संगमनेर, जामखेडचे आठजण कोरोनामुक्त

jalgaon-digital
3 Min Read

आतापर्यंत 12 रुग्णांची कोरोनावर मात : आणखी 19 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. वेळीच केलेले कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, लॉकडाऊन, हॉट स्पॉटवर कडक अंमलबजावणी आणि त्यानंतर रुग्णावर झालेले योग्य उपचार यामुळे जिल्ह्यातील 12 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. संगमनेर तालुक्यातील आणि जामखेड येथील प्रत्येकी चार अशा आठ रूग्णांची 14 दिवसानंतरचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रविवारी बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुक्त झालेल्या या आठ रुग्णांना आता संस्थात्मक अलगीकरणसाठी संगमनेर व जामखेड येथे ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

दरम्यान, रविवारी सायंकाळी उशीरापर्यंत आणखी 19 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. संगमनेर शहरातील तीन आणि आश्वी बुद्रुक या ग्रामीण भागातील एक तर जामखेड शहरातील चौघे अशा आठ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने हॉटस्पॉट लागू करत संचारबंदी आणखी कडक केली होती. तसेच बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी आणि बाधितांवर वेळीच उपचार केले. या दरम्यानबाधित रुग्णांचा 14 दिवसानंतर दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने हे रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे प्रशासनाने जाहीर करत त्यांना रविवारी दुपारी रुग्णवाहिकेतून संगमनेर आणि जामखेड येथे हलविण्यात आले. त्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

त्यांची प्रकृती स्थिर आणि ठणठणीत असल्याचे आणि ते पूर्णपणे बरे झाल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी दिली. या आठ जणांवर नगर शहरातील बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. या रुग्णांनी उपचाराला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे ते बरे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नगरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा 29 आहे. यात, मूळचा श्रीरामपूर तालुक्यातील आणि पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेणार्‍या एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच, कोपरगाव येथील महिला आणि जामखेड येथील एका व्यक्तीचा कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. यापूर्वी चौघे जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 14 रुग्णांवर नगरच्या बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

19 अहवाल निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे रविववारी सकाळी 10 वाजेपर्यंत 19 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यात, 16 नवीन रूग्ण असून इतर 3 व्यक्तींचा अहवाल तर एका व्यक्तीचा 14 दिवसांनंतर पहिला अहवालांचा समावेश होता. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिले.

गोवा ठरलं कोरोनाला हरवणारं देशातील पहिलं राज्य!
कोरोना व्हायरसमुळे अवघ्या देशाचा वेग मंदावला असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आलीय. भारतातील एका राज्यानं संपूर्णपणे कोरोनावर मात केलीय… आणि हे राज्य आहे गोवा… रविवारी, गोव्यातील सर्व रुग्णांवर उपचार यशस्वी ठरल्याचं आणि राज्यात एकही नवीन रुग्ण न सापडल्यानं गोवा ‘कोरोनामुक्त’ झाल्याचं राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केलंय. रविवारी सर्व कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर सर्व रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय.

बाधीतांचा आकडा 30
नेवासे येथील एका व्यक्तीचा 14 दिवसा पूर्वीचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, त्याचा दुसरा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला होता. हा व्यक्ती तबलिगी जमातच्या संपर्कात असल्याने त्याला क्वारंटाईन करण्यात आले. यामुळे आता जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 30 वर पोहचला असल्याची माहिती डॉ. मुरंबीकर यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *