Blog : न्यूड’ विषयाची ‘अनावृत्त्’ कहाणी

0

रवी जाधव दिग्दर्शित ‘न्यूड’ हा एक सर्वाथाने ‘सुंदर’ सिनेमा पाहण्याचा योग आला आणि त्यानिमित्ताने लेखणी लिहिती झाली. ‘न्यूड’मध्ये वेगळा विषय, आशय, त्यांची मांडणी, आशयाला पूढे नेणारी पटकथा आणि पात्राचा नैसर्गिक वाटवा असा अभिनय यांची सुरेख भट्टी जमून आली आहे. यातील संवाद आणि छायाचित्रण थोडेसे जरी इकडे तिकडे झाले असते, तर हा ‘तद्दन’ गल्लाभरु ‘इरॉटीका’ झाला असता. मात्र संतुलीत संयमी चित्रीकरण, कुठेही तोल न ढळू देता कलाकारांनी केलेला अभिनय आणि एकुणच सर्व गणिते सुरेखपणे जमल्याने हा चित्रपट न राहता शब्दश: अर्थाने ‘कलाकृती’ झाली आहे.

या निमित्ताने ललित कला विशेषत: चित्रकला शिकणार्‍या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अत्यंत गरजेच्या असणार्‍या ‘न्यूड’ मॉडेलचा वाणवा, नग्नतेकडे पाहण्याची दृष्टीकोन याविषयी मंथन झाले आणि हा विषय  सर्वसामान्यांना कळाला आहे.

‘नग्नता’  या शब्दाबद्दल जनमानसात कमालिची लज्जा,टॅब्यू आणि संकोच आणि पूर्वग्रह आहेत. नग्नता म्हणजे अश्‍लीलता असाही ‘समज’ आहे. वास्तविक नग्नता ही घाण, किसळवाणी, अश्‍लील गोष्ट कधीच नव्हती- नाही. फार प्राचीन इतिहास आणि परंपरेत नग्नतेकडे अत्यंत उदारमतवादाने पाहिले गेले आहे. खजुराहोच्या मंदिरावर स्त्री-पुरुषांची शृंगार चित्रे त्याचेच द्योतक आहे.

इतकेच कशाला अजिंठा-वेरुळ, लोणार येथील दैत्यसुदन मंदिर, कान्हेरी यासह जिथे कुठे पाषाण भेदून सुरेख लेणी कोरली गेल्या त्यात नग्नतेचा हुंकार उमटला आहे. त्याकाळीत जर नग्नतेकडे इतक्या प्रगल्भ विचारांनी पाहून त्याची अभिव्यक्ती मंदिरांसारख्या पवित्र आणि श्रद्धेच्या स्थानावर उमलटली तर मग ही गोष्ट  वाईट कशी असू शकते.

प्राचीन भारतात ६४ कला मानल्या गेल्या. त्यात नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प, संगीत, साहित्य, वास्तुकला यासह इतरही ललित कलांमध्ये मानवी  अनावृत्त देह म्हणजे जसा आहे तसा (कुठलेही आवरण नसलेल्या)  देहाबद्दल सौंदर्यपूर्ण नजरेने पाहण्याची विकसित आणि प्रगल्भ जाणीव दिसून येते होती. मग नंतरच्या काळात असे काय घडले ज्यामुळे अनावृत्त मानवी देह अश्‍लील मानला गेला?

मोहेजोंदडो संस्कृतीतील मातृदेवतेची मूर्ती असो किंवा नर्तिका;  दीदारगंज येथील चामरधारिणी; खजुराहो, कोणार्क, येथील शिल्पे, अजिंठा-वेरुळ यामध्येही नग्नशिल्प-चित्रांचा मुक्त मूर्तीमंत आणि सर्जनशील अविष्कार उमटलाच ना? तर याला कारण म्हणजे ब्रिटीशांनी भारतीयांवर आपले विचार लादले आणि त्यानंतर नग्नतेला अश्‍लीलता या नावाखाली खर्‍या अभिरुची संपन्न कलांना बंधने आलीत.

प्राचीन भारतात नंतरच्या काळात नग्नतेला अश्लील का मानले गेले याच विचार व्हायला हवा. र .धो. कर्वेनी आपल्या समाजस्वास्थ नियतकालिकांच्या मुखपृष्टावर ३० च्या दशकात एक अर्धवस्त्र स्त्रीचे चित्र टाकले म्हणून त्यांना  ब्रिटीशांनी न्यायासनासमोर खेचले.

त्या वेळी त्यांनी अश्‍लिलता हा कुठल्याही वस्तूचा दोष नसून तो पाहणार्‍याच्या नजरेचा दृष्टीदोष आहे असे ठामपणे सांगत इंग्रज सरकारलाच अश्‍लिलतेची व्याख्या सांगा असे रोखठोक उत्तर दिले होंते. आजतागायत भारतीय कायद्यात कुठेही अश्‍लिलतेची परिपूर्ण आणि सर्वमान्य(स्टॅर्ण्डड) व्याख्या नाही. अश्‍लिलता ही व्यक्तीपरत्वे बदलणारी संकल्पना आहे असे मी ठामपणे नमूद करतो.

