Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

कोरोना : नगरमधून 16 संशयितांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत

Share
कोरोना : नगरमधील 16 जणांचे नमुने तपासणीला, Latest News 16 Examine Samples Ahmednagar

कोरोनाबाधितांसह 20 जण आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूच्या संसर्गाचा नगर शहरात एक रुग्ण आढळून आला आहे. त्याची प्रकृती स्थिर असून त्याला स्वतंत्रपणे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीचे (हाय रिस्क) सहवासित चार आणि कमी जोखमीचे सहवासित (लो रिस्क) चार नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत.

याशिवाय, नुकतेच परदेश दौरे करून आलेल्या आठ नागरिकांचेही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. शनिवारअखेर जिल्ह्यातील 20 जण हे देखरेखीखाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

दरम्यान, बाधित रुग्णांच्या उपचारासाठी येणारा खर्च हा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून केला जाणार आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन सतर्क असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, मात्र, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि आरोग्य देखभाली संदर्भात स्वयंशिस्त पाळावी, असे त्यांनी आवाहन केले.

कोरोना विषाणू संसर्ग आणि त्याच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या वतीने केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी प्रसारमाध्यमांना दिली. यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे आदी उपस्थित होते.

नगर शहरात कोरोना विषाणू संसर्गाचा एक रुग्ण आढळून आला असला तरी त्याची प्रकृती स्थिर असून सर्दी, ताप, खोकला अशी कोणतीही लक्षणे त्याला आढळून आलेली नाहीत. मात्र, आरोग्य यंत्रणा पूर्णपणे तत्पर असून या रुग्णाच्या संपर्क आणि सहवासात आलेल्या प्रत्येकाची माहिती घेतली असून त्यांची तपासणी करण्यात आली आहे. इटलीहून आलेल्या एका नागरिकाच्या संपर्कात आलेल्या तीन जण, दुबईहून आलेल्या नागरिकाच्या संपर्कात आलेले आठ जण आणि परदेश दौर्‍याहून आल्यानंतर तपासणी केलेले आठ जण असे 20 जण देखरेखीखाली असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा रुग्णालय, बूथ हॉस्पिटल येथे स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. याशिवाय, शिर्डी येथील साई संस्थानचे हॉस्पिटल आणि शनिशिंगणापूर येथील देवस्थानचे हॉस्पिटल येथेही व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांनी स्व:ताहून काही बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे. गर्दीची ठिकाणे टाळावीत. चित्रपटगृहाना स्वच्छतेबाबत निर्देश दिले असून त्यांना आवश्यकता वाटत असेल तर ते बंद ठेवू शकतात. मात्र, अशा सूचना प्रशासनाने दिल्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

परदेशात कामानिमित्त किंवा सहलीसाठी जाऊन आलेल्या नागरिकांनी त्यांच्या जवळच्या ग्रामीण रुग्णालयात अथवा जिल्हा रुग्णालयात त्यांची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केले आहे. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्ग अथवा तपासणीसाठी दाखल झालेल्या रुग्णांच्या उपचार आणि कार्यवाहीवरील खर्चासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व राज्यांना निर्देश दिले असून या उपचारावरील खर्च राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून करण्यास मान्यता दिली आहे.

रुग्णाला अलग ठेवणे, नमुना संकलन आणि स्क्रीनिंगसाठी उपाय, कोरोनाच्या प्रतिसादासाठी आवश्यक उपकरणे खरेदी, स्कॅनर्स, व्हेंटिलेटर, एअर प्युरिफायर अशा सुविधा तात्काळ उपलब्धसाठी यातून निधी उपयोगात आणण्याबाबत निर्देश दिले असल्याचेही द्विवेदी यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी घाबरुन जाण्याचे तसेच कोणत्याही अफवेला बळी पडण्याचे कारण नाही. त्यांनी यात्रा, जत्रा, उत्सव, लग्न समारंभ असे गर्दीची ठिकाणे टाळावीत.

सर्दी, खोकला, श्वसनाला त्रास अशी लक्षणे आढळून येत असतील तर नजिकच्या रुग्णालयात अथवा जिल्हा रुग्णालयात तात्काळ उपचार घ्यावेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना विषाणू संदर्भात येणार्‍या कोणत्याही मेसेजेचही खात्री करुन घ्या. कोणतेही संदेश हे अधिकृत स्त्रोतांकडून खात्री करुन घेतल्याशिवाय पुढे पाठवू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा संपूर्णपणे सतर्क आहे, नागरिकांना काळजीचे कारण नाही, असे ते म्हणाले.

कोरोना आजार होऊ नये, यासाठी श्वसनसंस्थेचे विकार असणार्‍या व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घेणे. हात नियमितपणे साबणाने स्वच्छ धुवावेत. शिंकताना, खोकताना नाकातोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर धरणे, अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये. फळे, भाज्या न धूता खाऊ नयेत. हस्तांदोलन टाळावे. चेहरा, नाक यांना वारंवार हाताने स्पर्श करु नये. गरज नसताना गर्दीचे ठिकाणी जाणे टाळा, नियमबध्द जीवनशैलीचा अवलंब करा. स्वत:हून कोणताही उपचार करु नये, डॉक्टराच्या सल्ल्यानुसारच उपचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कोरोना विषाणू आजाराच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे स्क्रीनिंग केले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी टोल फ्री 104 क्रमांक कोरोना विषयक शंका समाधानासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. याशिवाय जिल्हा सामान्य रुग्णालय, नगर येथे कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून तो 24 तास कार्यरत आहे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा 1077 या टोल फ्री क्रमांकावरुन नागरिकांना मूलभूत माहिती दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नवीन करोना विषाणू आजाराबद्दलच्या मार्गदर्शक सूचना सर्व संबंधितांना पाठविण्यात आल्या असून त्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

 

 

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!