीवाडा भागात आम्ही पक्षाचे काम करतो. तेथे शिवसेनेचे प्राबल्य आहे. असे असतानाही आम्ही काम करत असल्याने तेथे बळ देणे आवश्यक आहे.

आमच्याबद्दल प्रेम नसल्यास वैद्यकीय, वकील, शिक्षण आदी क्षेत्रातील कोणालाही नियुक्त केल्यास चालेल. विधानसभा निवडणुकीत धनगर, ब्राह्मण आदी समाजांतील लोकांनी राष्ट्रवादीला मतदान केले. त्यावेळीही अनेकांना शब्द दिलेला होता. त्यांचाही विचार न करता आपल्या जवळच्यांना संधी देणे अयोग्य आहे, असे घुले यांनी म्हटले आहे.

सबकुछ प्रभाग 14
पक्षाचे आमदार असलेले संग्राम जगताप आणि अरुण जगताप दोघेही प्रभाग 14 मधील रहिवासी आहेत. या प्रभागात राष्ट्रवादीचे चार नगरसेवक आहेत. असे असताना स्वीकृतसाठी शिफारस केलेले विपुल शेटिया आणि बाबासाहेब गाडळकर हे दोघे देखील प्रभाग 14 मधीलच रहिवासी आहेत. सर्व संधी एकाच प्रभागात दिल्यावर शहरात पक्ष कसा वाढेल, असा प्रश्नही घुले यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!