31 मार्च पर्यंत शिकावू वाहन परवाना नोंदणी बंद

फक्त वाहन नोंदणी होणार

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये विविध कामानिमित्ताने अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता असून हे टाळण्यासाठी राज्य परिवहन आयुक्त, मुंबई यांनी परिवहन कार्यालयांना खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत, त्यानुसार नवीन वाहन परवाना नोंदणी दि. 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आली आहे, अशी माहिती श्रीरामपूरचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्पाक खान तसेच नगरचे दीपक पाटील यांनी दिली.

राज्य परिवहन आयुक्तांनी याबाबत काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे, शिकाऊ वाहन परवाना (लायसन्स) साठी अपॉईंटचा दैनंदिन कोटा दि. 31 मार्च 2020 पर्यंत 10 टक्क्यांपर्यंत कमी करावा, ज्या अर्जदारांनी दि. 31 मार्च 2020 पर्यंत शिकाऊ लायसन्स काढण्यासाठी वेळ घेतलेली आहे, त्यांच्या आगाऊ वेळ (अपॉईंटमेंट) रद्द करण्यात याव्यात. सदर नागरिकांना दि. 31 मार्च 2020 च्या पुढील वेळ घेण्याबाबत सांगण्यात यावे, ज्या अर्जदारांनी दि. 31 मार्च 2020 पर्यंत पक्क्या लायसन्ससाठी वेळ घेतलेली आहे.

त्यांच्या देखील आगाऊ वेळ रद्द करण्यात याव्यात, या सर्व अर्जदारांना दि. 31 मार्च नंतर आगाऊ वेळ घेण्याचे सांगावे, परंतू ज्या अर्जदारांची शिकाऊ लायसन्सची मुदत दि. 31 मार्च पर्यंत संपत आहे, व दि. 31 मार्च पर्यंतची आगाऊ वेळ घेतलेली आहे अशा अर्जदारांनी पक्क्या लायसन्सची चाचणी दिलेल्या वेळेत घेण्यात यावी, सर्व मासिक शिबीरे 31 मार्च 20 पर्यंत बंद करण्यात यावीत.

चालक व वाहन बॅज, लायसन्स नुतनीकरण, दुय्यम प्रत, पत्ता बदल आदी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येतील. परंतू सदर अर्ज हे दि. 31 मार्च नंतर कार्यालयात स्विकारण्यात येतील. दि. 31 पर्यंत कार्यालयामध्ये फक्त लायसन्स नुतनीकरण, वाहनांची पुर्ननोंदणी, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण, परवाना संबंधी कामेच करण्यात यावी, वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, वित्तदाताचे कर्ज किंवा बोजा नोंद आदी कामांबाबत ऑनलाईन अर्ज करता येतील, परंतू सदर अर्ज हे दि. 31 मार्च नंतर कार्यालयात स्विकारण्याबाबत सर्व नागरिकांना कळवावे, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.

योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण, पक्की लायसन्स चाचणीसाठी मोटार वाहन निरीक्षक व कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी हातांना ग्लोज, तोंडाला मास्क लावून कामकाज करावे, अत्यावश्यक प्रकरणात प्रकरणपरत्वे निर्णय घेण्याचे अधिकार कार्यालय प्रमुखांना राहतील. तसेच कार्यालयामध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.