मजूराच्या पोरानं बनवला मराठी सिनेमा; २२ जूनला होणार प्रदर्शित

0

नाशिक, ता. १८ : हातावर पोट असणाऱ्या एका मजूराच्या पोराने गरिबीवर मात करून जिद्दीने आपल्या मित्रांच्या मदतीने मराठी चित्रपट तयार केला आहे.  ‘ऑफेंडर’- खलनायकांची कथा असे या चित्रपटाचे नाव असून २२ जूनला तो राज्यात प्रदर्शित होत आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सोमनाथ जगताप असे या तरुणाचे नाव आहे. लहानपणापासूनच गरीबीचे चटके सोसत इंदापूरात मराठी माध्यमातून शिकलेला, वडीलांनी मोलमजूरीचे काम करत सोमनाथचा सांभाळ केला.  त्याला लहानपणापासून काही तरी वेगळे करण्याची मनात सतत इच्छा होती. एफवाय बी कॉम ला नापास झाल्यावर त्याने ॲनिमेशन क्षेत्र निवडले. भोर येथील एका सहयाद्री नावाच्या संस्थेत एक वर्षाचा कोर्स पुर्ण केला.

पुढील शिक्षणासाठी पुण्यात प्रवेश घेतला. तेथेच नकळत त्याच्या जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली. नवीन मित्रांच्या भेटी झाल्या. वाचनाची गोडी लागली, नाटक, बालनाटय तसेच लघुपटांच्या जगात तो रमू लागला. त्यातूनच त्याने ‘ जिव्हाळा ‘ ( एक विलक्षण नातं.. ) या लघुपटाची निर्मिती केली. या लघुपटाची निवड पुणे, नाशिक, औंरगाबाद आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवांत झाली होती, तसेच लॉस एन्जलिस मध्ये झालेल्या G2 Green Earth Film Festival (USA) येथे अंतीम फेरीत चित्रपट निवडण्यात आला. ब्राझील या देशात Echo Film Festivals BRICS (EFF BRICS) महोत्सवांमध्ये त्याच्या लघुपटाची निवड झाली.  त्यानंतर त्याने इंदापूर शहराच्या नावाने ‘इंदापूर नॅशनल शॉर्टफिल्म फेस्टीवल सलग दोन वर्ष भरवले यामुळे इंदापूर शहराच्या कला क्षेत्रात नाव उंचावले.

पुढे पुण्यात सात मित्रांसोबत मिळून आणि सलग ३ वर्षे अविरत मेहनत घेऊन ‘ द ऑंफेंडर – स्टोरी ऑफ अ क्रिमिनल’ हा नवा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा आकारास आला.

भीती, प्रेम, आक्रोश, विश्वास यांचा संमिश्र अनुभव देणारा थरारपट म्हणजे द ऑंफेंडर!  या चित्रपटात अर्जुन महाजन, डॉ. अमित कांबळे, दिप्ती इनामदार, दिनेश पवार , अनिकेत सोनवणे, सुरज दहिरे, शिवाजी कापसे, सोमनाथ जगताप आणि लव्हनिस्ट हे कलाकार आहेत.

त्यांनी चित्रपटाच्या लेखनापासून आणि दिग्दर्शनापर्यंतच्या सर्व भुमिका पार पाडण्याचं शिवधनुष्य यशस्वीरित्या पेललं आहे. मराठी चित्रपटांमध्ये अभावाने आढळणाऱ्या क्लायमॅक्स-ऍंटीक्लायमॅक्स, पॅरॅलल एडीट वगैरे पद्धती त्यांनी बेधडकपणे व आत्मविश्वासाने हाताळल्यामुळे ४ आंतरराष्ट्रीय फेस्टीव्हलमध्ये या चित्रपटाचा गौरव झाला आहे.

चित्रपटाचे संकलन-दिग्दर्शन आणि गीते अर्जुन महाजन यांची तर सहाय्यक दिग्दर्शन सोमनाथ जगतापने केले  आहे. चित्रपटाची कथा डॉ. अमित कांबळे यांची असून पटकथा व संवाद अर्जुन महाजन व डॉ. अमित कांबळे यांनी लिहिले आहेत. छायाचित्रणाची जबाबदारी अनिकेत सोनवणे, डॉ. अमित कांबळे यांनी सांभाळली आहे. कलादिग्दर्शन सुरज दहिरे यांचे, ध्वनीमुद्रण दिनेश पवार यांचे असून निर्मिती व्यवस्थापन शिवाजी कापसे यांनी केलं आहे. संगीत आरोह, कृष्णा सुजीत यांनी दिले असून आरोह वेलणकर, स्वप्नील भानुशाली यांनी या चित्रपटातील २ गाणी गायली आहेत.

LEAVE A REPLY

*