Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कसारा घाट खचल्याचा अहवाल लवकरच मिळणार; ‘न्हाई’ करणार उपाययोजना

Share

नाशिक । भारत पगारे

काही महिन्यांपूर्वी जुन्या कसारा घाटाला तडे जाऊन खचल्याची घटना घडली होती. मात्र आता या घाटाची ऑस्ट्रेलियातील तज्ज्ञ अभियंते आणि शास्त्रज्ञांनी पाहणी केली असून त्याचा अहवाल येत्या काही महिन्यात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) मिळणार आहे. आलेल्या अहवालानुसार खचलेल्या कसारा घाटात ‘न्हाई’ उपाययोजना करणार आहे.

19 जुलैच्या अखेर जुन्या कसारा घाटात मुख्य रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या होत्या. त्यामुळे या रस्त्याने ‘प्रवास करून नका’, असे संदेश सोशल मिडीयावर फिरत होते. त्यातच खचलेल्या जुन्या कसारा घाटाचे लाईव्ह फोटोदेखील व्हायरल करण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांत भिती पसरली होती. 450 फूट लांब आणि दोन ते तीन फूट रूंदीच्या या भेगा होत्या. त्यामुळे येथील जमिन साधारत: एक मीटरपर्यंत धसली होती. हा प्रकार लक्षात येताच संबंधित यंत्रणांनी तत्काळ येथील लेन बंद करून नविन कसारा घाटातून सिंगल लेनने वाहतूक वळविली होती. याच घटनेनंतर ‘न्हाई’ ने या घटनेच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील तज्ज्ञांना पाचारण केले.

ऑस्ट्रेलिया येथून आलेल्या या अभियंते, शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांच्या चमूने जुन्या कसारा घाटाची पाहंणी केली. त्यांनी येथे एसआरटी, जिओटेक यासह अन्य महत्त्वाच्या चाचण्यादेखील केल्या असून त्यांचा अहवाल येत्या 2 ते 3 महिन्यांत न्हाईला सादर केला जाणार आहे. घाटाची पाहणी करून अहवाल पाठविल्यावर त्यात केलेल्या सूचना आणि निर्देशांवर न्हाईकडून तत्काळ उपाययोजना केल्या जाणार असून कसारा घाट सेक्शन हा डोंगरदर्‍यातून जाणारा धोकादायक वळण रस्ता आहे.

येथे मोठया प्रमाणात पर्जन्याचे प्रमाण आहे. त्यामूळे पावसाच्या दिवसात येथे दरडी कोसळण्याचे प्रमाणही वाढते. तसेच भुस्खलन होऊन रस्त्याला तडे वा भेगा पडतात. यापूर्वी या परीसरात एवढ्या धोकेदायक भेगा पडल्या नसल्याचे आधिकार्‍यांनी सांगितले आहे. आता अहवालात काय माहिती येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असून नैसर्गिक कारणांमुळे जमिनीच्या भूगर्भात छोट्यामोठ्या हालचाली नेहमीच घडत असतात, असे आधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

घाट सेक्शनमध्ये 14 मृत्यू

कसारा घाट सेक्शनमध्ये जानेवारी ते 15 नोव्हेंबर या अकरा महिन्यात अपघाताच्या 68 घटना घडल्या आहेत. त्यातील 10 अपघात हे तीव्र स्वरूपाचे होते. तसेच या कालावधित 14 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. तर 3 नोव्हेंबर 2019 रोजी घाटात एका कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने 8 गाड्यांना धडक दिल्याने मोठा अपघात घडला होता. त्यात 2 जणांचा मृत्यू तर 11 जण जखमी झाले होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!