Wednesday, April 24, 2024
Homeनगरकरोनामुळे सत्र उशिरा सुरू होणार; अध्यापनाचे तास घटणार

करोनामुळे सत्र उशिरा सुरू होणार; अध्यापनाचे तास घटणार

संगमनेर (वार्ताहर)- करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक सत्रातील काही दिवस वाया जाणार असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात दहावी बारावीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या अभ्यासक्रमाचे अध्ययन-अध्यापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत होती. मात्र यावर्षी मे अखेरपर्यंत दहावी बारावीचे वर्ग अध्यापन सुरू झालेले नाही. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षांत किती कालावधी मिळणार याबाबत संदिग्धता आहे. त्यामुळे अभ्यासक्रम कमी करण्याबाबत शिक्षण विभाग विचार करीत आहे.

याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, बालभारती, राज्यमंडळातील अधिकारी आणि विषय समितीचे अध्यक्ष यांची नुकतीच बैठक झाली. त्यात अभ्यासक्रम कमी करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. काही सदस्यांनी अभ्यासक्रम कमी करण्यास विरोध केला असला तरी प्राप्त परिस्थिती लक्षात घेता कमी करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे यावर्षी सर्वच वर्गांचा अभ्यासक्रम कमी होणार हे आता निश्चित झाले आहे.

- Advertisement -

करोनाच्या पार्श्वभूमीवरती शैक्षणिक वर्षाच्या संदर्भाने अभ्यासक्रम कमी करण्याच्यादृष्टीने बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीमध्ये काही सदस्यांनी वेगळी मते मांडली आहेत. समितीच्या सर्व सदस्यांचा विरोध असा अर्थ होत नाही. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि बालभारतीने शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्यास होणार्‍या संभाव्य कालावधीचा विचार करून कोणत्या टप्प्यावर अभ्यासक्रमाचा किती आणि कोणता भाग कमी करावा याची विचारपूर्वक मांडणी केली आहे असे माजी शिक्षण संचालक तथा अध्यक्ष मराठी अभ्यासक्रम समिती, बालभारती शिवाजी तांबे यांनी सांगितले.

केंद्रीय बोर्डाने अभ्यासक्रम केला कमी
केंद्रीय शिक्षण मंडळाने त्यांचा अभ्यासक्रम राबविण्यात येणार्‍या शाळांमध्ये पुढील वर्षाचा अभ्यासक्रम कमी करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, अभ्यासक्रमातील घटक वगळण्याऐवजी शिक्षकांनी वर्गात शिकवण्याचे घटक आणि विद्यार्थ्यांनी स्वत: तयारी करण्याची घटक अशी विभागणी करण्यात आली आहे.

शाळा सुरुची तारीख निश्चीत नाही
करोनाच्या लॉकडाऊनमुळे राज्यातील शाळा केव्हा सुरू होणार यासंदर्भात अद्याप मंत्रालय पातळीवर अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. शाळा सुरू केव्हा करायच्या यासंदर्भात केंद्र सरकारच्या आदेशानंतरच राज्यातील शाळा सुरू होतील असा अंदाज आहे. सध्या पूर्व नियोजनाप्रमाणे 15 जूनला शाळा सुरू करण्यासंदर्भात चाचपणी करण्यात येत आहे. शाळा सुरू करावयाची झाल्यास भौतिक अंतर राखणे, आरोग्याच्या सुविधा देणे या संदर्भातला विचार करण्यात येत आहे. मात्र 15 जूनला शाळा सुरू होतील असे आज तरी चित्र नाही. राज्यातील शाळा सुरू करताना एकाच दिवशी सुरू करण्याची शक्यता नाही. यासंदर्भात स्थानिक पातळीवरची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी निर्णय घेऊ शकतील. त्यादृष्टीने राज्यस्तरावर विचारविनिमय सुरू असल्याचे समजते.

अनावश्यक भाग वगळणार
करोनामुळे शाळांच्या कामकाजात काहीसा अडथळा आहे. त्यातून कामाचे दिवस कमी होत असल्याची बाब समोर येत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही अशाप्रकारे अभ्यासक्रम कमी करण्याची सूचना अभ्यास मंडळांना दिली आहे. त्यांच्या शिफारसीनुसार अभ्यासक्रम कमी करण्यात येईल. मात्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने तयार करण्यात आलेला मूल्यमापन आराखडा बदलणार नाही.
-दिनकर पाटील, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद.

- Advertisment -

ताज्या बातम्या