Type to search

सप्टेंबर अखेर जिल्ह्यात डेंग्यूचे 509 रुग्ण; जुलै नंतरच्या तिमाहीत रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

Share

नाशिक । अजित देसाई

सततच्या पावसामुळे नाशिक शहर व जिल्ह्यात डेंग्यूचा विळखा घट्ट होत असल्याचे चित्र आहे. सप्टेंबर पाठोपाठ ऑक्टोबर महिन्यातही रुग्णांची संख्या वाढती असून जानेवारीपासून सप्टेंबरअखेर जिल्ह्यातील डेंग्यूबाधितांची संख्या 509 वर पोहोचली आहे. हा आकडा वाढता असला तरी गेल्या वर्षापेक्षा यंदा 50 टक्के डेंग्यूचे रुग्ण कमी झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

मागील 6 वर्षांचा विचार करता जिल्ह्यात डेंग्यूचे 5383 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी योग्य उपचाराअभावी किंवा वेळेत निदान न झाल्याने दगावलेल्या रुग्णांची संख्या 26 इतकी आहे. यंदा स्वाइन फ्लू कमी झाला असला तरी डेंग्यूचा यंदाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत डेंग्यूबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. जुलैत 69, ऑगस्टमध्ये 163 तर सप्टेंबरमध्ये 260 रुग्णांच्या तपासण्या पॅझिटिव्ह आल्या असल्याचे जिल्हा हिवताप कार्यालयाकडून सांगण्यात आले.

पावसाळ्याच्या कालावधीत साधारणपणे डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. यंदा जिल्ह्याच्या सर्वच भागात सतत पाऊस सुरू राहिल्याने हिवतापासोबतच डेंग्यूचेदेखील रुग्ण आढळून आले. ग्रामीण जिल्ह्यातून प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरून जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत रुग्णांची संख्या 34 होती. ती सप्टेंबरमध्ये 42 इतकी झाली. नगरपालिका क्षेत्रात याच कालावधीत 54 रुग्ण बाधित असल्याचे निदर्शनास आले. त्यापैकी सप्टेंबरमधील संख्या 27 होती. नाशिक महापालिका क्षेत्रात जुलैमध्ये 48, ऑगस्टमध्ये 117 तर सप्टेंबरमध्ये 165 असे तिमाहीत 342 रुग्ण डेंग्यूबाधित आढळून आले. हीच संख्या मालेगावात जुलैत 2, ऑगस्टमध्ये 9 तर सप्टेंबरमध्ये 26 अशी एकूण 37 होती.

डेंग्यूने मृत्यू झाला नसल्याचा दावा

जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढती असली तरी यावर्षी अद्याप एकही रुग्ण दगावल्याची घटना घडली नसल्याचा दावा जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. महेंद्र देवळीकर यांनी केला आहे. लोकांमध्ये या आजाराबद्दल असणारी भीती कमी झाली असून वेळीच उपचार घेण्यासाठी पुढाकार घेतला जात असल्याचा हा परिणाम आहे. डेंग्यूचे संक्रमण करणार्‍या एडिस या डासाच्या उत्पत्ती रोखण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

या डासाची मादी शुद्ध पाण्यात अंडी घालते. तसेच ती दिवसा चावा घेत असल्याने योग्य बचाव करण्याची गरज आहे. आपल्या घरात आणि कार्यालयात किंवा परिसरात स्वच्छता ठेवावी, साठलेले पाणी वाहते करावे, व वाहते न करण्यासारख्या पाण्यात गप्पीमासे सोडावेत किंवा क्रूड ऑइल सोडावे. घरातील पाणीसाठ्यांना घट्ट झाकण लावावे, आठवड्यातून एक दिवस घरातील सर्व पाणीसाठे कोरडे ठेवावे. रात्री झोपताना डास चावू नयेत म्हणून काळजी घ्यावी. या उपाययोजना केल्या तर डेंग्यूपासून बचाव सहज शक्य असल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयात मोफत तपासणी

डेंग्यूच्या संदर्भात लोकांमध्ये असणारी भीती अनाठायी आहे. या आजारात खासगी ठिकाणी करण्यात येणार्‍या तपासण्यांना हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सेटिनल सेंटर कार्यरत असून या प्रयोगशाळेत विनामूल्य तपासणी करण्यात येते.

खासगी डॉक्टर रुग्णाचे रक्तनमुने पाठवून येथे तपासणी करून घेऊ शकतात किंवा स्वतः रुग्णदेखील रक्तनमुने देऊन आजाराची खातरजमा करून घेऊ शकतो. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात रक्त नमुने घेऊन ते तपासणीसाठी सेटिनल सेंटरला पाठवण्याची व्यवस्था आहे. एका दिवसात तपासणीचा अहवाल देण्यात येतो.

सप्टेंबर अखेर तालुका निहाय

नाशिक – 12, सिन्नर -15, नांदगाव-1, मालेगाव- 3, निफाड- 8, येवला – 7, चांदवड- 5, देवळा- 3, कळवण – 5, दिंडोरी- 9, पेठ – 2, सुरगाणा- 1, त्रिंबक- 2, इगतपुरी- 2, सटाणा – 1 असे 76 रुग्ण आढळून आले.

Leave a Comment

error: Content is protected !!