चित्र, शिल्प अशा कलांसाठी तर अनावृत्त चित्र, शिल्पे म्हणजे कलाकारांच्या कलेचा कस लावणारी सुरेख अभिव्यक्ती आहे. जसे वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी मृत व्यक्तीची ‘बॉडी’ शिक्षणासाठी लागते तद्वतच कलेच्या माध्यमातून अभिव्यक्त होणार्‍यांना मानवी शरीर रचने(ऍनॉटॉमी)चा अभ्यास करुन त्या कलेतून अभिव्यक्त करणे अत्यंतीक महत्त्वाचे ठरते. त्यामुळे ही गोष्ट, श्‍लील=अश्‍लील, नीति, अनिती, शिष्टाचार-भ्रष्टाचार या संकल्पनेतील गोष्ट नसून शिक्षणासाठी लागणारी अनिवार्य गोष्ट आहे.

दुसरा मुद्दा असा, चांगले वाईट काय हे ठरवण्याचा अधिकार कुणा एका वर्गाचा, जातीचा अथवा समुहाचा नक्कीच नाही. समाजाला जे आवडते ते त्यांना पाहायचे अभिव्यक्त करायाचे स्वातंत्र भारतीय घटनेने कलम १९ ने दिलेले आहे त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र म्हणतात. या कलमाचा अन्वयार्थ लावूनही कुणी कशातून अभिव्यक्त व्हावे याला बंधने नाहीत. नसावीत……अगदी ‘मॉरल माफियां’चीही………!

आज नाशिकमध्येही ४ ते ५ महाविद्यालयातून ललित कलेची पदवी अभ्यासक्रम शिकवला जातो. त्यावेळी न्यूड मॉडलची चणचण आज शंभर वर्षांनंतरही तशीच आहे. येथील काही महाविद्यालयात मुंबईहून न्यूड मॉडेल आणावे लागतात यापेक्षा दुर्देव कुठले असू शकते?

बरे ‘न्यूड’ मॉडल समोर बसवून चित्र,शिल्प साकारणे हे अत्यंत अभिरुची संपन्न आणि कलात्मक, सृजनात्मक काम आहे त्यामध्ये कुठेही स्पर्श, अनैतिकता किंवा वाईट असे नाही तरीही या कामासाठी समाजाचा नग्नतेचा दृष्टीकोन प्रगल्भ विकसित नाही म्हणून काम मिळू नये ही अत्यंत लाजरवाणी गोष्ट आहे.

गरज आहे नग्नतेकडे विकसित आणि अधिक प्रगल्भपणे पाहण्याची. तेव्हाच या समाजात उत्त्तमोत्तम कलावंत, चित्रकार, शिल्पकार घडतील. मनातील आणि चित्रातील नग्नतेला आपण अधिकच प्रगल्भ आणि पूर्वग्रह  न बाळगता अधिक स्वच्छपणे पाहुयात. तेव्हाच कलेचा प्राचीन काळातील वैभव प्राप्त होईल.

नग्न चित्रांचे शतक

लंडनच्या रॉयल अकादमीतून सूवर्णपदक मिळवणारे चित्रकारी कॅप्टन डब्ल्यु. जी. सालोमन यांची जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथे प्राचार्य म्हणून नियुक्त झाल्यानंतर त्यांनी १९१९ या वर्षीआपल्या कॉलेजमध्ये नग्न स्त्री-पुरुषांना मॉडेल म्हणून बसवत ‘न्यूड’ पेटींग, शिल्प काढण्याच्या एका धाडसी निर्णयाला प्रारंभ केला.

पुढील वर्षी या घटनेला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानंतर नाशिकमध्ये ९९ वर्षांत प्रथमच के. के. वाघ ललित कला महाविद्यालयातर्फे हॉर्मनी कला दालनात ‘न्यूड’ चित्र-शिल्पकृतींचे प्रदर्शन आयोजित केले गेले.

पण दुर्देवी बाब म्हणजे आजही येथील ललित कला महाविद्यालयात ‘न्यूड’ मॉडेल्स मुंबईहून आयात करावी लागतात. दरम्यान, न्यूड चित्रांबद्दल चिन्ह या नियतकालीकातर्फे २०१३ साली ‘नग्नता : चित्रातली आणि मनातली’ हा सुरेख विशेषांक प्रकाशित झाला आणि या दिशेने चर्चा करण्यास प्रारंभ झाला होता. आज तो ‘न्यूड’ चित्रपटाने अधिक गतीमान झाला आहे. आशा करुयात हे वर्तुळ या वळणावर अधिकच गतीमान होईल.

-निल कुलकर्णी

LEAVE A REPLY

*